अतिथी

0
67

‘‘आई, तुला माझी दहावीतली ती मैत्रीण, कृत्तिका आठवते का?’’ कीर्तीनी आईला विचारलं. आईनं स्मृतीला ताण दिला.
‘‘कृत्तिका? अच्छा, ती का, जी दहावीत शाळेत पहिली आली होती? सात-आठ वर्षांपूर्वी आपण दोघी मॉलमध्ये गेलो होतो, तेव्हा ती आणि तिची आई आपल्याला भेटल्या होत्या… तीच ना?’’ आईनं म्हटलं, ‘‘ते लोक इथून बदलून गेले, तिने तिथूनच इंजिनीअरिंग केलं असं मागे तूच मला सांगितलं होतंस.’’
‘‘म्हणजे आम्ही शाळेतल्या मैत्रिणी अजूनही एकमेकींच्या संपर्कात आहोत… कृत्तिका पण माझ्याशी नेहमी बोलत असते. फार कशाला, मी जेव्हा बंगलोरला या नोकरीच्या ट्रेनिंगसाठी महिनाभरासाठी गेले होते, तेव्हा पर्यायी व्यवस्था होईतो एक दिवस तिच्या रूमवर तिच्या इतर रूममेट्ससह राहिलेही होते,’’ कीर्तीने आईला सांगितलं. ‘‘तिला एकटीलाच दोन-तीन दिवस मुंबईला यायचंय. मी तुमच्या घरी दोन-तीन दिवस राहिले, तर चालेल का, असं सारखी फोन करून विचारतेय. काय कळवू तिला ते सांग!’’ कीर्तीने आईला विचारलं. आई बुचकळ्यात पडली, ‘‘पण तू आता घरी कुठे असतेस? तुझा जॉब, तुझं पोस्ट-ग्रॅज्युएशन, इतर कामं मग ती घरी राहून काय करेल? मी तिच्याशी गप्पा मारून मारून अशा कितीशा गप्पा मारणार?’’
‘‘जाऊ दे गं आई, दोन-तीन दिवसांचा तर प्रश्‍न आहे. ती सारखी मागे लागलीये की मी मुंबईला येतेय, मला तुझ्या घरी राहायचंय. नाही म्हणणं प्रशस्त नाही वाटत गं! हो म्हणून सांगते झालं. तुला जास्तीचं काम पडेल, पण मी आहे ना तुझ्या मदतीला! आणि जॉबमध्ये सध्या फारसं काम नसल्यानं दोन-तीन दिवस नाही गेलं तरी चालणार आहे,’’ कीर्तीने म्हटलं आणि कृत्तिकाचा फोन आल्यावर तिने तिला रहायला ये म्हणून सांगितलं. रविवारी सकाळी एअरपोर्टवर कीर्ती आणि आई गाडी ड्राईव्ह करून घ्यायला गेल्या, कृत्तिकाला घरी आणलं, तेव्हा एवढ्या वर्षांत मुंबई कित्ती बदलली म्हणत कृत्तिका जुन्या आठवणींमध्ये रमली.
‘‘प्रवास कसा झाला? मी स्वयंपाक करून ठेवलाय, जेवायला बसा दोघी.’’ तिच्याशी संवाद साधून आई स्वयंपाकघराकडे वळली. खाणं झाल्यावर, थोडी विश्रांती घेते म्हणत कृत्तिका अंथरुणावर पडल्या-पडल्या निद्राधीन झाली. दमली असेल, कीर्तीनं विचार केला आणि ती आईला आवराआवर करण्यात मदत करू लागली. रात्रीच्या जेवणासाठी उठवूनही कृत्तिका जागी होईना, तेव्हा आईनं तिच्यासाठी वाढलेलं ताट तसंच फ्रीजमध्ये ठेवलं. अखेर दुसर्‍या दिवशी कृत्तिका महत्प्रयासानं दुपारी बारा वाजता उठली. ‘‘गेल्या अनेक दिवसांत झोपलेच नव्हते मी’’ कृत्तिका म्हणाली.
