अयोध्येचे सत्य

0
122

पुरातत्त्वज्ञ डॉ. मुहम्मद यांच्या शब्दांत…
इरफान हबिब आणि रोमिला थापर यांच्यासारख्या डाव्या विचारधारेच्या इतिहासकारांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या वादग्रस्त मुद्यावर सर्वसंमतीने सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न हाणून पाडले, असे बिनबुडाचे आरोप कुणीही खपवून घेणार नाहीत. पण, ही बाब खरी आहे आणि ती अधोरेखित झाली आहे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या उत्तर विभागाचे माजी विभागीय संचालक डॉ. के. के. मुहम्मद यांच्या आत्मचरित्रात! अयोध्येतील वादग्रस्त बाबरीच्या पतनाला २५ वर्षे झाली, पण त्यामुळे उभय समाजात निर्माण झालेली संघर्षाची दरी अजूनही दूर झालेली नाही. या वादावर न्यायालयाबाहेर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जावा, ही जशी या देशातील अनेक लोकांची इच्छा आहे, तशीच ती काही राजकीय पक्षांची आणि न्यायालयाचीदेखील इच्छा आहे. पण, त्यात खोडा घातला डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी. डॉ. के. के. मुहम्मद यांनी ‘नजान इन्ना भारतीयन’ (मराठी अर्थ- मी भारतीय आहे) या मल्याळम् भाषेतील त्यांच्या आत्मचिरत्रात मांडलेले विचार वाचून आश्‍चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ते लिहितात, १९७६-७७ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे तत्कालीन महासंचालक प्रोफेसर बी. बी. लाल यांच्या नेृत्वाखालील पुरातत्त्ववेत्त्यांंच्या चमूने अयोध्येतील ज्या ठिकाणी उत्खनन केले, त्या जागेवर उत्खननाच्या वेळी हिंदू मंदिराचे अवशेष आढळले होते. या उत्खनन चमूचे डॉ. के. के. मुहम्मद हे एक सदस्य होते. केरळच्या कालिकत येथे जन्मलेले मुहम्मद यांनी त्यांच्या कार्यकाळात ३०० हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे.
हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आणि केरळातीलच नव्हे, तर देशभरातील इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये वाद-प्रतिवादांना प्रारंभ झाला. प्रसिद्धिमाध्यमांनी त्यांच्या आत्मचरित्राची फारशी दखल घेतली नाही. काही ठिकाणी बातम्या आणि त्यांच्या छोटेखानी मुलाखती निश्‍चित प्रसिद्ध झाल्या. पण, त्यांचा आवाका केरळच्या पलीकडचा नव्हता. आजही देशातील अनेक अभ्यासक, जाणकार आणि या मुद्यावर ‘तिसरा डोळा’ ठेवून असणारे, त्यांच्या या आत्मचरित्राबाबत अनभिज्ञ आहेत. त्यांच्या आत्मचरित्रामुळे डाव्यांचा पोटशूळ उठणे स्वाभाविक होते. डॉ. के. एन. पणिक्कार यांनी तर मुहम्मद यांचा दावा साफ फेटाळून लावला. या आत्मचरित्राला त्यांनी राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला पाय पसरवता यावे म्हणून करण्यात आलेले हे प्रयत्न असल्याची त्यांची प्रतिक्रिया निराळी असती तरच नवल. सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक एमजीएस नारायणन् मात्र मुहम्मद यांच्या विधानाशी पूर्णतः सहमत आहेत.
