0
65

अन्वयार्थ
केवळ उत्तर भारतातील एक मोठा सामाजिक वर्ग म्हणजेच संपूर्ण भारत देश नाही, हे गायीवरून उत्तेजित होणार्‍या विवेकानंद आणि वीर सावरकरांच्या भक्तांनी लक्षात घेतले पाहिजे. जशी हिंदी म्हणजे संपूर्ण हिंदुस्थान नाही आणि उर्वरित भाषांप्रती आदर आणि आत्मीयता दाखविल्याशिवाय भारताची एकात्मता शक्य नाही, त्याचप्रमाणे खान-पान आणि पोषाखाच्या बाबतीतील उत्तर भारताचे नियम, कायदे सार्‍या देशाला कसे लागू होऊ शकतात?
केरळ आणि बंगळुरूत सार्वजनिक रीत्या ज्या क्रूरकर्मा आणि राक्षसी वृत्तीच्या लोकांनी गाय कापली तो अक्षम्य असा गंभीर गुन्हा आहे. त्यांनी केलेली गोहत्या म्हणजे केवळ भारतीय संविधानावरच आघात नसून भारताची काया व मनावर केलेला आघात आहे. ज्याप्रमाणे मोहम्मद घोरीने सोमनाथचा विध्वंस करून आणि बाबराने रामजन्मभूमीवरील मंदिर तोडून कोट्यवधी भारतीयांच्या मनावर वज्राघात केला, त्याचप्रमाणे गाय कापण्याचे नृशंस कृत्य या नराधमांनी केले आहे. एखादा मनुष्य एवढ्या नृशंसपणे व तेही सार्वजनिक रीत्या कुणा पशूची हत्या करून वर पुन्हा राजकीय वक्तव्ये करू शकतो. आपण पिशाचांविषयी ऐकलेच असेल. पण, माणसेही अशी वागू शकतात, ही गोष्ट कॉंग्रेसींनी आणि कम्युनिस्टांनी आपल्या वागणुकीतून सिद्ध केली आहे. येणार्‍या पिढ्या या गोष्टीची तीव्र निर्भर्त्सना करतील. इतिहासात कॉंग्रेसी आणि कम्युनिस्टांच्या या नृशंस कृत्याची नक्कीच नोंद होईल. कोणे एके काळी कॉंग्रेस नामक पक्षाच्या काही हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन कार्यकर्त्यांनी संगनमत करून हिंदू राष्ट्रवादी सत्ताधारी पक्षाविरुद्ध अमानुष राजकीय कृत्य केले होते, याची इतिहास ठळकपणे दखल घेईल, यात संशय नाही.
मात्र, जर खरोखरच आपल्याला या गोष्टीचा संताप येत असेल आणि राजकीय ताकद दाखवून देण्याची आपली इच्छा असेल, तर ज्यांनी हे गाय कापण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास प्रशासनाला बाध्य करा. आपल्याला कुणी रोखले आहे? निरर्थक व बाष्कळ वक्तव्ये आपली प्रचाराची भूक एकवेळ भलेही शांत करेल. पण, यामुळे दु:खी व संतप्त हिंदू मन शांत होणार नाही. गोहत्या करणार्‍यांबरोबरच गायीला वार्‍यावर सोडून देणारे आणि गायीच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारच्या माथी मारणारे लोकही तेवढेच दोषी आहेत. अगदी बोटांवर मोजता येणार्‍या काही गोशाळांची गोष्ट सोडा. अनेक महापुरुषांच्या तप आणि देवतुल्य गोभक्तीमुळे या गोशाळा अतिशय भव्य मंदिरांपेक्षाही पवित्र तीर्थक्षेत्र बनल्या आहेत. मात्र, अन्य ठिकाणी कशी परिस्थिती आहे? आमची तीर्थक्षेत्रे घाणीची आगर झाली आहेत. मंदिरात पंडे आणि संस्कृतची जाण नसलेल्या पंडितांची मनमानी सुरू असते. गायीच्या बछड्यांना भुकेले ठेवून आणि तिला अतिशय वेदना होतील असे इंजेक्शन देऊन तिचे जास्तीत जास्त दूध काढणे याला काय म्हणायचे? आणि हे सर्व कोण करीत आहे? याविरुद्ध कोण आवाज उठविणार? म्हातार्‍या आणि भाकड गायींना कसायाला विकण्यास कोण बाध्य करतो? या दुखण्यावर कायमचा इलाज करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले आहेत काय? सार्वजनिक जीवनात गायींना पुन्हा सुप्रतिष्ठित करणे, तिची मनापासून सेवा करणे हीच खरी गोभक्ती आहे. केवळ कायदा हाती घेण्यात अर्थ नाही. यामुळे आधीच निष्प्रभ व पराभूत झालेल्या विरोधी पक्षांना फुकटचे बळ मात्र मिळेल.
