चौफेर

0
147

अपयशी पोटदुख्यांचे कडबोळे!

आजपासून तीन वर्षांपूर्वीपर्यंत या देशाचा कारभार एकदम कसा सुरळीत चालला होता. ना व्यापार्‍यांचे प्रश्‍न होते, ना शेतकर्‍यांचे. ना सरकारी कर्मचारी चिंतित होता, ना इथला स्वयंघोषित पुरोगामी. आटपाट नगरात सर्वदूर सुराज्य नांदत होतं. सगळीकडे सुख, चैन, समृद्धी, शांती यांचीच रेलचेल होती. तत्कालीन सरकारेही कशी एकदम स्वच्छ, चारित्र्यवान होती! ना घोटाळे, ना भ्रष्टाचार. आता राजेच एवढे इमानदार म्हटल्यावर प्रजा दु:खी असण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नव्हता. जणू रामराज्यच म्हणा ना! त्यामुळे चौफेर ‘आनंदिआनंद’ होता… तरीही कुणालाही पोटशूळ उठत नव्हता. कारण सारेच उदारमतवादी होते. ना सुंदोपसुंदी, ना भाऊबंदकी. भांडणाचे तर कुणी नावही काढेना! राज्य अशोकरावांचं राहिलं काय नि पृथ्वीराजांचं असलं काय, चव्हाण सत्तेत आहेत म्हटल्यावर राणेंनी आनंदोत्सव साजरा करावा, इतकी दिलदारी होती. समजूतदारपणा होता. त्यामुळे राज्य कुणाचेही असले, तरी त्याबाबत कुणालाही पोटदुखी असण्याचे काहीएक कारण नव्हते. लोकशाहीव्यवस्था शिरसावंद्य मानणार्‍यांच्या त्या समूहात जनतेने निवडून दिलेल्या सरकारबद्दल सर्वांच्याच मनात नितांत आदर होता. वर्षानुवर्षे आपणच सत्तेत असलो पाहिजे, असा अट्‌टहास धरणार्‍या कॉंग्रेस नामक पक्षाला लोकही विनासायास निवडून द्यायचे. त्या पक्षातली घराणेशाही सर्वसामान्य जनतेनेही एव्हाना मान्य करून टाकली होती. एवढी की, तो पक्ष अन् त्या घराण्यातील सदस्य, हा देश त्यांच्या बापजाद्यांची जहागीरदारी असल्यागत बेदरकारपणे वागू लागले होते. मुजोरी पुरती अंगात भिनली होती. ती जहागीरदारी जनतेला मान्य होती तोवर सारेच ठीक चालले होते. अगदी त्या सत्तेतल्या घटकांनाही देशात काही वावगे चालले असल्याचा कधी भास झाला नाही. झाला तरी, जनताच पायाशी लोळण घेत असल्याने त्यांनी त्याची कधी पर्वा केली नाही. त्यामुळे ऐटीत जगत माजोरी चालली होती त्यांची- कितीतरी वर्षे. पण… पण झाले काय की, हळूहळू लोकजागर होत गेला. लोक जागृत झाले. कायम लाभत आलेल्या सत्तेच्या माध्यमातून एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून चाललेल्या हुकुमशाहीचा अस्त झाला. कुणालाच काहीही वावगे वाटू नये इतकी ती हुकुमशाही अंगवळणी पडलेल्या देशात लोकांनी एकेदिवशी त्या पक्षाला सत्तेतून हद्दपार केले. सत्तेपासून इतके दूर नेऊन फेकले की, तो पक्ष अन् त्याचे नेते, अगदी विरोधी पक्ष म्हणवून घेण्याच्याही लायकीचे राहिले नाहीत! जवळपास तीन वर्षे होत आलीत आता तो बदल घडून. कामाची स्वतंत्र शैली, लोकोपयोगी कामांचा धडाका, पारदर्शकता, लोकांच्या मनात निर्माण होऊ लागलेला विश्‍वास, यामुळे दिल्लीत सत्तारूढ झालेले नवे सरकार नजीकच्या भविष्यात सत्ताच्युत होण्याची अन् त्यांच्या जागी स्वत: विराजमान होण्याची शक्यता सुतराम दिसत नसल्याचे ध्यानात येताच, संसदेतल्या विरोधी बाकांवरील सदस्यांच्या अस्वस्थेची तीव्रता आता दिवसागणिक वाढू लागली आहे. आपल्या शिवायही कुणी या देशाचा कारभार चालवू शकतो, राज्याचा शकट हाकू शकतो, हे कल्पनेतही मान्य नसणारे लोक थयथयाट करू लागले. सगळीकडे अराजक माजले असल्याचा देखावा निर्माण करू लागले. आता देशाचं कसं होईल, अशी चिंता वाहू लागले. आपल्याविना देशाचं वाटोळं होत असल्याचा कांगावा करू लागले… इतकेच नव्हे, तर हे सारे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपडही सुरू झाली. त्यासाठी त्यांनी आरंभलेल्या नौटंकीचा सारा देश साक्षीदार आहे…