‘‘आपण ज्या कृत्तिका नावाच्या मुलीला ओळखतो, ती किती चांगली होती, आज आल्यापासून पाच दिवस होऊन गेले आहेत, पण ती केवळ झोपते आहे, उठतेच मुळी दुपारी दोन वाजता… जेवतसुद्धा नाही… काय प्रॉब्लेम असावा? कीर्ती, तू बोल बरं तिच्याशी या विषयावर. आणि दोन-तीन दिवसांसाठी आलेली मुलगी, आज पाच दिवस होऊन गेले आहेत, तरी जाण्याची काही चिन्हं नाहीत… काय भानगड आहे? कुणी दुसर्‍यांच्या घरी जाऊन असं वागतं का?’’ आईची चिडचिड होऊ लागली होती. कीर्ती तर कानकोंडी झाली होती. अखेरीस तिला जाग आल्यावर कीर्तीनं कृत्तिकाजवळ विषय काढलाच. ‘‘अनेक दिवसांत मी झोपलेच नव्हते,’’ तिनं उत्तर दिलं. आणि इकडच्या तिकडच्या गप्पा करून ती पुन्हा निद्राधीन झाली.
‘‘कीर्ती, तुझ्याजवळ तिच्या आईचा नंबर आहे ना? जरा एकदा बोल तिच्याशी. त्यांनाही काहीच काळजी दिसत नाही. मुंबईत हिचे कुणी नातेवाईक असतील, तर त्यांच्या घरी जाऊन राहा म्हणावं! आमच्या घरी ही असली थेरं चालणार नाहीत… कीर्ती, तू तिला स्पष्ट सांग!’’ आई चांगलीच संतापली होती.
‘‘अगं तुम्ही मायलेकी जरा प्रेमानं वागा-बोला तिच्याशी. काहीतरी गंभीर समस्या असावी,’’ बाबांनी सबुरीचा सल्ला दिला, तरी आईची चिडचिड कमी होईना. ‘‘उद्या हिचं लग्न झालं तर सासू डोक्यावर हात मारून घेईल स्वत:च्या की कसली पीडा घरात आलीये म्हणून! कुणास ठाऊक ड्रग्ज-बिग्जच्या आहारी गेलीये की काय ही मुलगी?’’
‘‘पण आई, कृत्तिका अशी मुलगी नाहीये, शाळेत टॉपर होती, खूप हुशार मुलगी आहे, पण खरंतर खूपच चांगली मुलगी आहे ती. मी तर नेहमीच संपर्कात होते तिच्याशी आणि राहिलेय ना तिच्याबरोबर. काहीतरी बिनसलं असावं,’’ कीर्तीनं आपल्या मैत्रिणीची कड घेतली. पण आईचंही चुकत नव्हतं, हे तिच्या लक्षात आलं.
‘‘अनेक दिवस झोप येत नव्हती तिला, असं तिच्या आईनं सांगितलंय. परवा परतीची फ्लाईट आहे म्हणे तिची! अन् तिची एक लांबची मावशी मुंबईत हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंटसाठी आली आहे, तिला भेटायला तिला आज जायचंय असंही तिच्या आईनं सांगितलंय,’’ कीर्तीनं सांगितलं.
अखेरीस कीर्तीनं आईच्या म्हणण्याखातर कृत्तिकाची बॅग लावायला मदत केली आणि त्या मावशीकडे जाण्यासाठी तिला टॅक्सीत बसवून दिलं. तेव्हा आईला कळेना, की आपण केलं ते चूक की बरोबर? महानगरात असं अ-तिथी कोणी कोणाकडे जात नाहीत, महानगरात सगळं काही शिस्तीत, आखीव रेखीव असतं. कीर्तीच्या आईनं स्वतःशीच म्हटलं. पण, त्या अतिथीला घराबाहेर घालवूनही तिच्या मनाला चैन पडेना की जिवाला शांती लाभेना. एवढं रुक्षपणे आपण वागायला नको होतं तिच्याशी, तिचं मन तिला खाऊ लागलं. मात्र भावभावनांच्या आहारी नं जाणारं महानगर रुक्षपणे आपल्या गतीनं चालू लागलं आणि महानगरातले लोकही!
****
‘‘रोहिणी, मला तुझ्या मदतीची गरज आहे. ही माझी अमेरिकन विद्यार्थिनी टेसा भारतात, भक्तिपंथाच्या एका मेळाव्यासाठी दिल्लीत जाऊ इच्छितेय. अमेरिकेच्या स्टँडर्डनी गरीब आहे ती. जाण्या-येण्याचं स्वस्तातलं विमानाचं तिकीट तेवढं काढू शकेल. तुझ्याकडे चार दिवसांसाठी दिल्लीत येऊन राहिली तर चालेल का?’’ अश्‍विनीनं अमेरिकेतून भारतातल्या आपल्या बहिणीला फोन केला, नंतर पंधरा दिवस तर त्या कार्यक्रमस्थळीच राहण्याची तिची व्यवस्था आहे.
