पाक पुन्हा दु:साहस करणार?

0
119

दिल्ली दिनांक
••बुरहान वाणीच्या चकमकीला एक वर्ष होत आहे. त्याचे निमित्त करून खोर्‍यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडविला जाईल, असा गुप्तचर संस्थांचा अंदाज होता, जो खरा ठरत आहे. एका दिवसात तीन घटनांमध्ये आठ पोलिसांची हत्या होणे, ही घटना खोर्‍यातील स्थितीचा इशारा देणारी आहे. बुरहानच्या चकमकीची बरसी जवळ आल्यावर खोर्‍यात हिंसाचार उफाळेल, हे गृहीत धरून विवाहसोहळेही त्यापूर्वीच करण्याचे नियोजन केले जात आहे.
••काश्मीर खोर्‍यातून येणार्‍या बातम्या चिंताजनक आहेत. शुक्रवारी सुरक्षा दळांनी लष्कर-ए-तोयबाचा एक कमांडर जुनैद मट्टूला ठार केल्यानंतर, काही तासांच्या आत अतिरेक्यांनी याचा बदला घेत, जम्मू-काश्मीर पोलिसच्या सहा जवानांना ठार केले आणि नंतर त्यांच्या चेहर्‍याची चाळणी केली. यात एक इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर व चार पोलिस यांचा समावेश आहे. १९९० मध्ये म्हणजे २७ वर्षांपूर्वी खोर्‍यात दहशतवाद सुरू झाल्यापासून अशी घटना घडली नव्हती. या पोलिसांचे चेहरे ओळखता येऊ नयेत एवढे विद्रूप करण्यात आले होते. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी सुरक्षा दळांकडून मट्टूला पकडण्याची कारवाई सुरू असताना स्थानिक जनता त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होती. अतिरेकी आणि सुरक्षा दळे यांच्यात स्थानिक जनता भिंत करून उभी होती. असेही दृश्य खोर्‍यात दिसले नव्हते.
बुरहानच्या चकमकीनंतर
बुरहान वाणीच्या चकमकीला एक वर्ष होत आहे. त्याचे निमित्त करून खोर्‍यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडविला जाईल, असा गुप्तचर संस्थांचा अंदाज होता, जो खरा ठरत आहे. एका दिवसात तीन घटनांमध्ये आठ पोलिसांची हत्या होणे, ही घटना खोर्‍यातील स्थितीचा इशारा देणारी आहे. बुरहानच्या चकमकीची बरसी जवळ आल्यावर खोर्‍यात हिंसाचार उफाळेल, हे गृहीत धरून विवाहसोहळेही त्यापूर्वीच करण्याचे नियोजन केले जात आहे. रमझानच्या महिन्यात विवाह समारंभ होत नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी बुरहानची बरसी येत आहे. या मधल्या काळात विवाहसमारंभ वा इतर कौटुंबिक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. याचा अर्थ, खोर्‍यातील स्थिती येणार्‍या काळात अधिक ढासळण्याची शक्यता आहे.
पाकचे दु:साहस?
पाकिस्तानात पुढील वर्षी- २०१८ मध्ये- सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने, २०१७ मध्ये पाकिस्तान पुन्हा एकदा भारताशी दु:साहस करील, असा अंदाज वर्तविला जात आहे. पाकिस्तानात मुलकी सरकार आल्यानंतर भारताशी असलेले संबंध सुधारतील, असे अनेकांना वाटत होते. तसे झालेले नाही. पाकिस्तानी लष्कर व सरकार यांच्यात भारतविषयक धोरणाबाबत मतभेद आहेत, असे मानले जात होते. तेही चुकीचे ठरत आहे. भारताबाबत धोरण ठरविताना पाकी लष्कर व पाक सरकार यांच्यात पूर्णपणे एकमत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर ज्या चकमकी झडत आहेत त्यावरून सीमेवरील स्थिती येणार्‍या दिवसात गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पनामा पेपर्स
पाकिस्तानात पनामा पेपर्स नावाचे एक प्रकरण गाजत आहे. पाकिस्तानमधील नेत्यांनी मोठा पैसा पनामात ठेवला आहे, असा गौप्यस्फोट झाल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी एक संयुक्त चौकशी समिती नेमली आहे. पनामा बेट हे काळ्या पैशाच्या व्यवहारासाठी कुप्रसिद्ध आहे. बोफोर्स दलाली व्यवहारातही पनामाचे नाव सर्वप्रथम घेतले गेले होते. गुुरुवारी या समितीसमोर पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची तीन तास चौकशी झाली. पनामा पेपर्स शरीफ यांच्यासाठी एक गंभीर प्रकरण असल्याचे मानले जाते. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी याच मुद्यावर शरीफ यांना घेरले आहे. पनामाचे चक्रव्यूह भेदण्यासाठी ते काश्मीर आघाडीवर दु:साहस करतील, असे मानले जाते. भारतात ज्याप्रमाणे लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच आदेश शरीफ यांनी आपल्या विश्‍वासातील सेनापती जनरल बाजवा यांना दिले आहेत.