व्यवस्थापनशास्त्राचा एक अलिखित नियम आहे. एखाद्या संस्थेत असो वा मग सरकारमध्ये, तिथली प्रमुख व्यक्ती चांगले काम करू लागली, धडाडीने काहीतरी वेगळे करू लागली, आपल्या आगळ्या कार्यशैलीने यशस्वी ठरू लागली, ती जराशी प्रसिद्धीस सिद्ध होऊ लागली, लोकप्रिय ठरू लागली की, मग काहींना अकारणच पोटशूळ उठतो. त्या यशस्वी व्यक्तीच्या विरोधात सार्‍या ‘पोटदुख्यां’चे कडबोळे तयार होते. सभोतालचे काही नतद्रष्ट लोक स्वत:चे अपयश पदराआड दवडून त्यालाच अपयशी ठरविण्यासाठी धडपडू लागतात. त्याच्या बदनामीचे षडयंत्र रचू लागतात. त्याला चूक ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न करू लागतात. त्याच्या विरोधात आरोपांचे डोंगर उभे करण्याचा प्रयत्न होतो… दिल्लीतले सरकार सध्या व्यवस्थापनशास्त्रातल्या त्याच अलिखित फंड्याचे ‘परिणाम’ भोगताहे. कालपर्यंतच्या झाडून सार्‍या नाकर्त्यांची फौज आज, सारे बळ एकवटून सरकारविरुद्ध मर्दुमकी दाखवत दंड थोपटून उभी राहिली आहे. जणूकाय नव्या सरकारच्या काळात सारा देश अस्ताव्यस्त झाला असल्याच्या थाटात ओरड चाललीय् त्यांची. रोज कुठले ना कुठले झेंगट उभे करण्यात त्यांची शक्ती खर्ची पडतेय्. कधी त्यांना काळे धन अद्याप परत आले नसल्याची खंत सतावते, तर कधी देशात असहिष्णुता माजली असल्याची आवई ते उठवतात. पुरस्कार वापसीची नौटंकी संपली की, मग कथित गोरक्षकांच्या धिंगाण्यावर बोलायला ते सज्ज होतात. इथल्या मुस्लिमांना वाईट वाटू नये म्हणून कालपर्यंत पाकिस्तानच्या कुरापतींवर बोलण्याचेही जे टाळत होते, ज्यांच्या षंढपणावर कालपर्यंत टीकेचे आसूड ओढले जात होते, त्या तमाम जनांच्या देशभक्तीला आता अचानक उधाण आले आहे. त्या सर्वांना आता भारताने पाकिस्तानला थेट युद्ध करूनच ‘करारा जवाब’ दिलेला हवा आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर परवापरवापर्यंत आपण काहीही करू शकलो नाही, याची जराशी लाज बाळगायचे सोडून कालच्या आंदोलनात राष्ट्रवादीपासून तर कॉंग्रेसपर्यंत अन् रिपाइंपासून तर कम्युनिस्टांपर्यंत सारे कसे एकत्र आले, ते बघितलेच संपूर्ण देशाने. शेतकर्‍यांच्या हितापेक्षाही स्वत:चा अहं जपण्यासाठी बाहेर पडून ज्यांनी खिंडार पाडत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे तीनतेरा वाजवले, ते तमाम नेते काल, शेतकर्‍यांनी एकत्र येणे कसे आवश्यक आहे, हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते. बळीराजाच्या हिताच्या बाता करीत होते. मुख्यमंत्र्यांना इगो जपू नका म्हणून सांगत होते. शेतमालाला हमी भाव मिळावा, ही मागणी काय कालपरवाची आहे? कोणी पूर्ण केली ती इतक्या दिवसात? मग एवढी वर्षे ज्याची पूर्तता करता आली नाही, ती मागणी आज- आत्ताच पूर्ण झाली पाहिजे, असा हेका कशासाठी होता त्यांचा? आता आपण सत्तेत नाही हे लक्षात घेऊन, जे सध्या सत्तेत आहेत त्यांचा खेळ मांडण्यासाठी? लोकांपुढे त्यांची फजिती करण्यासाठी? एवढी सोपीच होती कर्जमाफी, तर मग त्यांनी का नव्हती केली? शेतकर्‍यांच्या घरादारात श्रीमंती ओसंडून वाहात होती की, शेतकर्‍यांच्या आत्महत्येची प्रकरणं घडत नव्हती तेव्हा? त्या वेळी मूग गिळून गुमान बसलेली मंडळी आता शेतकर्‍यांची कड घेऊन रस्त्यात उतरलेली बघितल्यावर काय विचार करायचा सांगा?
सरकारविरुद्ध बोलण्याची नुसती संधी मिळाली, तरी बेताल बरळत सुटणार्‍या लोकांची भाऊगर्दी जमू लागली आहे अलीकडे चौकाचौकात, सोशल मीडियावर. रोहित वेमुला अन् कन्हैया कुमारसारखे लोक आणि गायीचे मांस खावे की न खावे, यासारखे तकलादू मुद्देही त्यांना पुरेसे असतात. त्यावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चा ते घडवून आणू शकतात. त्यांच्या दृष्टीने तर या देशाचे पंतप्रधान काहीच कामाचे नाहीत. ते फक्त बोलतात. विदेशात फिरतात. बस्स! काम काहीच करत नाही. हो! काम तर चोवीस तास व्हॉट्‌स ऍप, फेसबूकवर घालवणारे टवाळखोरच करतात की नाही? पण दुर्दैव असे की, व्यवस्थापनशास्त्राचा नेमका ‘तोच’ फंडा सिद्ध करण्यासाठी हे रिकामटवळे, भाजपाला वैचारिक विरोध करण्याकरिता पातळी सोडून धडपडणारे काही लोक अन् राजकारणात अपयशी ठरलेले काही ‘पोटदुखे’ पंतप्रधानांच्या यशाविरुद्ध रान माजवायला आज कडबोळे करून सरसावले आहेत…
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३