किरन रिजीजू आणि बीरेनसिंह यांच्या वक्तव्यांचा आपण कसा अर्थ लावणार? प. पू. श्रीगुरुजींनी ईशान्य भारताच्या संदर्भात जे लिहिले आहे ते वारंवार आपण वाचले पाहिजे, त्याचे सातत्याने मनन-चिंतन केले पाहिजे. वर्तमान युगासाठी ‘विचार नवनीत’ हेच कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्तांचे उपनिषद आहे, ही गोष्ट वनवासी कल्याण आश्रमात कार्यरत असताना मला फारच प्रकर्षाने जाणवली आणि अनुभवलीसुद्धा. त्यांनी ईशान्य भारतातील कार्य, तेथील परिस्थिती, तेथील लोकांची मानसिकता, समज आणि गायीसंदर्भात जे म्हटले होते ते आमच्या स्मृतीत आहे?
आणि वर्तमान काळाची आमची पहिली गरज, प्राथमिकता कोणती आहे? आम्ही कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे? आज जे काही घडताना दिसते त्याविषयी भूतकाळ व भविष्याच्या संदर्भात आम्ही काही मनन, विवेचन करणे जरुरी नाही काय? हे सारे मनन, चिंतन शिबिर जे होणे आवश्यक होते ते सर्व झाले. हिंदू जीवन पद्धती, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे मूलभूत प्रश्‍न, विरोध करण्याची क्षमता व त्याला ऊर्जा व दिशा देणार्‍या व बौद्धिक क्षमतेने परिपूर्ण माणसांची निर्मिती आणि सौम्य शांत संचालन आज गरजेचे आहे. पुढील शंभर, दोनशे वर्षे तरी आमची हीच परंपरा राहिली पाहिजे आणि ही परंपरा आम्ही जोमाने पुढे चालविली पाहिजे. या सगळ्यांचा आमचे तत्कालिक कार्य आणि देशातील दारिद्र्य, निरक्षरता आणि बौद्धिक दिवाळखोरी दूर करण्याशी निकटचा संबंध आहे. ज्या लोकांनी गेली १५ वर्षे राष्ट्रवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्या, कार्यकर्त्यांना क्षणभरही सुखाने जगू दिले नाही, ज्यांनी जगभरातील हिंदुविरोधी आणि राष्ट्रवादाच्या कट्टर शत्रूंकडून सर्व प्रकारचे सहकार्य घेऊन आमची रात्रंदिवस शारीरिक, बौद्धिक, राजकीय मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला ते आज राष्ट्रवादी घटकांची व संघटनांची वाढती शक्ती पाहून गप्प बसतील असे वाटते काय? हा या विरोधकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे कुठल्याही थराला जाऊन, सर्व भल्याबुर्‍या मार्गांनी आम्हाला पराभूत करण्याचा ते अंतिम श्‍वासापर्यंत प्रयत्न करतील, हे निश्‍चित आहे. गरिबी, बेकारी, मागासलेपण हे आमच्यापुढील गंभीर प्रश्‍न आहेत. या समस्यांना काहीच अर्थ नाही काय? एकीकडे पंतप्रधान मोदी प्रत्येक घरात वीज, सौर ऊर्जा, पाणी, चांगल्या रेल्वेगाड्या, राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती, अरुणाचल व काश्मीरच्या सुरक्षेची मजबूत तयारी, महिलांचे सशक्तीकरण आणि युवकांचा कौशल्यविकास यासाठी सातत्याने झटत आहेत; तर दुसरीकडे आमच्या व्यक्तिगत आवडीनिवडी, पसंती-नापसंतीवर सारा देश चालविण्याची कसरत करीत आहोत. कुणाच्या ताटात काय वाढले पाहिजे, या आधारे आमच्या देशाचा कारभार चालणार, की आर्थिक विकासाची कास धरून शैक्षणिक क्षेत्रात नवीन झेप घेण्यास आम्ही स्वत:ला सिद्ध करणार, हे आधी ठरविले पाहिजे. अशा विपरीत परिस्थितीत मोठ्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आणि कायमस्वरूपी समस्या निकालात काढण्यासाठी आम्हाला प्रदीर्घ लढाईला तयार राहिले पाहिजे. यावरच आम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, हिंदूंमधील संकुचितपणा, आपसातील द्वेष, अहंकार, तीव्र व्यक्तिगत आवडीनिवडी यामुळे संघटनांची अपेक्षित वाढ होत नाही.
स्वामी विवेकानंदांचे साहित्य पुन:पुन्हा वाचण्याची आणि खानपानासंदर्भात त्यांच्या विचारांचे चिंतन व मनन करण्याची हीच योग्य वेळ आहे. वीर सावरकरांचे साहित्यही या संदर्भात अभ्यासता येईल. यामुळे हिंदुत्वाच्या आरशावर बसलेली प्रपंच आणि पाखंडाची धूळ झटकली जाईल. लांब पल्ल्याचे प्रवासी लहान स्टेशनांवर भांडण करून रेल्वेगाडी सोडून देण्याची जोखीम पत्करणार नाही. रज्जूभैया वारंवार याच गोष्टीची जाणीव करून देत होते.
– तरुण विजय