राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागली घरघर!

0
137

-जिल्हाध्यक्ष मतदारसंघातच खुश
-जि. प. निवडणुकीची कुठलीही तयारी नाही
नागपूर, १८ जून
मध्यावधी निवडणुकीची चर्चा जोरात असताना, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. शिवाय नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर असताना पक्षवाढीसाठी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून कुठलाही कार्यक्रम आखण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
शेतकरी संपावरून भाजपा आणि शिवसेनेत वाद निर्माण झाले आहेत. सत्तेत असताना शिवसेनेने शेतकरी संपात उडी घेऊन शासनाच्या विरोधातच भूमिका घेतली. अर्थात शिवसेनेच्या या भूमिकेबद्दल सत्ताधार्‍यांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली. कर्जमाफी झाली नाही तर सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा शिवसेनेने दिला होता. शिवसेना नेत्यांनी सत्तेत राहून सरकारला नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम तर नेहमी मुख्यमंत्र्यांविरुद्ध आग ओकत असतात. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबई भेटीत, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्ही तयार आहोत. सर्वाधिक जागा भाजपालाच मिळतील, असा दावाही त्यांनी केला. त्याअनुषंगानेच भाजपाने घर चलो अभियान राबविले असल्याचे बोलले जात आहे. हे अभियान म्हणजे निवडणुकीची तयारी असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सात सदस्य होते. वंदना पाल या भाजपात गेल्याने ही संख्या आता सहा झाली आहे. अलीकडेच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका याच वर्षांच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. तसेच मध्यावधी निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मात्र शांत आहेत. जिल्हाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना कुठलाही कार्यक्रम दिला जात नाही. जिल्हाध्यक्ष आपल्या हिंगणा मतदारसंघात खुश आहेत. पक्षवाढीसाठी कुठलेही प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्षांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती वंदना पाल यांच्यासह पंचायत समिती सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठीकडून जिल्हाध्यक्षांची कानउघाडणी करण्यात आली होती. परंतु जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीत कुठलीही सुधारणा झालेली नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात जिल्हाध्यक्षांनी आतापर्यंत एकाही जिल्हा परिषद सदस्याशी चर्चा केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.