डाव्या विचारांच्या इतिहासकारांमुळे बाबरी मशिदीच्या मुद्यावर सर्वानुमते तोडगा निघू शकला नाही, असा आरोप करताना डॉ. मुहम्मद यांनी डाव्या विचारांचे समर्थन करणारे इतिहासतज्ज्ञ आणि त्यांचे विरोधक यांच्यातील वैचारिक दरीदेखील हा मुद्दा चिघळत ठेवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे नमूद केले आहे. भारतीय इतिहास संशोधन समितीचे अध्यक्ष इरफान हबिब यांच्या अध्यक्षतेत कृती समितीच्या अनेक बैठका झाल्या. पण, डाव्यांनी मुसलमानांच्या केलेल्या ब्रेन वॉशिंगमुळे त्यावर तोडगा निघू शकला नाही. अयोध्या ही बुद्ध आणि जैनांची भूमी असून, एकोणिसाव्या शतकापूर्वी येथे कुठले मंदिर पाडण्यात आल्याची नोंद नाही, असाच युक्तिवाद रोमिला थापर, बिपिनचंद्र आणि एस. गोपाल हे इतिहास अभ्यासक करीत राहिले. इरफान हबिब, आर. एस. शर्मा, डी. एन. झा, सूरज बेन, अख्तर अली आदी इतिहासकारांनीसुद्धा त्यांना साथ दिली. बाबरी मुद्यावर सर्वसंमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या इतिहासकारांनी जहाल मुस्लिम गटांशी हातमिळवणी केल्याचेही डॉ. मुहम्मद यांनी आत्मचरित्रात स्पष्ट केले आहे. यातील काहींनी तर सरकारी स्तरावरील बैठकांमध्ये भाग घेऊन बाबरी मशिद कृती समितीच्या भूमिकेला समर्थन देण्याचा घाट घातला.
१९७८ मध्ये अयोध्येत झालेल्या उत्खननात हिंदू मंदिराचे अवशेष आढळले, इतके लिहून डॉ. मुहम्मद थांबले नाहीत. त्यांनी त्याबाबतचे पुरावेदखील सादर केले. त्या वेळी हिंदूंसाठी पवित्र असलेली प्रतीके कोरलेले स्तंभ (खांब) तेथे आढळल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मी जे काही शिकलो आणि बोलतोय् ते ऐतिहासिक सत्यावर आधारित आहे, असेही डॉ. मुहम्मद यांचे म्हणणे आहे. ज्या वेळी हे उत्खनन सुरू होते, त्या वेळी डॉ. मुहम्मद नवी दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाचे विद्यार्थी होते. डॉ. मुहम्मद सांगतात, आम्हाला बाबरी मशिदीच्या स्थानी झालेल्या उत्खननात एक नव्हे, तर मंदिराचे १४ खांब आढळून आले होते. या सार्‍या खांबांच्या घुमटावर कोरीव काम केले होते. हे सारे खांब अकराव्या आणि बाराव्या शतकातील मंदिरांमधील खांबांशी मिळतेजुळते होते. मंदिराच्या वास्तुशास्त्रात जी ९ प्रतीके भरभराटीची म्हणून गणली जातात, त्यात घुमटाचा समावेश होतो. त्यावरून मंदिराच्या तोडफोडीनंतर उरलेल्या मलब्याचा उपयोग करून मशीद उभारली गेली, हे सिद्ध होते. उत्खननात ज्या बाबी आढळल्या, त्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून डॉ. के. के. मुहम्मद यांनी अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांच्या संपादकांची दारं ठोठावली. पण, एकाही दैनिकाने त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखांची दखल घेतली नाही. केवळ एका दैनिकाने त्यांचा लेख ‘संपादकांना पत्र’ या सदरात, तोदेखील अतिशय त्रोटक प्रसिद्ध केला. या सार्‍याचा ऊहापोह त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
