रामनाथ कोविंद होणार देशाचे नवे राष्ट्रपती!

0
52

दिल्लीचे वार्तापत्र
मागील आठवड्यात याच स्तंभातून ‘कोण होणार नवा राष्ट्रपती?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रपतिपदासाठी रालोआची उमेदवारी बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांना जाहीर करून दिले आहे. राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आणि निवडणूक झाली, तरी रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती होणार, हे निश्‍चित आहे. कारण, ही निवडणूक जिंकण्यासाठी जितकी मते पाहिजेत, त्यापेक्षा कितीतरी जास्त मते आज रालोआजवळ आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी नव्या राष्ट्रपतीची निवड सर्वसहमतीने होऊ दिली नाही, तरी फारसे काही बिघडत नाही. रामनाथ कोविंद रायसिना हिलवरील राष्ट्रपतिभवनात जाणार, ही काळ्‌या दगडावरील रेघ आहे!
नियती कशी विचित्र असते पाहा, मागील महिन्यात, बिहारचे राज्यपाल असताना रामनाथ कोविंद हिमाचलप्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पाहुणे म्हणून शिमला येथे गेले होते. शिमला येथेही राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. रिट्रिट म्हणून ओळखले जाणारे हे राष्ट्रपतिभवन पाहायला पूर्वसूचना न देता रामनाथ कोविंद आपल्या कुटुंबीयांसह गेले होते. मात्र, तुमच्या भेटीची परवानगी आमच्याकडे नाही, असे सांगत कोविंद यांना शिमलाच्या राष्ट्रपतिभवनाच्या दरवाजातून परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे मी बिहारचा राज्यपाल आहे, असा आपल्या पदाचा कोणताही तोरा न मिरवता आणि अकांडतांडव न करता कोविंद शांतपणे परत गेले.
योगायोग पाहा, एक महिन्यापेक्षा कमी कालावधीतच त्याच राष्ट्रपतिभवनाचे फक्त शिमल्याचेच नाही, तर नवी दिल्लीतील दरवाजेही कोविंद यांच्या स्वागतासाठी केवळ सताड उघडेच झाले नाहीत, तर लाल गालिचा टाकून आता त्यांची वाट पाहात आहेत! ज्या वेळी रिट्रिटच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिभवनात येण्याची परवानगी नाकारली, त्या वेळी देशाच्या भावी राष्ट्रपतीला आपण त्यांच्या हक्काच्या निवासस्थानी प्रवेश करण्यापासून रोखत आहे, याची जाणीव ज्याप्रमाणे तेथील सुरक्षा अधिकार्‍यांना नव्हती, त्याचप्रमाणे काही काळातच याच राष्ट्रपतिभवनात आपल्याला पुढील पाच वर्षे घालवावी लागणार आहेत, याची कल्पनाही कोविंद यांनी केली नसावी, यालाच नियती म्हणतात!
राष्ट्रपतिपदासाठी जी नावे चर्चेत होती, त्यात रामनाथ कोविंद यांचे नाव कुठेच नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना धक्का देत, राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. रामनाथ कोविंद यांच्या रूपात देशाला प्रथमच स्वयंसेवक असलेला राष्ट्रपती मिळणार आहे. आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी असे दोन स्वयंंसेवक पंतप्रधान झाले, पण एकही स्वयंसेवक राष्ट्रपती होऊ शकला नव्हता. कोविंद यांच्या रूपात प्रथमच एक स्वयंसेवक देशाच्या सर्वोच्च पदावर बसणार आहे. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर एका स्वयंसेवकाला बसलेले पाहण्याचे कोट्यवधी स्वयंसेवकांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे अभिनंदन केले पाहिजे.
रामनाथ कोविंद यांचा रा. स्व. संघाशी संबंध असल्यामुळे त्यांना आमचा विरोध असल्याची बसपा, माकप आणि अन्य राजकीय पक्षांची भूमिका, त्या पक्षांच्या अकलेचे दिवाळे निघाल्यासारखी आहे. रा. स्व. संघाशी संबंध असणे हा काही कुणाचा गुन्हा तर ठरत नाही. विरोध हा गुणवत्तेच्या आणि वैचारिक आधारावर केला पाहिजे, जाती-धर्माच्या आधारावर नाही. पण, हे आमच्या देशातील संघद्वेषाची कावीळ झालेल्या विरोधी पक्षांना कोण सांगणार? देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणार्‍या आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवणार्‍या रा. स्व. संघाशी संबंध असणे, ही प्रत्येकासाठीच अभिमानाची बाब आहे.
