पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशनीतीची फलश्रुती…

0
217

देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे करार, आर्थिक, यांत्रिक व दहशतवाद्यांच्या उच्चाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. रोज वर्तमानपत्रांतून प्रकाशित होणार्‍या बातम्यांवरून हे भारतीयांना जाणवत आहे. पंतप्रधानांनी आजवर अनेक देशांचा दौरा केला व देशहिताचे करार घडवून देशाच्या हिताचाच विचार केला, हे सर्वश्रुत आहे.
२०१४ मध्ये चीनशी मैत्रीपूर्ण व्यवहार व स्थापित संबंधातील विश्‍वसनीयता सुदृढ व कायम करण्याच्या हेतूने, व्यक्तिश: चीनचे राष्ट्रपती शी-जिन-पिंग यांची भेट त्यांनी घेतली होती. त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले होते. परदेश व्यवहारनीतीचा हा एक भाग असला, तरी त्यात आत्मीयतेची भावना होती. असे असले तरी, चीन आपल्या विस्तारवादी धोरणाला मुरड घालेल, असे त्यांनी गृहीत धरले नव्हते. कारण १९४९ मध्ये चिनी कम्युनिस्टांनी चीनची सत्ता प्राप्त केली. माओत्से तुंगच्या नेतृत्वात अधिकाधिक भूमी आक्रमित करण्याचा, चिनी सम्राटांचे प्रदेश जिंकून तिबेटवर आपले स्वामित्व प्राप्त करावयाचा प्रयत्नही केला. १९६२ मध्ये भारतावर आक्रमण करून, भारतीय समाजाची आर्थिक व लोकशाहीव्यवस्था खिळखिळी करण्याची रणनीती चीनने आखली होती. यात काही प्रदेश गिळंकृत करण्यात चीनला यश मिळाले.
पं. नेहरूंच्या शासनकाळात १९५६ मध्ये चीनचे प्रधानमंत्री चाऊ-एन-लाय हे भारतभेटीस आले होते. त्यांचे हार्दिक स्वागत केले गेले होते. याच ‘अतिथी देवोभव’ या भावनेने त्यांचे स्वागत, सत्कार झाले. याच पद्धतीने मोदींनी, राष्ट्रपती शी-जिन-पिंग यांचा आदरसत्कार केला. गेल्या तीन वर्षांत भारत-चीनचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले. या उलट, १९६२ मध्ये ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण केले. संपूर्ण देश आंदोलित झाला. कुठलीही दयामाया न दाखवता आपल्या विस्तारवादी धोरणाला अनुसरून, हजारो मैल भारताची भूमी गिळंकृत केली. इतकेच नव्हे, तर अरुणाचल हा प्रदेश आमचा आहे, असा दावासुद्धा केला होता. पं. नेहरूंचे कुणी कितीही गोडवे गायिले, तरी इतिहास सांगतो की, प्रधानमंत्री या नात्याने जो राजकीय दृष्टिकोन आवश्यक असतो तो नेहरूंमध्ये कधीच नव्हता!
तिबेटमध्ये गवताचे पातेही उगवत नाही, म्हणून त्यांनी तिबेटकडे डोळेझाक केली व याचा लाभ घेत, बारीक डोळ्यांच्या धूर्त चिन्यांनी तिबेटपर्यंत रस्ते बांधले. ही आपली मातृभूमी आहे, ही भक्तीची भावनाच त्यांच्यात नव्हती. चिन्यांचा आक्रमक राष्ट्रवाद अन्य देशांच्या समाजवादापेक्षा भिन्न आहे. चीनचे सत्ताधीश, मार्क्सवाद व लेनिनवादाचे नाव घेत, विस्तारवादी सिद्धांतानुसार वागत आहेत. ते नेहमीच युद्धाच्या तयारीत असतात. युद्ध अनिवार्य आहे, हीच त्यांची भावना असते. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत शेजारच्या एकाही देशावर आक्रमण केले नाही, असे इतिहास सांगतो. विश्‍वचि माझे घर, वसुधैव कुटुंबकम, विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो… ही ज्ञानेश्‍वर माउलीची भावना आज आपल्याला नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीत दिसून येते. नेहरूंचे असे नव्हते. गेल्या ७०-७५ वर्षांपासून पाकिस्तानची डोकेदुखी भारताला मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सुरू आहे, याचे कारण पं. नेहरूंची अराजकीय अंधदृष्टी होय!
