साप्ताहिक राशिभविष्य

0
849

रविवार, १८ ते २४ जून २०१७
सप्ताह विशेष ः सोमवार, १९ जून- भद्रा (१४.१२ ते २५.०९), दत्तभक्त श्री भाऊसाहेब वैद्य पुण्यतिथी- नागपूर; मंगळवार, २० जून- योगिनी एकादशी, शनी वक्र गतीने वृश्‍चिक राशीत (२८.५२), संत निवृत्तीनाथ यात्रा, त्र्यंबकेश्‍वर, हरिबुवा पुण्यतिथी- आकोट (अकोला); बुधवार, २१ जून- प्रदोष, रविचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश, कर्कायन, दक्षिणायन, वर्षा ऋतू प्रारंभ, श्री तुळशीबन महाराज पुण्यतिथी- महागाव (यवतमाळ), विश्‍व योग दिन; गुरुवार, २२ जून- शिवरात्री, अयन करिदिन, भद्रा (१५.३६ ते २५.४२), सौर आषाढ मासारंभ; शुक्रवार, २३ जून- दर्श अमावास्या (प्रारंभ ११.४८), संत गणपती महाराज पुण्यतिथी- मंगरूळ दस्तगीर (अमरावती); शनिवार, २४ जून- अमावास्या समाप्त ७.५८, आषाढ शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी ( ७.५८ ते २८.१८)- श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी पुण्यतिथी- गरुडेश्‍वर, महाकवी कालिदास दिन, भगवंत महाराज पुण्यतिथी- आर्वी (वर्धा).

मेष- आरोग्याची काळजी घ्या
या आठवड्यात आपल्या राशिस्वामी मंगळासोबत रवि येऊन बसला आहे. त्यामुळे मंगळाचे अस्तंगत असणे आणखी वाढले आहे. अशातच चंद्र आपल्या व्ययस्थानातून या आठवड्याची परिक्रमा सुरू करीत आहे. व्यय हे खर्चाचे आणि इस्पितळातील वास्तव्याचे स्थान आहे. राशिस्वामीला बळ नसल्याने या दोन्ही गोष्टी बळावण्याची भीती आहे. शिवाय मंगळावरील शनीची अपघातप्रवण दृष्टी आहेच. मागील आठवड्यात दिलेला इशारा लक्षात ठेवा. काळजी घ्या. बाकी नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक लाभ होणार असला तरी शिल्लक किंवा बचत म्हणून हाताशी काही राहण्याची शक्यता कमी राहील. वैवाहिक जीवनात काही तंटे-बखेडे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शब्दाने शब्द वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संयम दाखविला पाहिजे. आठवड्याच्या पूर्वार्धात मन प्रसन्न राहील. शुभ दिनांक -१९, २०, २१, २२
वृषभ- थोडे नियोजन आवश्यक
आपला राशिस्वामी शुक्र हर्शलसोबत व्ययस्थानात आहे. राशीत बुध आणि रविच्या निकट असलेला मंगळ अस्तंगत आहे. चंद्र मात्र लाभस्थानातून आठवड्याची सुरुवात करीत आहे. त्याचे या आठवड्यातील भ्रमण आपणांस बव्हंशी उपयुक्त आहे. बुध व शुक्राच्या स्थितीमुळे काही लोकांना त्यांच्या प्रकृतीच्या संबंधाने विशेष योग संभवतात. प्रकृतीसाठी लाभात्मक ठरणारे उपचार असे त्याचे स्वरूप राहू शकेल. त्यामुळे काही जणांना विशेषत: डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक असली तरी खर्चाला वाटा फुटलेल्या असणार. त्यामुळे थोडे नियोजन करून त्यानुसार वागणे, व्यवहार करणे फायद्याचे राहू शकेल. ठरविलेले काम होणे, सहकारीवर्गाची मदत मिळणे, वरिष्ठांची मर्जी लाभणे असा आनंददायक प्रवास राहू शकतो. शनी-मंगळाची अपघाती- कुरापत मात्र दुर्लक्षू नये.
शुभ दिनांक-२१, २२, २३, २४.
