जुस्तजूँ जिसकी थी…

0
139

अभिराम भडकमकर

तसा अभिरामला मी खूपच उशिरा भेटलो असं म्हणायला हरकत नाही. त्या आधी ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकाच्या संदर्भात एकदा फोनवर चर्चा झाली होती, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मी आणि डॉ. गिरीश ओक एका प्रोजेक्टवर चर्चा करत असताना त्याला काहीतरी सुचलं आणि त्यानेच अभिरामला फोन लावला. मग रीतसर माझी ओळख करून दिल्यानंतर तो फोन माझ्याकडे सुपूर्द केला. सलाम दुवा झाल्यानंतर मी त्याला आमच्या भेटीचा उद्देश व महत्त्व सांगून भेटीची वेळ निश्‍चित केली. मी तेव्हा चारकोपला आणि तो मालाडला असल्याने आम्ही दोघांनी इन्फिनिटीच्या फूड हबमध्ये भेटायचे ठरवले. पहिल्याच भेटीत आमचे सूर जुळले, स्नेह वाढला. काही अपरिहार्य कारणांमुळे आमचा तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नाही पण आमची मैत्री आजही अबाधित व वृद्धिंगत आहे. त्याच्या सर्वच लेखनाचं मी वाचन केलं असल्याने ‘माणूसपण आणि वास्तवता’ याच्याशी जवळीक व ‘कंटेंट आणि फॉर्म’ यावर हुकूमत असणार्‍या या अवलियाच्या प्रेमातच पडलो. अभिरामचं बालपण हे कोल्हापुरातच गेल्याने चित्रपटसृष्टीशी त्याचा संबंध न येता तरच नवल! त्याने अतिशय जवळून या चंदेरी दुनियेचं मायाजाल अनुभवलंय् याची प्रचिती त्याच्या आजवरच्या ‘नाटक, सिनेमा व लेखन’ कारकीर्दीतून सहज येऊ शकते. नाट्य-चित्र सृष्टीत निष्ठेने वावरणार्‍या अभिरामची लेखन शैली कल्पक परंतु अगदी सहज अशी आहे. त्याने चितारलेली पात्रे वास्तवतेशी नातं जोडलेली असतात. कारण त्या पात्रांच्या अंतरंगात डोकावून त्यांच्या व्यथा अलिप्तपणे मांडण्याची किमया त्याला साधली आहे. नाटक व सिनेमा या क्षेत्रात अभिराम लेखक, दिग्दर्शक व अभिनेता या नात्याने वावरल्याने त्याचा अनुभव व अभ्यास खूपच चांगला आहे आणि म्हणूनच कदाचित त्याचं या विषयावरील लेखन समर्थनीय ठरतं. तो अतिशय निष्ठावान व कल्पक असल्याने व असंख्य ग्लॅमरस रंगकर्मींचा सहवास लाभल्याने त्याच्या लिखाणात प्रगल्भता व अधिकार जाणवतो.
‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकातला वेडा मानला गेलेला सदा जेव्हा मानवी आयुष्याचं मर्म संदर्भासहित सांगतो तेव्हा सारं प्रेक्षागृह टाळ्यांचा गजरात त्याला दाद देतांना ‘खरं वेडं कोण’ या प्रश्‍नात पडतं. सुख-सुख म्हणून ज्याच्या मागे तुम्ही उर फाटेस्तोवर धावता आहात ते केवळ एक मृगजळ आहे. प्रथम स्वत:ला ओळखा, तुमच्या कल्पनांची व सुखांची ओळख करून घ्या आणि मगच जीवनाचा मार्ग आखा, अन्यथा या भौतिक सुखाच्या म्हणजेच मृगजळाच्या पाठीमागे धावता धावता आपल्याच माणसांना दुखावत आत्मिक सुखापासून कोसो दूर निघून जाल आणि स्वत:ला एकटेच सापडाल! ही सदाची शिकवण प्रेक्षकांना विचार करायला लावते. ‘आयुष्याच्या ओझ्यांनी कोलमडून पडलो, दारूवर तरी खापर फोडता येईल, म्हणून मी दारू पितो’ या सारख्या डॉ. श्रीधरच्या संवादांनी प्रेक्षकांना वास्तवतेचं भान आणण्याचा अभिरामचा प्रयत्न प्रामाणिक दिसतो. पण अक्षर दिवाळी अंकातील त्याच्या ‘कॉलम सेंटीमीटर’ या कथेला विदर्भ साहित्य संघाचा ‘शांताराम पुरस्कार’ लाभला आहे. त्याच्या ‘चुडैल’ या कथासंग्रहाने त्याचा स्वत:चा असा एक वाचकवर्ग तयार झाला होता. अभिरामने जिंदगी जिंदाबाद (२०००), देवकी (२००१), पछाडलेला (२००४), खबरदार (२००५), फुल्ल ३ धमाल (२००८), बालगंधर्व (२०११) व बाई वाड्यावर या(२०१६) असं विपुल लेखन केले असले तरीही त्याची खरी ओळख ‘बालगंधर्व’ या कादंबरीमुळेच झाली आणि तो विश्‍वविख्यातही झाला. अभिरामच्या मते सिनेनाट्यसृष्टी हा लेखनाचा, चर्चेचा व कुतुहलाचाच विषय असल्यानेच यातील अंतर्गत भानगडी कधी बाहेरच आल्या नाहीत. त्याच्या ‘अट एनी कॉस्ट’ या कादंबरीत सच्चा, अभिरुची संपन्न व सर्जनशील कलावंताची शोकांतिका अनुभवता येते. एकुणात ‘दूरदर्शन आणि सो-कॉल्ड रिअलिटी शो’ याचं वास्तवदर्शन या पुस्तकाच्या माध्यमाने वाचकांना अनुभवता येतं. अभिरामची पुस्तकं वाचल्यानंतरच त्याची खरी ओळख होते, तत्पूर्वी हा माझ्या मित्राचा अल्पसा परिचय!
नितीन देशपांडे
९४०३४९९६५४