मुंबईच्या आधीच नागपूर होणार स्मार्ट सिटी

0
101

– ५५० कोटींचे प्रकल्प पूर्ण
– मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण
नागपूर/मुंबई, १९ जून
आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या मुंबई शहराच्या आधी विदर्भातील नागपूर शहर देशातील पहिले ‘स्मार्ट सिटी’ होणार आहे. तब्बल चार हजार कॅमेरे, वायफाय, अत्याधुनिक पार्किंग, बसस्थानके, स्वच्छता व्यवस्था, वातावरणातील बदलाची माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रे इत्यादी सुविधा देणार्‍या सुमारे ५५० कोटी रुपयांच्या खर्चाच्या सेवांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुंबईतील विद्यमान नागरी सेवा आणि भौगोलिक कारणांमुळे या शहरात नवीन अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठीच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे. सध्या मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. या कामासाठी मुंबईला पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. केवळ कॅमेरे लावल्यामुळे मुंबईला स्मार्ट सिटी संबोधले जात आहे. प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्या निकषातील अनेक सेवा मुंबईत उपलब्ध करून दिल्या नाहीत. याउलट नागपूरने मुंबई, दिल्ली आणि भोपाळला मागे टाकले आहे. या तीनही शहरातील अत्याधुनिक सेवा अद्यापही कागदावरच आहेत.
मुंबईप्रमाणे नागपूरलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाचे हृदय समजल्या जाणार्‍या या शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीअंतर्गत नागपूर शहरात ४ हजार टेहळणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच १३६ ठिकाणी वायफाय सेवा सेवा उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना वातावरणातील बदलांची माहिती देणारी सेवा सुद्धा दिली आहे. अशा प्रकारची सेवा देणारे नागपूर हे देशातील पहिलेच शहर ठरणार आहे.
प्रत्येक शहराला कचर्‍याची समस्या भेडसावत आहे. मात्र, नागपूरने या समस्येतून स्वत:ची सोडवणूक करून घेतली आहे. कचरा कुंड्या दिवसातून एकदाच साफ केल्या जात होत्या. त्यामुळे कुंड्या भरल्यानंतर कचरा इतरत्र पसरत होता. आता, प्रत्येक कुंडीला सेन्सर चिप बसवली आहे. कचरा कुंडी भरल्यानंतर संबधित यंत्रणेला माहिती मिळताच कर्मचार्‍यांमार्फत कचरा हलविला जाईल. इतकेच नाही तर सफाई कर्मचारी काय करतात, ते सध्या कुठे आहेत हे सुद्धा कळणार आहे.
नागपुरातील जापनीज रॉक उद्यान ते टाईम्स ऑफ इंडिया या ६ किलोमीटर मार्गावर अत्याधुनिक वाहनतळ उभारण्यात आला आहे. घरातून निघाल्यानंतर संबधित संकेतस्थळावर विचारणा केल्यास पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाईल. तेथेही सेन्सर चिप लावली आहे. गाडी किती वेळ थांबली, त्यानुसार पार्किंगसाठी पैसे आकारले जाणार आहेत. भविष्यात इंटरनेट सेवेवर ताण पडणार असल्याचे ओळखून नागपूरकरांच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी प्रत्येक घरात थेट वायर पोहचवली जाणार आहे. तब्बल १२०० किलोमीटर फायबरचे जाळे टाकण्यात आले आहे. या फायबरच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला इंटरनेट सेवेसाठी १० एसपीएस वेग मिळणार आहे. जगात इतक्या वेगाने इंटरनेट सेवा देणारे नागपूर हे पहिलेच शहर ठरणार आहे. तसेच बसस्थानके सुद्धा अत्याधुनिक करण्यात आल्यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.