मिथुन- उमेद टिकवून ठेवा
आपला राशिस्वामी बुध या आठवड्यात व्ययस्थानात अस्तंगत आहे. राशिस्थानी लाभेश मंगळ रविच्या सान्निध्यात अस्तंगत आहे. या अस्तंगत ग्रहांच्या कचाट्यात आपण सापडले आहात. अशात फक्त दशमात असलेला चंद्र आपणास दिलासा देणार आहे. राशीतील रवि कार्यक्षेत्रातील आपला प्रभाव वाढवू शकतो. काहींना सज्जनांचा मार्गदर्शक सहवास लाभू शकतो. सुखस्थानातील गुरू ती जबाबदारी पार पाडेल, असे वाटते. त्याच्याच योगाने व्यवसायात काही चांगल्या घडामोडी घडू शकतात, मात्र या सार्‍यासाठी आपली मानसिक व शारीरिक उमेद टिकू न राहणे गरजेचे राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. खर्चावर ताबा हवा. सप्तमातून वक्री शनी व राशीतील मंगळ आरोग्याबाबत विघातक परिस्थिती निर्माण करू शकतात. त्याची काळजी घ्या. काहींना प्रवासाचे, तीर्थाटनाचे योगदेखील संभवतात.
शुभ दिनांक-१८, १९, २०, २१.
कर्क- बेसावध राहू नका
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशिस्वामी चंद्र भाग्यात आहे. लाभ आणि व्ययस्थानात अस्तंगत बुध व मंगळ आहेत, मात्र दशमातील शुक्र काही उत्तम योग देऊ शकेल असे वाटते. नोकरी-व्यवसायात आपणांस उत्तम योग चालून येतील. नवे करार, नव्या क्षेत्रात पदार्पण वगैरे संभवते. यांचे लाभ आपणास अस्तंगत ग्रहांच्या प्रभावाने लगेच मिळणार नसले तरी ते काही काळानंतर योग्य प्रकारे फलद्रूप होताना दिसतील. आपण मुळात भावनाप्रधान आहात. या काळात आपल्या भावनांना हात घालणारे काही प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. आपल्या भावुकतेचा कोणी गैरफायदा घेत तर नाही ना, याचे भान ठेवा. दरम्यान, अयोग्य स्थानातून होणारा शनी-मंगळ यांचा अपघात प्रवण प्रतियोग काळजी घ्यावयास लावणारा आहे. कुठल्याही प्रकारे बेसावध राहू नका.
शुभ दिनांक-१८, २०, २२, २३.
सिंह- मेहनत घ्यावी लागणार
आपला राशिस्वामी रवि सुरुवातीला लाभ स्थानात मंगळासोबत आहे. त्याच्या प्रभावाने मंगळ व बुध अस्तंगत झाले आहेत. राशीत राहू असून अष्टम या पीडादायक स्थानातून चंद्राचे परिभ्रमण सुरू होणार आहे. अतिशय मानसिक ताण- तणावाचा हा आठवडा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. धनस्थानातील गुरू आर्थिक पेच निर्माण होऊ देणार नसला तरी हातात काही बचत राहील असे होण्याचीही शक्यता कमीच दिसते आहे. रवि लाभातून आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल, परंतु व्यावसायिक उद्दिष्ट गाठण्यासाठी जरा मेहनत घ्यावी लागेल. रवि व त्याचवेळी मंगळावरील वक्री शनीची दृष्टी व होणारा प्रतियोग आरोग्याच्या संबंधात काहीसा विघातक ठरू शकतो. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. अपघाताच्या प्रसंगापासून सावध असले पाहिजे.