‘‘अगं बरं झालं विचारलंस! मी गेल्या आठवड्यात एका लोकप्रिय गायिकेची टेलिफोनवर मुलाखत घेऊन तिच्याबद्दलचा प्रसिद्ध झालेला माझा लेख तिला पाठवला होता. महाराष्ट्रात राहणारी ती गायिका आपल्या बारा-तेरा वर्षांच्या मुलाला घेऊन आजच सकाळी सकाळी माझ्याकडे थडकली, नं सांगता-सवरता! लेखाखाली माझा पत्ता दिला होता, तो वाचून ती आली. मी आठ दिवस तुमच्याकडे राहिले, तर चालेल का, म्हणाली! मी उडालेच! माझी मान होकारार्थी हलतेय, की नकारार्थी तेच मला कळेना. त्यांची आंघोळ-नाश्त्याची तयारी केली. दोघा मायलेकांनी अतिविलंबित लयीत आंघोळी केल्या आणि अतिविलंबित लयीत नाश्ते! शेवटी नाही जमणार सांगून बृहन्महाराष्ट्र भवनात त्यांची सोय करून तिथे जाण्यासाठी त्यांना बसमध्ये बसवून दिलं. रोहिणीनं आपल्या बहिणीला सांगितलं, तेव्हा त्या घटनेचा पुन:प्रत्यय दोघींनीही अनुभवला.
ही माझी विद्यार्थिनी अशी नाही गं! अश्‍विनीनं हमी दिली. आणि ती तशी दु:खी आहे. तिला कुटुंब नाही. आईची आधीची दोन लग्नं झालेली, वडिलांची पण! त्यांची आधीची मुलं आणि या लग्नानंतरची ही! पण नंतर पुन्हा दोघे विभक्त झाले… सगळं विसविशीतपणा आहे गं त्या लोकांच्या आयुष्यात! एकाकीपणा, दु:ख आहे म्हणून ड्रग्ज, दारूच्या आहारी गेलेली ती मुलगी या भक्तिपंथात आली, आणि बघता बघता तिची सगळी व्यसनं सुटली. शुद्ध शाकाहारी झाली. प्लीज नाही म्हणू नकोस तिला! दोघी बहिणी नंतर बराच वेळ जिवाभावाचं बोलत राहिल्या.
अखेर अमेरिकेतून टेसा दिल्लीच्या विमानतळावर आली, तेव्हा ऐकीव वर्णनावरूनच रोहिणीनं तिला ओळखलं, आनंदानं तिचं स्वागत केलं. फ्रेश होऊन, थोडं खाऊन वाटल्यास आराम कर! मग उद्या जाऊ या दिल्ली फिरायला. रोहिणीनं जिव्हाळ्यानं तिला म्हटलं.
‘‘ओह नो! हा आमच्या भक्तिपंथाचा मेळावा काही अपरिहार्य कारणानी दिल्लीऐवजी मथुरेत घ्यावा लागतोय, तो मेळावा त्यांना रिशेड्युल करावा लागतोय,’’ कष्टी होऊन टेसा म्हणाली.
तिला आश्‍वस्त करून रोहिणीनं तिचा चार दिवसांऐवजी नव्या कार्यक्रमानुसार चांगला आठ दिवस पाहुणचार केला. या सुंदर विदेशी तरुणीला दिल्लीहून टॅक्सीनं एकटीला पाठवणं धोक्याचं ठरेल म्हणून स्वत: रोहिणी तिला सोडायला मथुरेला गेली आणि दहा दिवसांचा भक्तिपंथाचा कार्यक्रम आटोपल्यावर परत आणायला.
अमेरिकेत कुणी कुणाकडे असं रहायला जात नाही. फारच औपचारिकपणा आणि कोरडेपणा आहे आमच्याकडे. सख्खेसोयरेही सख्खेसोयरे नसतात आमच्याकडे. तुम्ही मात्र सर्वस्वी अनोळखी अशा माझं एवढं प्रेमानं स्वागत केलं. एवढे दिवस ठेवून घेतलं. तुमच्या ऋणातून उतराई कशी होऊ? माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखं काही नाही. विमानतळावर रोहिणीचा निरोप घेताना टेसा म्हणाली. पोस्टकार्डावर स्वत: रेखाटलेलं राधाकृष्णाचं चित्र तिनं रोहिणीला भेट म्हणून दिलं, तेव्हा स्वत:च्याही नकळत टेसानं आपल्या डोळ्यातलं पाणी निरपलं. महानगर रुक्षपणे पुन्हा आपल्या गतीनं झेपावू लागलं.
– रश्मी घटवाई
९८७१२४९०४७