तारक आणि मारक

0
52

योग्य कर्माला मिळालेला सुयोग्य मोबदला ज्यातून साकारलेले ऐश्‍वर्य हे शोभिवंतच असते. परंतु वैद्यकीय क्षेत्रात झटपट श्रीमंतीचा अट्टाहास अंगीकारून वाममार्गाला लागून पीडितांची पिळवणूक करण्याच्या हेतूने चुकीचे मार्गदर्शन करणार्‍या वैद्यांनी खरंच आपण खर्‍या अर्थाने कुणाला चुकीचा मार्ग दाखवत आहोत काय, याचे आत्मचिंतन केलेले बरे!

चिता आणि चिंता यात खरच किती साधर्म्य आहे! एक शरीराला, तर दुसरी मनाला जाळत जाते. खास करून चितेकडे मार्गक्रमण होत जाणार्‍या रोग्याच्या कुटुंबीयांचे मन किती चिंताग्रस्त होत असेल! याची खरं तर कल्पनाच करवत नाही. त्या प्रसंगी शारीरिक पिडेने ग्रासलेल्या रोग्याला वैद्य / डॉक्टर हा देवासमान भासत असतो. तर त्या डॉक्टरचे काही धीराचे आश्‍वासक शब्द हे त्या रोग्याच्या कुटुंबीयांच्या चिंतेला तिलांजली देऊ शकतात. दु:खी, रोगी, पीडित यांचे दु:ख दूर करणारा वैद्य/ डॉक्टर खरंच किती मोठे सामाजिक कार्य करून पुण्य मिळवित असेल ! समाधान पावत असेल ! आजही रोग्याला देवदूतासमान वाटणारे पिडा निवारक डॉक्टर समाजात आहेत. जे स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग करून समाजाला उत्तम आरोग्य प्रदान करण्याचे महत्त्वाचे कार्य करताना दिसतात. परंतु मानवात देव समजून त्यांची सेवा करणार्‍या मानवतावादी, करुणेच्या सागरांची संख्या झपाट्याने कमी होताना आज पाहावयास मिळत आहे.
एकीकडे मानवी आहारावर होणारा कृत्रिम रसायनांचा अतिरिक्त वापर, ज्यातून उद्भवलेले नवनवीन जीवघेणे आजार तर दुसरीकडे धनाच्या राशीवर विराजमान होण्याची स्पर्धा करणारे वैद्य/डॉक्टर यांची वाढती संख्या पाहली की, खरंच सर्व सामान्य मानसाचं मन देखील चिंताग्रस्त झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धिमत्तेनुसार आर्थिक सुबत्ता वैद्यकीय क्षेत्रात देखील प्राप्त होण्यास काहीही हरकत नाही. कर्म कौशल्य पणाला लावून काळाचे भान न ठेवता दुसर्‍यांचे प्राण वाचविणारे ‘हे’ देवदूत खरोखर श्रीमंतीत कुबेर ठरले तरी सर्व सामान्यांना त्यांचा रास्त अभिमानच वाटेल. परंतु त्या धनाला पीडित जनतेच्या पिळवणुकीचा दर्प नसावा. योग्य कर्माला मिळालेला सुयोग्य मोबदला ज्यातून साकारलेले ऐश्‍वर्य हे शोभिवंतच असते. परंतु या क्षेत्रात झटपट श्रीमंतीचा अट्टाहास अंगीकारून वाम मार्गाला लागून पीडितांची पिळवणूक करण्याच्या हेतूने चुकीचे मार्गदर्शन करणार्‍या वैद्यांनी खरंच आपण खर्‍या अर्थाने कुणाला चुकीचा मार्ग दाखवत आहोत काय, याचे आत्मचिंतन केलेले बरे!
मानव हा चुकांचा पुतळाच समजला जाता. परंतु चुका कोणत्या क्षेत्रातील माणूस करतो, याचा विचार होणे तितकेच गरजेचे असते. ज्या रोगाचे निट आकलनच रोग निवारणकर्त्याला झाले नाही आणि त्याने चुकीच्या पद्धतीने उपचार केले तर त्याची खर्‍या अर्थाने किंमत त्याच्यावर पूर्णत: विश्‍वास ठेवणार्‍या एका निष्पाप जिवास मोजावी लागते. अशा चुकांना काय म्हणावे? चूक की विश्‍वासघात! माणूस अपूर्ण असू शकतो मग तो कुठल्याही क्षेत्रातील असो! परंतु आपले अपूर्णत्व मान्य करण्याचे मोठेपण मात्र वेळीच दाखविले तर विश्‍वासघातकाचे पातक टळू शकते.
वैद्य/डॉक्टर आणि व्याधिग्रस्त यांचे ॠणानुबंध हृदयस्पर्शी असावयास हरकत नाही. परंतु हृदयाला रक्तपुरवठाच निट होत नाही. असे देखील बर्‍याच वेळेस सांगण्यात येते, ज्यात काही वेळेस पीडिताच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या खिशाला कात्री लावण्याचा आर्थिक सुप्त हेतू होता, हे नंतर जेव्हा त्या रोग्याला कळते तेव्हा खरंच तो किती ‘चांगली’ प्रसिद्धी त्या स्वार्थांन्ध ‘मारक’ वैद्याची करतं असेल, याची कल्पना स्वार्थी हेतू मनात येण्या अगोदरचं त्यांनी करावी.
मृत्युशय्येवरील रोग्याचे रोगनिवारण करणार्‍या वैद्याला देव समजून ज्या हातांनी हे महान कार्य केले त्यांची पूजा करून त्या विभूतीस वंदन करणे हे आनंदाचेच प्रतीक आहे. परंतु मृत्यू पावलेल्याा शरीरावर इलाज करून धनसंपादन करणार्‍यांची संख्या देखील वाढत असलेली ऐकिवात येते. या प्रवृत्तीला काय म्हणावे? औषधी या पिडानाशक, दु:ख निवारक असाव्यात. परंतु ‘एक्सपायरी’ मृत झालेल्या औषधी रोग्याला खरंच तारक ठरतील का? हा निष्काळजीपणा जर वारंवार होत असताना सामान्यांच्या वाचनात, पाहण्यात, ऐकण्यात आल्या तर खरंच वैद्याची तारक म्हणून असणारी प्रतिमा किती दिवस अबाधित राहू शकते!
– गजानन मोहन गिरी
९८२२८९७४९३