भयाण शांतता, नैराश्य, उत्साहावर विरजण

0
111

– भारताच्या पराभवामुळे हिरमुसले चाहते
नागपूर, १८ जून
भारतच जिंकणार, पुन्हा एकदा भारत पाकिस्तानला धोबीपछाड मारून चॅम्पियन्स चषक आपल्या देशात आणणार, असा आत्मविश्‍वास आज क्रिकेटच्या चाहत्यांना चांगलाच भोवला. इंग्लंडमध्ये आयोजित चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव पाहावा लागला आणि इकडे नागपूर शहरात करण्यात आलेल्या विजयोत्सवाच्या तयारीवर पाणी फेरले गेले. सामना संपत आला असतानाच सर्वत्र भयाण शांतता आणि नैराश्याचे वातावरण होते. भारताच्या पराभवामुळे शहरातील क्रिकेटचे चाहते हिरमुसले होते.
साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा १२४ धावांनी दणदणीत पराभव केला होता. तेव्हा नागपूरकरांनी रात्री उशिरा लक्ष्मीभवन चौकात गर्दी करून मध्यरात्रीपर्यंत जल्लोष केला होता. जल्लोष करणारी युवा मंडळी पोलिसांनाही जुमानत नव्हती. हा अनुभव लक्षात घेता आज पोलिस विभागानेही या उत्सवावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली होती. जल्लोषप्रसंगी वाहने लक्ष्मीभवन चौकात जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. मात्र, भारताच्या पराभवामुळे पोलिसांना भलेही वेदना झाल्या असतील मात्र हुल्लडबाजी आवरण्याचा त्रास सहन करावा लागला नाही, याचा दिलासाही मिळाला असेल.
याशिवाय शहरातील काही मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, तसेच काही खाजगी स्थानांवरही मोठ्या पडद्यावर सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेलकडे तर लोकांनी पाठ दाखविलीच. मात्र, खाजगी स्थानावरही गर्दी न करता घरी बसूनच सामना पाहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे ही तयारी करणार्‍यांची निराशा झाली. याशिवाय पाकिस्तानने पहिले फलंदाजी करून तीनशेचा पल्ला पार केला होता. तेव्हाच भारताच्या विजयाबाबत साशंकता निर्माण झाली होती. भारताचा डाव सुरू झाला आणि फलंदाज बाद होणे सुरू झाले. चाहत्यांमध्ये निराशा पसरली, हॉटेलचे व्यवसाय अपेक्षित असलेल्या काळातच मंदावलेले दिसून आले.
एकीकडे नैराश्य असले तरी मुस्लिमबहुल परिसरात मात्र काही अंशी पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आला अशी माहिती असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकला नाही.

पोलिसांची अशीही वेदना
भारताचा पराभव कसा लोकांसाठी त्रास झाला, हे पोलिस दादांशी चर्चा करताना दिसून आले. जल्लोषाला आवर घालण्यासाठी लक्ष्मीभवन चौकात पोलिस तैनात करण्यात आले होते. सामना पाहता येत नसल्यामुळे ते मोबाईल फोनच्या माध्यमातून सामन्याची माहिती घेत होते. जस जसा पराभव जवळ येत होता तस तसा पोलिसांचाही उत्साह मावळत होता. भारत जिंकायलाच पाहिजे होता. भलेही आम्हाला युवकांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी रात्र जागून काढावी लागली असती तरीही चालले असते. आम्ही त्यासाठी तयार होतो. मात्र, आता आमचीही निराशा झाली आहे, अशी भावनाही त्या पोलिस शिपायाने भरल्या गळ्याने व्यक्त केली.