संस्कृती जतन करण्यासाठी संस्कृत शिका : डॉ. परांजपे

0
129

– राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाचा समारोप
नागपूर, १८ जून
संस्कृत ही प्रभावी आणि तार्किक भाषा आहे. आधुनिक काळातील संगणकप्रणालीला आधारभूत ठरेल अशी एकमेव भाषा संस्कृत असून ती पाच हजार वर्षे जुनी आहे. जीवन जगण्याची पद्धत संस्कृत वाङ्‌मयामध्ये उल्लेखित असून संस्कृत भाषा शिकल्यासच संस्कृतीचे जतन करता येईल, असे प्रतिपादन संस्कृतच्या अभ्यासक डॉ. सुचेता परांजपे यांनी केले. राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि प्रवीण वर्गाच्या सर्वाधिकारी सुमेधा पोळ यांची उपस्थिती होती.
अहल्या मंदिरातील गोपाळ गणेश दांडेकर सभागृहात आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. परांजपे यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व विशद करताना, देश-विदेशात संस्कृत शिकवत असताना आलेले अनुभव कथन केले. उपनिषद हे आधुनिक तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा असल्याचे सांगून सेविकांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. जगात सर्वाधिक शब्दसाठा संस्कृत भाषेत असून ‘गिर्वाण भारती’ हे संस्कृतचे मूळ नाव असल्याचे त्यांनी सांगितले. ऋग्वेदाचे उदाहरण देत, संस्कृत जीवन जगण्याची कला शिकविणारी आणि मार्गदर्शन करणारी भाषा असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर नंदा जिचकार यांनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका उषाताई चाटी आणि प्रमिलाताई मेढे देखील उपस्थित होत्या. शिक्षा वर्गातील सेविकांनी नियुद्ध, दण्ड, खड़ग आणि व्यायामयोग इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली.
वर्गाच्या सर्वाधिकारी सुमेधा पोळ यांनी वर्गाचा वृत्तांत सादर केला. यंदाच्या प्रवीण शिक्षा वर्गात देशभरातील १४ प्रांतांमधून ३३ सेविका आल्या होत्या. वर्गासाठी आलेल्या एकूण सेविकांमध्ये १२ गृहिणींचाही समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन शशी बघेल यांनी, तर आभारप्रदर्शन नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे यांनी केले. वंदे मातरम् प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

युवा पिढीत जागरूकता आणण्यासाठी समिती कार्यरत : शांताक्का
आदर्श आई असलेल्या जिजामाता आणि आदर्श नेतृत्त्व असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन आदर्शवत् असून, आजच्या काळातील मातांनी यादृष्टीने विचार करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. प्रत्येक व्यक्तीत उपयोजक गुण असतातच आणि ते ओळखून विकसित करायला हवे, असे सांगून त्यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले. आपल्या उद्‌बोधनात त्यांनी काही अनुभवही सांगितले. ‘राष्ट्रत्व के दिव्यत्व की आभा लिये…उठ जला पुरुषार्थ पथ के दिये !’ हे यंदाच्या प्रवीण शिक्षा वर्गाचे बोधवाक्य असून त्यानुसारच समाजात राष्ट्रकार्याचे दीप प्रज्वलित करण्याचे समितीचे ध्येय असल्याचे शांताक्का यांनी स्पष्ट केले.