शुभ दिनांक- २०, २२, २३, २४
कन्या- पुरेशी खात्री करून घ्या
आपला राशिस्वामी बुध भाग्यस्थानात अस्तंगत असून राशिस्थानी गुरू आहे. दशमात आलेल्या रविच्या सान्निध्यामुळे तेथील मंगळही अस्तंगत झाला आहे. चंद्र सप्तम स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करणार आहे. दरम्यान, प्रतियोगात असलेल्या मंगळ व शनीची आपल्या राशीवर दृष्टी येत असल्याने त्याचा वेगळाच ताप सहन करावा लागू शकतो. निर्बली राशिस्वामीमुळे गुरूच्या शुभदृष्टीचा व चंद्राच्या शुभ भ्रमणाचा फारसा लाभ होण्याची शक्यता कमी असली तरी अगदीच निराशाजनक स्थिती नाही. व्यावसायिक यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे जरा दगदग वाढू शकते. कुठलेही नवे पाऊल उचलताना अगोदर पुरेशी खात्री करून घ्या. विशेषत: आर्थिक व्यवहारात काळजी घेतली पाहिजे. प्रकृतीसंबंधी कोणताही त्रास उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घ्या. वाहने सांभाळून चालवा.
शुभ दिनांक- १८, १९, २२, २३.
तुळ- वैवाहिक व व्यावसायिक योग
आपला राशिस्वामी शुक्र सप्तमात हर्शलसोबत आहे तर चंद्र या आठवड्यात षष्ठ स्थानातून प्रवासाला आरंभ करीत आहे. चंद्र दशम या कर्मस्थानाचा स्वामी असून, तो षष्ठ या दुसर्‍या कर्मस्थानात आला आहे आणि तो गुरूच्या दृष्टीने पुलकित आहे. हा चंद्र नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उत्तम सुरुवात या आठवड्यात करून देऊ शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्या काही तरुणांना या काळात रोजगार गवसू शकतो. तसेच शुक्र सप्तम या जोडीदाराच्या स्थानातून चांगले योग देत असल्याने तो वैवाहिक व व्यावसायिक जोडीदारदेखील मिळवून देऊ शकेल. त्यामुळे या आठवड्यात या दिशेने येणार्‍या चांगल्या योगांचा पूरेपूर लाभ घेतला पाहिजे. शनी-मंगळ प्रतियोग काही जणांना कष्टप्रद प्रवासाचे योग देऊ शकतो. तसेही हा प्रतियोग शुभंकर नसल्याने सावधच असले पाहिजे.
शुभ दिनांक- १८, २०, २१, २४
वृश्‍चिक- तणावपूर्ण परीक्षेचा काळ
आपला राशिस्वामी मंगळ या आठवड्याच्या सुरुवातीला अष्टम या पीडादायक स्थानात रविच्या सहवासात अस्तंगत आहे, तर त्याचा धनस्थानातील वक्री शनीशी प्रतियोग झाला आहे. साडेसातीचा एक वेगळाच टप्पा सुरू झाला असून, तो या काळात काहीसा अधिक कष्टदायक आहे. निर्बल मंगळ, राशीत येऊ घातलेला वक्री शनी तापदायदक ठरणार आहेत. साडेसाती हा परीक्षेचा काळ असतो. त्यातही हा आठवडा म्हणजे गणिताचा पेपर आहे. मानसिक ताण-तणाव, नातेवाईक, अधिकारी व व्यवसायातील आव्हाने यांचा प्रचंड दबाब या काळात जाणवू शकतो. निर्माण होणार्‍या अडचणीच्या परिस्थितीत आपण आपोआप गुरफटले जाणार आहात व प्रवाहात वाहात वाहण्याशिवाय काही करता येणार नाही, त्यामुळे पुढ्यात येणार आहे त्याचा डोळसपणे स्वीकार करून स्वत:वरील ताण कमी करता येऊ शकेल. प्रकृतीकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक- १८, १९, २२, २३
धनू- आपण बरे आपले काम बरे
आपला राशिस्वामी गुरू सध्या दशम स्थानात असून, राशिस्थानी वक्री शनी सप्तमातील रवि व अस्तंगत मंगळाशी प्रतियोग करीत आहे. चंद्र आठवड्याची सुरुवात सुखस्थानातून करीत आहे. रवि, शनी व मंगळ यांची स्थिती फारशी चांगली नाही. हे पापग्रह पापयोगात आहेत. साडेसातीत ही स्थिती अनुकूल नाही. त्यामुळे सध्यातरी आपण बरे व आपले काम बरे यानुसार कामाकडे लक्ष केंद्रित करावयास हवे. नसत्या उठाठेवी, नसत्या भानगडीत लक्ष घालणे टाळा. सध्यातरी आपल्याशी जे संबंधित नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. तरच आपला टिकाव लागणार आहे. पंचमातला शुक्र कला, विलास व कल्पना रम्यतेत गुंतवू शकतो. आपली आवड व्यसनात परिवर्तित होणार नाही याची काळजी घ्या. झटपट लाभाच्या मागे धावणे योग्य नाही. प्रकृतीकडे लक्ष द्या. अपघाताचे प्रसंग टाळा.
