त्याचं येणं…

0
140

तो येतो आणि ही सारी सृष्टी त्याचं स्वागत करते. कौलारू घरांवर, खिडकीच्या तावदानावर, रस्त्यावर, माळरानावर तो जोरानी बरसतो. कालपर्यंत जीवघेण्या उकाड्यात खितपत पडलेल्या आयुष्याला त्याच्यामुळे आज एक नवं चैतन्य जाणवायला लागतं. तो खरंच सखा आहे सर्वांचा. लहान मुलांचा आनंद तर शब्दांच्या पलीकडचा असतो. आई-बाबा रागावत असतानाही ते चिंब भिजतात. त्याच्या आगमनाचं तर ठीक आहे, पण नंतर त्याच्यात एक लहरीपणा येतो. पण त्यात त्याचा काय दोष? त्याला जबाबदार आपणच आहोत. त्याला घनदाट जंगलं आवडतात. पण ती आपण राहू दिली नाहीत. आपल्या अवतीभवतीचं वातावरण आपणच दूषित केलंय्. त्याचाच त्याला अडथळा होतो.
प्रचंड उकाड्यानंतर त्याच्या आगमनाची वाट अगदी सर्वांनाच असते. आकाशात काळे ढग दाटून आले की, तो आता येणार हे नक्की असतं. सारी सृष्टी मग त्याच्या स्वागतासाठी तयार होते. रानावनात झाडं, पशुपक्षी, ही जमीन, घरं आणि इतकंच नाही तर कॉलेजचं कॅण्टींनसुद्धा.
तो येतो सुरुवातीला हलक्या सरी आणि नंतर धो धो बरसतो. आनंदाचा उच्चांक वाढतो आणि टीव्ही चॅनलवर, वृत्तपत्राच्या बातम्यांतून सर्वत्र अगदी त्याचं स्वागत होत असते. दुसर्‍या दिवशीचा दिवस मग काही वेगळा असतो. कालपर्यंत तापलेले रस्ते, दुकानं आणि कॉलनीतला परिसर, गावातील शेतात एक आल्हाददायक वातावरण असतं. दु:खानंतर सुख येतं, ही बाब आपल्याला अनुभवायला मिळते. प्रचंड त्रास आणि जीवघेण्या वेदनेनंतर सुख येतंच, याची खात्री त्यााच्यामुळे प्रत्येकाला पटते. तो आपला सखा आहे, तो नाहीतर आपलं जीवन नाही, आपली स्वप्न नाहीत. तो आहे म्हणून आपण सर्व आहोत.
तो येतो आणि पाहता पाहता सारं काही बदलून जातं. एक कलाकाराच्या प्रतिभेला नवी पालवी फुटते. नव्या कल्पनांच्या हिंदोळ्यावर एका कलाकाराची प्रतिभा झोके घ्यायला लागते. प्रत्येक मनात एक आनंद संचारतो. शाळेला जाणारा मुलगा रिक्षातून किंवा आपल्या बाबांच्या स्कूटरवरून रेनकोट घालून जाताना त्याच्याशी खेळत जातो. शाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्यातून उड्या मारताना खूपच मजा येते. मग तो आपल्या अवतीभवतीच असतो. ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहिलं की तो बरसताना दिसतो. शाळेच्या पटांगणात तो बरसत असतो आणि तेवढ्यात वर्गात ओल्या केसांनी आलेले शिक्षक आत येताना बाहेर त्याच्याकडे पाहून ‘आज पावसानं चांगलीच हजेरी लावली असं म्हणतात. लहानग्यांचा तो मित्र असतो. केव्हा केव्हा ऐन शाळेला जायच्यावेळी तो बाहेर येत असतो आणि आज घरीच मजा करू म्हणून मुलगा आईला बिलगून ‘आई, या पावसात मी शाळेला जाणार नाही, ’ असं म्हणून तिला घरी राहण्याची परवानगी मागते. मुलाची हीसुद्धा इच्छा असते की, आज बाबांनीही ऑफिसला जाऊ नये आणि आईनेही घराबाहेर पडू नये. जणू मुलगा पावसाला विनंती करत असतो की, थोडा वेगाने बरस आणि मग पाऊसही त्याची इच्छा पूर्ण करीत जोरानी बरसतो आणि पावसामुळे घरातल्या सर्वांनी आज सुट्‌टी घेतल्यामुळे घरी आनंद साजरा होतो.
