चौफेर

0
128

राष्ट्रपतींची जात…

कालपर्यंत कुणाला जात ठाऊक होती त्यांची? पण, राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर झाली अन् मग सार्‍या जगाला त्यांची जात माहीत झाली! इतर सार्‍या पात्रता मागे पडून त्यांच्या दलित असण्याला कधीनव्हे एवढे महत्त्व प्राप्त झाले. स्वातंत्र्याची सात दशकं पार केलेला, जगातली सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था म्हणून मान्यता पावलेला एक देश आपल्या प्रथम नागरिकाची निवड करताना, शिक्षणापासून तर इतर सार्‍या पात्रता, राजकारणातला त्यांचा दांडगा अनुभव, एवढ्या वर्षांत भूषविलेल्या उच्च पदांचा लेखाजोखा… सारं सारं कवडीमोल ठरवतो अन् ज्यावर मात करण्यासाठी त्यांनी आजवर कडवा संघर्ष केला, ती जात मात्र लाखमोलाची ठरते! त्यांनी मोरारजी देसाईंसमवेत काम केले, सदस्य म्हणून संसदेत दोन टर्म गाजवल्या. सध्या ते बिहार राज्याचे राज्यपाल आहेत… पण, या देशातल्या माध्यमांनी या सार्‍या बाबींची दखल घेण्याचे प्रयोजनच कुठे आहे? माध्यमांनी तर फक्त त्यांची जात अधोरेखित केली. बरं, निलाजरेपण इतकं की, असे करून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला आपण उगीच उणेपण आणत असल्याची खंतही कुणाच्या मनाला शिवत नाही इथे! या निवडणुकीकरिता रालोआने दिलेल्या उमेदवाराच्या जातीचा एवढा गवगवा झालाय् म्हटल्यावर, कॉंगेस पक्षानेही दलित उमेदवाराची शोधाशोध सुरू केली नसती अन् शेवटी मागासवर्गीय उमेदवार देऊन त्याचा गल्लोगल्ली डांगोरा पिटला नसता तरच नवल! मीरा कुमार यांना उमेदवारी बहाल करण्यापेक्षाही, त्या दलित असल्याचे सांगताना तर कॉंगेस नेत्यांचा जणू अभिमानाने ऊर भरून आला होता. हो! रालोआला कशी मात दिली, हे सांगायला नको सार्‍या देशाला? बाबू जगजीवनराम यांची कन्या असण्यापेक्षाही अन् लोकभेच्या अध्यक्षपदाच्या यशस्वी कारकीर्दीपेक्षाही जातच महत्त्वाची ठरली त्यांचीही!
कर्तबगारीचे इतर सारे निकष केराच्या टोपलीत टाकून उमेदवारांच्या जातीलाच एवढे प्राधान्य मिळतेय् म्हटल्यावर, कुणाला मागासलेले राहणे आवडणार नाही इथे? अन् हा देश म्हणे प्रगती करतोय्! या देशाला म्हणे परंपरागत जातिव्यवस्था संपलेली हवी आहे! समाजप्रबोधनाचे स्वयंघोषित ठेकेदार होऊन बसलेल्या माध्यमजगतातील धुरीणच जातीचा टेंभा मिरवत सुटलेत इथेतर! खरंच सांगा, कुणाला संपलेली हवी आहे इथली जातिव्यवस्था? ज्यांना रामनाथ कोविंद नावाच्या माणसाच्या कर्तबगारीपेक्षा त्यांची जात महत्त्वाची वाटली त्यांना? की मीरा कुमारांची जात प्रकर्षाने सांगताना ज्यांना जराशीही लाज वाटली नाही, त्यांना?
खरंच सांगा, कालपर्यंत कुणाला ठाऊक होती रामनाथ कोविंद दलित असल्याची बाब? अन् कुणाला माहीत होती मीरा कुमारांची जात? आम्हाला तर कोविंदांच्या रूपातला एक सामान्य माणूस तेवढा ठाऊक होता. राजकारणात राहूनही एखादी व्यक्ती चारित्र्यवान जीवनाचा आदर्श निर्माण करू शकते, एवढेच कळत होते त्यांच्याकडे बघून. वेगवेगळी उच्च पदं भूषविल्यानंतरही निरलसपणे कसे जगता येते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघायचे लोक. ते दलित आहेत का सवर्ण, हा प्रश्‍नही कधी उद्भवला नाही आमच्या मनात. आठवतं? हसर्‍या चेहर्‍याच्या मीरा कुमार लोकसभेतले ‘गोंधळी’ तेवढ्याच कठोरतेने नियंत्रणात आणायच्या, सर्वांना शांत राहायला सांगायच्या, तेव्हा सारा देश कौतुकाने नुसता बघत राहायचा. कुणी कधी विचारली सांगा जात त्यांची? मग काल अचानक का आठवली सार्‍या देशाला त्यांची जात, सांगा? कुणी भरवली ही गोष्ट तुमच्या-माझ्या मनात?