एका राष्ट्रीय साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, आज या मुद्याला राजकीय वळण मिळालेले आहे. मुसलमान पुढार्‍यांनीही या मुद्याबाबत योग्य प्रकारे नेतृत्व केले नाही. ते डाव्या विचारांच्या इतिहासकारांच्या हातातील बाहुले बनून गेल्यामुळे हा प्रश्‍न अधिक चिघळला. अन्यथा या समस्येवर तोडगा काढण्याची लोकांची तयारी होती. अयोध्येत जेव्हा पहिल्यांदा उत्खनन झाले तेव्हा मुस्लिम त्या जागेवरचा आपला दावा सोडण्यास तयारदेखील झाले होते. पण, इरफान हबिब यांच्यासारख्या डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी याला काही अर्थ नाही आणि येथून काहीच मिळणार नाही, असे सांगून मुसलमानांची दिशाभूल केली. यामुळे दुसर्‍यांदा उत्खनन करावे लागले. त्यामुळेच या मुद्यावर माघार घेण्यास त्यांना आता काठीण्य जाणवत आहे. ज्या वेळी उत्खनन सुरू होते, त्या वेळी मी अयोध्येत होतो. मी जे पाहिले ते अभूतपूर्ण होते. भगवान श्रीरामाची एक झलक पाहण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही हजारो भाविक देशाच्या कानाकोपर्‍यातून मंदिर परिसरात येत होते. आम्हाला त्यांच्या भावना आणि संवेदना दोहोंची दखल घ्यावी लागेल. मुसलमानांना पाकिस्तान नामक इस्लामी राष्ट्र दिल्यानंतर भारतदेखील स्वतंत्र राष्ट्र झाले. भारत अजूनही हिंदुबहुल असल्यामुळे पंथनिरपेक्ष आहे. भारतात मुसलमानांची लोकसंख्या अधिक असती तर हा देशच कधीच पंथनिरपेक्ष राहिला नसता. मुसलमानांनी ही सत्यता स्वीकारायला हवी. मी मुसलमानांना नेहमीच म्हणतो, जेवढे महत्त्व त्यांच्यासाठी मक्का-मदीनाचे आहे, तेवढेच महत्त्व हिंदूंसाठी अयोध्येचे आहे. म्हणूनच मुसलमानांनी त्या जागेवरचा आपला दावा सोडून द्यायला हवा. तसाही त्या जागेचा पैंगबर हजरत मुहम्मद यांच्याशी काहीच संबंध नाही. जर संबंध असता तर मीदेखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिलो असतो. जर या स्थानाचा हजरत निजामुद्दिन औलिया यांच्याशीही संबंध असता, तरीदेखील मी त्यांची साथ दिली असती. पण, त्यांच्याकडून जी चूक झाली, तिची पुनरावृत्ती व्हायला नको. म्हणूनच मुसलमानांनी यावरचा आपला दावा सोडून द्यायला हवा. असे केल्याने मुस्लिमांशी संबंधित जे इतर मुद्दे आहेत, त्यांच्या निराकरणाचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी त्यांना पुढे येण्याची गरज नाही, हिंदू स्वतः पुढाकार घेेऊन त्यांच्या समस्यांचा निपटारा करतील. डॉ. के. के. मुहम्मद यांनी हा मुद्दा त्यांच्या आत्मचरित्रातदेखील ठळकपणे नमूद केला आहे. हा मुद्दा देशहितासाठी नव्हे, तर मुस्लिमांच्या हितासाठी कायमचा संपण्याची गरज आहे, हे त्यांनी पटवून दिले आहे.
डॉ. मुहम्मद यांच्या मते, डाव्या इतिहासकारांनी या मुद्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या निकालानंतरही इरफान आणि त्यांचे सहकारी सत्य मान्य करण्यास तयार नाहीत. ते केवळ न्यायालयाच्या निकालाला कोणता तर्क आहे, असाच प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. पुढे जाऊन डॉ. मुहम्मद म्हणतात, मी इरफान हबिब यांना त्यांच्या अलिगड विद्यापीठातील दिवसांपासून ओळखतो. त्यांच्या मताशी असहमती दर्शविणार्‍यांना दूषणे देणे, ही त्यांची ख्याती राहिलेली आहे. अखेर इतिहासकार हे केवळ इतिहास सांगत असतात. त्यांना तथ्य आणि माहिती आम्ही पुरातत्त्ववेत्तेच उपलब्ध करून देत असतो. माझा तर हासुद्धा दावा आहे की, कुतुबमिनार आणि ताजमहाल हेदेखील हिंदू मंदिरांच्या मलब्यातून उभारण्यात आले आहेत. आपल्या पुस्तकामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष होणार नाही का, असा प्रश्‍न ज्या वेळी त्यांना विचारला गेला, त्या वेळी त्यांचे उत्तर नकारात्मक होते. हिंदू धर्मातील जातीयवादात मुळातच दडपशाहीला थारा नाही. त्यांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. त्यांच्या अशा प्रतिक्रियेचे उदाहरण म्हणून आपण गोधराच्या घटनेकडे पाहू शकतो, असे ते सांगतात.
इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्चचे (आयसीएचआर) माजी अध्यक्ष प्रो. एमजीएस नारायणन् यांचे डॉ. मुहम्मद यांच्या अयोध्येबाबतच्या दाव्याला पूर्ण समर्थन आहे. ते म्हणतात, भारतात पूर्वी मंदिरे असलेल्या अनेक ठिकाणांवर मशिदी आणि स्मारके उभारली गेली, हे सत्य नाकारता येत नाही. प्रा. इरफान हबिब यांच्यासंदर्भात डॉ. मुहम्मद यांनी व्यक्त केलेल्या मतांशीही ते सहमत आहेत. हबिब यांच्या कार्यकाळात आयसीएचआरचे लोकशाहीस्वरूप नष्ट केले गेले. ते आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि आयसीएचआर या संस्थांचा मार्क्सवादी इतिहासकारांचा अड्डा बनविल्याचाही त्यांचा आरोप आहे. असो.
डॉ. मुहम्मद त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, अयोध्येतील उत्खनात जे खांब आढळले ते काळ्या बसॉल्ट दगडांपासून तयार केलेले होते. त्यांच्या तळाशी पूर्ण कलश (गुंबद) खोदलेले होते. अशा प्रकारचे नक्षीकाम ११ आणि १२व्या शतकातील मंदिरांमध्येच बघावयास मिळते. आम्ही अयोध्येत २ महिने होतो. आम्ही वास्तूच्या मागे आणि इतर दोन ठिकाणीसुद्धा उत्खनन केले. त्या वेळी खांबांच्या खाली विटांचे सपाट थर (आधार) आढळून आले. याच पुराव्यांमुळे तेथे मंदिर अस्तित्वात होते, हे ठामपणे सांगता येते. १९७८ नंतरही तेथे मंदिरांचे अनेक अवशेष आढळले. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवेच्या वेळी ही वास्तू पाडली गेली, त्यानंतर आमच्या तर्काला पुष्टी देणारे अनेक पुरातत्त्वीय पुरावे आमच्या हाती आले. यातील महत्त्वाची विष्णू हरीची दगडाची पाटी होती. या पाटीवर हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, असे स्पष्टपणे लिहिले आहे. श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत, ज्यांनी वाली आणि रावण यांचा वध केला होता. १९९२ मध्ये डॉ. वाय. डी. शर्मा आणि डॉ. के. टी. श्रीवास्तव यांनी संशोधन केले. ज्यात त्यांना विष्णू आणि शिव-पार्वतीच्या मूर्ती आढळल्या त्या कुषाण काळातील (इ. स. १०० ते ३००). २००३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा झालेल्या उत्खननात मंदिराच्या ५० हून अधिक खांबांच्या अवशेषांचा शोध लागला. याच ठिकाणी मंदिरातील मूर्तींवर अभिषेकाचे पाणी टाकणार्‍या संरचना प्राप्त झाल्या. या प्रतिमा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणून गणल्या जातात. कुठल्याही मशिदीत वा कुणाच्या घरात त्या कधीच आढळत नाहीत. यानंतर उत्तरप्रदेश पुरातत्त्व सर्वेक्षणचे निर्देशक डॉ. रागेश तिवारी यांनी एक अहवाल सादर करून, वास्तूच्या आसपास आढळलेले मंदिराचे २६३ अवशेष गुप्तकालीन असल्याचा अहवाल भारत सरकारला सोपवला.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने ठामपणे सांगितले की, उत्खननादरम्यान या वादाशी संबंधित ज्या व्यक्ती आणि संस्था सहभागी झाल्या होत्या त्या कुणाशीही भेदभाव व्हायला नको. उत्खननाच्या चमूत एकूण १३१ सदस्य होते, त्यातील ५२ मुसलमान होते. या शिवाय बाबरी समितीने विशेषज्ञांची जी यादी दिली होती, त्यांनादेखील या कार्यात सहभागी करून घेण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यावर न्यायालयाचे जातीने लक्ष होेते. ही प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि निष्पक्ष करण्यासाठी अजून काय करण्याची आवश्यकता होती? आम्ही या तथ्यांच्या आणि पुराव्यांच्या आधारे या निष्कर्षाप्रत आलो आहोत की, तेथे एक मंदिर होते. डॉ. मुहम्मद यांच्या आत्मचरित्रातील नोंदींनी जगाला सत्याबाबत अवगत केले आहे. आता गरज फक्त उघड्या डोळ्यांनी सत्य स्वीकारण्याची…!

चारुदत्त कहू/ ९९२२९४६७७४