मूर्तिपूजा

0
70

आपण सारे देवळात जातो. त्या वेळेस भक्तिभाव हृदयात असतो. परमेश्‍वरासमोर उभे राहून आपण आपले कान उपटतो. हळूच थोबाडीत मारून घेतो. साष्टांग लोटांगण घालतो. प्रदक्षिणा घालून देवाची मूर्ती हृदयात ठसावी म्हणून प्रयत्न करतो. परंतु, देवळाच्या बाहेर येताच आपला व्यवहार पूर्ववत सुरू होतो. देवळाच्या बाहेरही जेव्हा देव आपल्याबरोबर येऊ लागेल तेव्हाच मूर्तिपूजेचे सार्थक होईल.
मनुष्यप्राणी हा विभूतिपूजक आहे. आपल्यामध्ये ही प्रवृत्ती स्वयंभूच आहे. आपल्यापेक्षा जे मोठे आहे त्याचे आपण कौतुक करतो. आपल्याहून जे थोर आहे, बुद्धीने, हृदयाने महान आहे त्यांची पूजा करावी असे वाटते.
मूर्ती म्हणजे आकार, मूर्तिपूजा म्हणजे आकारपूजा. प्रत्यक्ष पूजा. आपल्या डोळ्यासमोर काहीतरी प्रत्यक्ष आपणास लागत असते. आपण जीवनाच्या प्रथमावस्थेत सारे आकारपूजक असतो. आपण व्यक्तीभोवती जमतो. व्यक्तीशिवाय आपले चालत नाही. जिचे डोळ्यांनी दर्शन घेऊ, जिचे शब्द कानांनी ऐकू, जिचे पाय हाताने धरू अशी मूर्ती आपणास पाहिजे असते.
मनुष्य प्रथम महान व्यक्तीला शरण जातो. आपल्या डोळ्यासमोर जी थोर विभूती असते तिच्याजवळ आपण जातो. परंतु, व्यक्ती ही क्षणभंगुर आहे. आज ना उद्या पडद्याआड व्यक्तीला जावयाचे आहे. ज्या महापुरुषाच्या शरीरावर आपण प्रेम केले ते शरीर एक दिवस गळून पडणार आहे.
ज्या विभूतीच्या चरणाशी आपण येऊन बसलो ती विभूती अदृश्य होते. परंतु, त्या विभूतीचा बाह्य आकार महत्त्वाचा नाही. त्या आकारातून जे दिव्य तत्त्व बाहेर पडत होते ते तत्त्व महत्त्वाचे होते. त्या महान विभूतीचे जे तत्त्वज्ञान मला वाटते त्या तत्त्वज्ञानाची मी पूजा करू लागतो. माझ्या दृष्टीने त्या महापुरुषाचे जे स्वरूप मला वाटते त्या स्वरूपाची मी उपासना करू लागतो.
व्यक्तिपूजेपासून आपण आरंभ करतो व तत्त्वपूजेत त्या आरंभाचे पर्यवसान होते. मूर्तीपासून निघून आपण अमूर्ताकडे जात असतो. आपण गणेश मूर्तीची पूजा करतो. आपण मूर्ती आणतो, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, परंतु दोन दिवस, दहा दिवस ठेवून त्या मूर्तीचे आपण विसर्जन करीत असतो. त्या मूर्तीतून अव्यक्त, अमर असा भाव कायमचा जीवनाशी जोडून त्या मूर्तीला आपण बुडवितो. मूर्तिपूजा हे आपले कायमचे ध्येय नाही. केव्हातरी मूर्तिपूजेच्या वर मला गेले पाहिजे हा त्याचा अर्थ आहे.
मानवाच्या आध्यात्मिक विकासाला मूर्तिपूजेइतकीच मूर्तिभंजकता आवश्यक आहे. आपण मूर्तिपूजक असतो. मूर्तिभंजकही असतो. काल ज्या मूर्तीची मी पूजा करीत होतो त्याच मूर्तीची मी आज पूजा करीन असे नाही. त्या मूर्तीचा उत्तरोत्तर विकास होत गेला पाहिजे. समजा मी लहानपणी आई-बाबांच्या मूर्तिपूजेत होतो, परंतु मोठा झाल्यावर ही मूर्ती दूर करून भारत मातेची मूर्ती पुजू लागतो. लहान आईचे मोठ्या आईत पर्यवसान होते. पुढे भारत मातेची मूर्तीही मला मग आवडत नाही. मी विश्‍वभराची मूर्ती बनवून तिची पूजा करतो. सर्व मानवजातीची मूर्ती करून तिची मी उपासना करतो. अशा प्रकारे उत्तरोत्तर आपण आपली मूर्तिपूजा विशाल करीत असतो.