वर्षानुुवर्षे गावकुसाच्या बाहेर आयुष्य व्यतीत केलेल्या समूहाला आपल्यातली कुणी व्यक्ती या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत असल्याचा वर्णनातीत आनंद होणे स्वाभाविकच. कालपर्यंतच कशाला, अगदी आजही अस्तित्वात असलेल्या जातिव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर तो आनंद अमर्याद असणेही ओघानेच आले. पण, तरीही एका देशाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार निवडीचे निकष असे जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे योग्य ठरेल? आणि कोविंद असोत की मीरा कुमार, त्यांची पात्रता, त्यांचे कर्तृत्व, त्यांचा अनुभव, त्यांची कर्तबगारी अशी जातीच्या तराजूत कशी मोजता येईल? मुळातच आपले राष्ट्रपतिपद काही कुठल्या जाती-धर्मासाठी आरक्षित नाही. त्यामुळे रामनाथ कोविंदांची या पदावर जवळपास निश्‍चित असलेली निवड काही आरक्षणाच्या कोट्यातून होणार नाहीय्. स्पर्धेत उतरून, स्वत:ला सिद्ध करून, या पदासाठी पात्र असलेल्या कित्येकांना मागे टाकून त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी पद्धतीने होणार्‍या मोजमापात त्यांची जात मागासवर्गीय सदरात मोडते, हा निव्वळ योगायोग आहे. त्यांच्या उमेदवारीशी त्याचा काडीचाही संबंध नाही. वकिलीचे उच्च शिक्षण, राजकारणातला किमान चार दशकांचा वावर, मोरारजींच्या सहवासात गाठीशी बांधलेला प्रशासकीय अनुभव, राज्यसभेपासून तर परवा परवा त्यांनी भूषविलेल्या बिहारच्या राज्यपालपदापर्यंतचा प्रवास… या शिदोरीमुळे राष्ट्रपतिभवनाची पायरी चढण्याचा योग चालून आला आहे. प्रगतीचा हा चढता आलेख कर्तबगारीतून सिद्ध झाला आहे. यात त्यांच्या जातीचे योगदान कवडी ‘मोला’चेही नाही. पण दुर्दैव असे की, तेच सर्वात मोठे अन् महत्त्वाचे योगदान असल्याच्या थाटात मोजदात चाललीय् सर्वदूर. सगळा फोकस त्यावरच टाकला जातोय्. त्याहून दुर्दैवाची बाब अशी की, असली थेरं करणारी माणसं, जातीचा हा मुद्दा उचलून धरणारी माध्यमं, पुरोगामित्वाची बिरुदं आपल्या नावामागे लावून मोठ्या दिमाखानं मिरवताहेत.
जगातल्या सर्वाधिक प्रगत म्हणवल्या जाणार्‍या अमेरिकेत अजून कुण्या महिलेला राष्ट्राध्यक्ष होता आलेले नाही. कालपरवापर्यंत वर्णभेदाचे बळी ठरलेल्या काळ्या माणसाला त्या पदापर्यंत पोहोचायला एकविसावे शतक उजाडावे लागले. आपला देश तर त्या दृष्टीने बराच पुढारलेला म्हणायला हवा. दलित समाजातली एखादी व्यक्ती राष्ट्रपती होण्याचीही यंदा काही पहिली वेळ असणार नाही. मग तो मुद्दा आताच असा ऐरणीवर येण्याचे कारण काय? या पदासाठीचा भाजपाचा उमेदवार दलित नसता तर? तरीही मीरा कुमारांनाच राहिली असती कॉंग्रेसची पसंती? त्या स्थितीत झाली असती प्रकाश आंबेडकरांच्या नावाची चर्चा या उमेदवारीसाठी? अमेरिकेत यंदाच्या निवडणुकीत हिलेरी क्लिटंन मैदानात होत्या. पण, आजवर कुणी महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही म्हणून ‘हिला बिचारीला देऊन टाकू या यंदा संधी,’ अशी सहानुभूती दाखवत कुणी मतांचं दान टाकलं नाही त्यांच्या झोळीत. रामनाथ कोविंदांच्या संदर्भातही त्यांची जात हा निवडीचा निकष कधीच नव्हता. पण… सर्वांच्याच लेखी तेवढी एकच बाब महत्त्वाची ठरली. हा दुर्दैवी परिणाम लोकांच्या डोक्यात झालेल्या भुग्याचा आहे. तो त्यांच्या वैचारिक कोतेपणाचाही परिपाक आहेच. देशाच्या सर्वोच्च पदावर एखादी व्यक्ती विराजमान करतानाही तिची जात आमच्या डोक्यातून जात नाही आणि आश्‍चर्य असे की, तरीही जातिविरहित व्यवस्थेची अपेक्षा बाळगून बसलेले लोक आहोत आम्ही. कोविंदांची जात ठासून सांगणारी माध्यमजगतातली हुश्शार मंडळी असो की, मग जातीच्या त्याच प्रवर्गात मोडणारा उमेदवार जाणीवपूर्वक मैदानात उतरविणारी कॉंग्रेस असो, यातील कुणीही, या देशातली जातिव्यवस्था सहजासहजी संपू देईल, याची शक्यता सुतराम वाटत नाही…!
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३