गुप्तचरांचा अंदाज
भारताच्या गुप्तचर संस्थांना पाकच्या कारवायांचा अंदाज आला आहे. भारतीय लष्कर सज्ज राहण्याच्या स्थितीत आहे, तर पाक लष्कराला कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रसंगी त्या वाढविण्याचा आदेश देण्यात आला आहे. जनरल राहिल शरीफ पायउतार झाल्यानंतर भारत-पाक संबंधात सुधारणा होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. जनरल बाजवा हे नवाज शरीफ यांच्या विश्‍वासातील आहेत आणि शरीफ यांना भारताशी चांगले संबंध हवे आहेत. स्वाभाविकच जनरल बाजवा हे भारताशी सबंध सुधारणारी भूमिका घेतील, असे वाटत होते. तसे काहीच झालेले नाही. जनरल बाजवा हे जनरल राहिल शरीफ यांचेच धोरण चालवीत आहेत, उलट अधिक जोरकसपणे चालवीत आहेत.
२०१८ च्या निवडणुका
पाकिस्तानातील वातावरण पंतप्रधान शरीफ यांना अनुकूल नाही. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. ही आघाडी शांत करण्यासाठी नवाझ शरीफ भारताविरुद्ध आघाडी उघडतील वा तशी परवानगी जनरल बाजवा यांना देतील, असे म्हटले जात आहे. भारताविरुद्ध वातावरण तापविले तरच आपल्याला ही निवडणूक जिंकता येईल, असा त्यांचा कयास आहे, जो बरोबरही आहे.
चीनची साथ
दुसरीकडे चीन भारतावर नाराज आहे. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीने तो अधिक संतप्त झाला आहे. त्या संतापाचा एक परिणाम- तो पाकिस्तानला चिथावणी देण्यात होत आहे. पाकिस्तान आजवर अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून होता. आता त्याला चीनची थेट साथ मिळत आहे. जनरल बाजवा नियंत्रण रेषेवर जाऊन ज्या कारवाया करत आहेत त्या जरा वेगळ्या आहेत. पाकिस्तानी लष्कर अतिरेक्यांना साथ देत होते. आता ही साथ अधिक सक्रिय झाली आहे. भारत-पाक सीमेवर पाकिस्तानने सुरू केलेली जमवाजमवही, शरीफ यांच्या मनात काहीतरी कारस्थान शिजत आहे याचा संकेत करणारी आहे.
१९९९ मध्ये कारगिल घडले होते. तेव्हाही नवाझ शरीफ हे पाकचे पंतप्रधान होते. भारतात झालेल्या घुसखोरीची आपल्याला कल्पनाच नव्हती, असा त्यांचा दावा होता. जो बरोबर नव्हता. या घुसखोरीला त्यांचा पाठिंबा नसेलही, पण त्यांना ते माहीतच नव्हते, हे मात्र बरोबर नव्हते. या वेळी शरीफ पुन्हा तीच भूमिका घेत आहेत. पाकिस्तानी लष्कर काय करत आहे, याची आपल्याला कल्पना नाही, असे ते म्हणू शकतात. पण, पाकी पंतप्रधानांचा अर्धा वेळ आपल्या लष्कराच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यातच जात असतो, ही वस्तुस्थिती आहे. ती पाहता, पाकी लष्कराकडून भारत-पाक सीमेवर केल्या जात असलेल्या कारवायांचा खरा अर्थ लक्षात येऊ शकेल.
– रवींद्र दाणी