अशा रीतीने मूर्तिपूजा ही विश्‍वपूजा होते. ती लहानशी मूर्ती म्हणजे अनंताची मूर्ती होते. परंतु, मूर्तिपूजेतील हा विकास सर्वांचाच होईल असे नाही. त्या मूर्तीतील अनंत हा आपल्या अनुभवास येईलच असे नाही. देवळातून बाहेर पडल्यावर त्या मूर्तीचे भान आपणास राहत नाही. त्या पाषाणमयी मूर्तीची पूजा करता करता सर्वत्र प्रभूच्या मूर्ती दिसू लागण्याचा योग कधी येत नाही. देवाची मूर्ती त्या मूर्तीच्या पलीकडे कधी जात नाही; परंतु मूर्तातून अमूर्ताकडे गेल्याशिवाय विकास साधणार नाही. समाधान मिळणार नाही.
आपण सारे देवळात जातो. त्या वेळेस भक्तिभाव हृदयात असतो. परमेश्‍वरासमोर उभे राहून आपण आपले कान उपटतो. हळूच थोबाडीत मारून घेतो. साष्टांग लोटांगण घालतो. प्रदक्षिणा घालून देवाची मूर्ती हृदयात ठसावी म्हणून प्रयत्न करतो. परंतु, देवळाच्या बाहेर येताच आपला व्यवहार पूर्ववत सुरू होतो. देवळाच्या बाहेरही जेव्हा देव आपल्याबरोबर येऊ लागेल तेव्हाच मूर्तिपूजेचे सार्थक होईल. आजकाल देवळातील देव देवळातच राहतो. तो आपण बाहेर आणीत नाही आणि यामुळेच समाजात अपार दु:ख व विषमता आहे. घरच्या आईचे स्मरण मला सदैव हवे. त्याप्रमाणे मंदिरातील मूर्तीचे स्मरण मला सर्वत्र हवे. ती मूर्ती त्रैलोक्य संचारणारी झाली पाहिजे. मला सर्वत्र तिचे दर्शन झाले पाहिजे.
भारतीय मूर्तिपूजा आपणास सांगते – जगात जेथे जेथे विभूतीमत्व दिसेल तेथे भगवंताचा अंशमान. सर्वत्र देवाचे दर्शन घ्यावयास शिकावयाचे आहे. मूर्तिपूजेचे हे पर्यवसान आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्या दिगंबराचे मंगल मंदिरच आहे. खर्‍या भक्ताला प्रत्येक पदार्थातून चिन्मयाचेच दर्शन होते.
मूर्तिपूजा करता करताच विश्‍व हीच मूर्ती वाटू लागली पाहिजे. मूर्तिपूजेत कृतज्ञतेची सुंदर कल्पना आहे. कृतज्ञतेसारखी सुंदर वस्तू जगात कोणतीही नाही. परमेश्‍वराने आपणास सर्व काही दिले आहे. त्याचे उतराई आपण कसे होणार? हा भाव प्रत्येकाच्या हृदयात असतो. पवित्र मंदिरात पवित्र होऊन बाहेरच्या जगात पवित्र व्यवहार करण्यासाठी जाणे हा मूर्तिपूजेचा हेतू आहे. जिकडे तिकडे देवाच्या मूर्ती आहेत. तारे पाहून हात जोडावेेसे वाटतात. फुले पाहून हात जोडावेसे वाटतात. थोर व्यक्ती पाहून प्रणाम करावासा वाटतो. भव्य देखावा पाहून नमावेसे वाटते. अनंत विश्‍वातील अनंत मंदिरे व अनंत मूर्ती.
– प्रा. डॉ. प्रज्ञा पुसदकर