राष्ट्रपतिपदासाठी जे निकष होते, त्यात तो स्वयंसेवक असला पाहिजे, असा प्रमुख निकष होता, रामनाथ कोविंद दलित समाजाचे असल्यामुळे त्यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली, असा प्रचार विरोधी पक्षांनी सुरू केला असला, तरी तो रामनाथ कोविंद यांच्यावर अन्याय करणारा आहे. कोविंद फक्त दलित आहेत म्हणून त्यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली नाही, तर त्यांची राजकीय आणि प्रशासकीय क्षमता पाहून त्यांची या पदासाठी पंतप्रधान मोदी यांनी निवड केली आहे. कोविंद यांचे दलित असणे हा योगायोग म्हणावा लागेल. कोविंद भारतीय घटनेचे अभ्यासक आहेत, त्यामुळे देशाचा राष्ट्रपती या घटनात्मक पदावर निवडण्यासाठी त्यांच्याएवढा दुसरा सक्षम उमेदवार नाही. सनदी सेवेची परीक्षा उत्तीर्ण करूनही रामनाथ कोविंद त्या सेवेत गेले नाहीत. जनता पक्षाच्या राजवटीत कोविंद यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले. २००२ मध्ये कोविंद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी अनेक सांसदीय समित्यांचे प्रमुख म्हणून काम केले. राज्यसभेत भाषण करताना कोविंद यांनी, देशाच्या राष्ट्रपतीवर टीका करता येते तर न्यायाधीशांवर तसेच न्यायव्यवस्थेवर टीका का करता येत नाही, असा बिनतोड मुद्दा एका विधेयकावरील चर्चेत मांडला होता.
नोव्हेंबर २०१५ मध्ये पाटण्याच्या गांधी मैदानावर शपथविधीच्या वेळी, लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव शपथ घेताना चुकत असल्यामुळे रामनाथ कोविंद यांनी त्याला टोकले आणि पुन्हा शपथ घ्यायला लावली होती. ‘अपेक्षित’ला तो ‘उपेक्षित’ वाचत होता. त्यामुळे सुरुवातीला रामनाथ कोविंद यांच्या बिहारचे राज्यपाल म्हणून झालेल्या नियुक्तीला विरोध करणार्‍या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे कोविंद यांच्या कार्यशैलीचे यश म्हणावे लागेल.
भाजपमध्ये काम करताना कार्यकर्त्यांना समजून घेण्याची त्यांची नेहमीच भूमिका राहिली. अतिशय गरिबीतून वर आल्यामुळे गरिबांबद्दल नेहमीच त्यांच्या मनात कणव आहे. राज्यसभा सदस्य असतानाही रामनाथ कोविंद कानपूरमध्ये भाड्याच्या दोन खोल्यांत १९ वर्ष राहिले. कोविंद यांची राहणी अतिशय साधी आहे. कोविंद बिहारचे राज्यपाल असताना त्यांच्या पत्नी उपचारासाठी सरकारी रुग्णालयात जात होत्या. आपण राज्यपाल आहोत म्हणून इतरांपेक्षा वेगळे आहेत, आपल्याला वेगळी वागणूक मिळाली पाहिजे, अशी कोविंद यांच्या परिवाराचीही कधीच अपेक्षा राहात नव्हती.
अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय, अल्पसंख्यक आणि महिलांच्या कल्याणासाठी रामनाथ कोविंद यांनी नेहमीच संघर्ष केला. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करताना अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना कोविंद यांनी नेहमीच नि:शुल्क कायदेशीर सल्ला दिला. त्यामुळे राष्ट्रपतिपदासाठी कोविंद यांची करण्यात आलेली निवड अतिशय समर्पक आणि योग्य अशी आहे. त्यामुळेच फक्त रालोआतीलच नाही, तर विरोधी आघाडीतील अनेक राजकीय पक्षांनीही कोविंद यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपाने रामनाथ कोविंद यांचीच नाही, तर अन्य कुणाचीही राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड केली असती, तरी विरोधकांनी आक्षेप घेतला असता, त्यावर टीका केली असती. रामनाथ कोविंद यांच्यासारख्या मुत्सद्दी आणि प्रशासकीय क्षमतेच्या, पण अतिशय साध्या आणि निरलस व्यक्तिमत्त्वाची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य परिस्थितीतील व्यक्तीही असामान्य कर्तृत्वाच्या होऊ शकतात, हे दाखवून दिले आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७