शुभ दिनांक- २०, २१, २३, २४.
मकर- बेकायदेशीर मार्ग टाळा
आपला राशिस्वामी शनी व्ययस्थानात वक्री असून, तो रवि व अस्तंगत मंगळाच्या प्रतियोगात आहे. ही फारशी शुभ स्थिती नसतानाच चंद्र या आठवड्याची सुरुवात पराक्रम स्थानातून करीत आहे. तो भाग्याला पाहात असल्याने काही सुखाचे क्षण देऊ शकतो. त्यामुळे हा काळ अल्प अनुकूलता व बरीचशी प्रतिकूलता अशा मिश्र योगांचा असणार आहे. आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक स्तरावर आपल्याला विविध भूमिका साकारताना याचा पदोपदी अनुभव येईल. या सार्‍यात वावरताना कुठेही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नका. शनी अशा संधीत कधीच साथ देत नाही. त्यामुळे प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. आर्थिक आघाडीवर सध्या समाधानाची स्थिती राहील. थोडे, थोडे का होईना खिसा भरत राहील. दरम्यान, पापग्रहांचा प्रतियोग पाहता प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
शुभ दिनांक- १८, १९, २२, २३
कुंभ- जबाबदारीने वागावयास हवे
या आठवड्याच्या आरंभी आपला राशिस्वामी शनी लाभस्थानात वक्री असून त्याचा पंचमातील रवि व अस्तंगत मंगळाशी प्रतियोग होत आहे. राशिस्थानातील नेपच्यून वक्री झालेला असून त्यासोबत केतू आहे. थोडक्यात पापग्रहांची उपद्व्यापी नजर आपल्या राशीभोवती आहे. चुकीच्या कामाची पावती चुकीचीच मिळणार हे सूत्र ध्यानात ठेवून वागण्याचा हा काळ आहे. त्यामुळे आपला मार्ग, आपले विचार, आपली दिशा, आपल्या सहवासातील माणसे आणि आपले व्यवहार पुन्हा पुन्हा तपासून पुढे जायला हवे. एखादी मोठी ठेच कधीही बसून होत्याचे नव्हते करू शकते. वैवाहिक जीवनात राहू काही वितुष्ट आणू शकतो, तर रवि-मंगळ संततीच्या बाबतीत चिंता निर्माण करू शकतात. आपलाच हेका चालवता येणार नाही. समाजात जबाबदारीने वागा. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक- १८, १९, २३, २४.
मीन- सकारात्मक विचारसरणी असावी
आपला राशिस्वामी गुरू सप्तमस्थानातून आपल्या राशीला बळ देत आहे, तर चंद्र आपल्याच राशीतून या आठवड्याच्या भ्रमणाला सुरुवात करीत आहे. अशा या सुयोगात वक्री शनी व त्याच्याशी प्रतियोग करणारे रवि व अस्तंगत मंगळ अडचणीचे बांध घालण्याच्या प्रयत्नात आहेत. घर व कार्यस्थान या पापग्रहांच्या विळख्यात सापडले असताना अत्यंत सकारात्मक विचारसरणीतून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. घरातील वातावरण तणाव, ज्येष्ठांची आजारपणे, भाऊबंदकीची प्रकरण आणि मतभेदाच्या वातावरणात विखुरले जाऊ शकते, तर कार्यक्षेत्र स्पर्धा, अधिकार्‍यांची नामर्जी, कामाचा तणाव, असहकार्य यात ढवळून निघू शकते. त्यामुळे निराश न होता परिस्थितीचा सरळमार्गी भूमिकेतून सामना करा. यश मिळेल. या सार्‍यात प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष होऊ नये.
शुभ दिनांक- १८, १९, २०, २१.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६