आजचा दिवस खरा तर त्याचाच असतो आणि सायंकाळी तो रिमझिम रिमझीम बरसत असतो, तेव्हा खिडकीचे पडदे बाजूला सारून तिथल्या टेबलावर काहीतरी त्याच्या साक्षीनं लिहिल्या जातं. ती एखादी कविता असते किंवा एखादी कल्पना, जी आजवर मनात कुठंतरी पुसटशी असते पण आज ती प्रत्यक्षात उतरते.
कुठल्यातरी घरात हा प्रसंग असतो पण कुठंतरी रस्त्यावर रेनकोट, छत्रीतून रस्त्यावरची वर्दळ सुरू असते. कुठल्यातरी कॉलेजमध्ये कॅण्टींगला मुलं थांबलेली असतात आणि गरम गरम भजी आणि चहा चाललेला असतो. काही वर्षांपूर्वीचं असं काही त्याचं स्वागत होतं आणि आता बदलत्या काळानुसार त्याचं स्वागत बदललेलं आहे. आता त्याचं आगमन झाल्यानंतर त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढल्या जातात. तळहातावर झेललेला पाऊस आता फेसबुक आणि इतर साईट्‌सवर पोस्ट केल्या जातो. पाऊस आयुष्यातल्या अनेक सुखांचा साक्षीदार असतो जणू. तो आला की काही जुन्या आठवणीही ताज्या होतात.
…आणि तिकडे गावाकडे तर विचारूच नका. आतापर्यंत उजाड झालेले माळरान ओले चिंब होऊन जाते. ‘पेरते व्हा!’ हा स्वर झाडांच्या आडून ऐकायला येतो. गावातील काही घरांना कुलूप लावल्या जाते. कुठंकुठं काही घरातील म्हातारी माणसं सोडली तर सारी शेतावर पेरणीच्या कामावर असतात. या मातीचं त्याचं एक जन्माजन्मांतरीचं नातं. पेरणी करणारे हात एकीकडे आनंदी असतात तर मनात कढही असतो त्यांच्या. मागील वर्षी तू वेळेवर आला नाहीस किंवा आला तर मध्येच गायब झालास तर त्याच्या मागील वर्षी गरज नसताना बरसला आणि शेतातील पिकं धुऊन नेलीस, ही तक्रार मनात असते पण एका नव्या आशेनं ते जुनं सारं विसरून नव्याने त्याचं स्वागत करून यंदा तू असा धोका देणार नाहीस, असं मनातून त्याच्याशी संवाद करीत नवी स्वप्न मातीत पेरत असतात. तसं त्याला ते सारं कळतं. पण त्याचाही त्यात काही दोष नसतो. त्याला जबाबदार असतो आपणच. त्यालाही आपल्याविषयी तक्रार आहेच. पण तोही सारं विसरतो आणि दरवर्षी येतोच. त्याला तशी घनदाट जंगलं आवडत होती पण आपण तिथं इमारतीची जंगलं केली. आपल्या घरातील, बाहेरील नको तेवढ्या कचर्‍यामुळे हे वातावरण प्रदूषित केलं आणि त्याला अडथडा केला त्यात त्याचा काय दोष ? प्रगतीच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली शहरं फुगवली. आपलं सुख पाहताना आपण दुसर्‍यांचा विचारच केला नाही. पण त्याची शिक्षा गावातल्या आपल्या लोकांना झाली. आता तो वेळेवर येत नाही, आला तर मध्येच गायब होतो. कधीकधी इतका बरसतो की सारी शेतंच्या शेतं वाहून घेऊन जातो. मग गाव उपाशी झोपलं तरी शहरं सुखातच असतात. आपण त्याच्यावर अन्याय करतो तो आपल्यावर नाही. आता वेळ आली आहे, की आपण या सर्व बाबींचा विचार करायला हवा. – दीपक वानखेडे/९७६६४८६५४२