वर्तमानात चिनी सेना हिंद महासागरात सक्रिय आहे. पाकिस्तानला भारताविरुद्ध भडकवून शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. व्यापार व सैन्यसामुग्री देऊन आशियातील देशांमध्ये आपला दबदबा प्रभावशाली करतोय. चीन, वस्तूंची निर्मिती करून स्वस्त भावात भारत, पाकिस्तान व अन्य देशांना पाठवीत असल्यामुळे; जागतिक व्यापारावर त्याचा वाईट परिणाम होतो असे अनुभवास येते. पंतंगीचा मांजा, बॅटरी सेल्स व इतर अनेक वस्तू. गुणवत्ता असलेली एखादी स्वदेशी वस्तू जर १० रु.ला मिळत असेल तरी तीच वस्तू चीन ३ रु.ला उपलब्ध करून देतो. यामागे आर्थिकव्यवस्था घुशीसारखी पोखरत जाणे, हीच चीनची भावना आहे.
नेपाळ हे एकमात्र ‘हिंदुराष्ट्र’ होते. त्यावरही चीनने आपला पंजा कसला आहे- नागाने विळखा घालावा तसा. मला असे वाटते की, नेहरूंनी तिबेटमध्ये सैन्यतळ उभारला असता तर चीनचा उपद्रव टाळता आला असता. गेल्या अनेक शतकांपासून भारत व नेपाळमध्ये सामाजिक, आर्थिक व राजनैतिक संबंध सुदृढ होते. परंतु, चिनी ड्रॅगनने नेपाळला आपल्या पंजात जखडून टाकले असून नेपाळ, चिनी सूत्रानुसार वागताना दिसतोय. चीन नेपाळकडून स्वहिताची कामे करवून घेत आहे.
याचा परिणाम भारताच्या विदेशनीती व कूटनीतीवर होत आहे. नेपाळच्या या दुरवस्थेमुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपुढे यक्षप्रश्‍न निर्माण होऊ शकतो. परंतु, मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार हा प्रश्‍न हाताळण्यास समर्थ आहे. पाकिस्तान व नेपाळच्या समस्या, वारसाहक्कानेच त्यांना मिळाल्या आहेत. कॉंग्रेसचे सरकार ७० वर्षे डोळे मिटून बसल्याचे हे परिणाम आहेत. बांगलादेशप्रमाणे इथेही बुद्धिजीवी व शिक्षित लोकांचे उच्चाटन करण्यासाठी कम्युनिस्ट लोक टपून बसले आहेत. साम्यवाद्यांना सशस्त्र क्रांती करून सत्ता प्राप्त करणे एवढेच ठाऊक आहे. खरे पाहता साम्यवाद हा रशिया-जर्मनी व अन्य देशात कुठेच नाही. भारतात फक्त केरळ व पं. बंगालमधेच आहे. संसदेतले स्वनामधन्य कम्युनिस्ट फक्त संसदेचा भत्ता घेण्यापुरते उरले आहेत.
चीनने श्रीलंका व मालदीव यांना आर्थिक साहाय्य देऊन सहानुभूती प्राप्त केलीच आहे. पाकिस्तानलाही आर्थिक व सैन्यास लागणारी शस्त्रे पुरविणे सुरू आहेच. चिनी सरकारने वन बेल्ट वन रोड तयार केलेच आहेत. भारताने विरोध केला असला, तरी चीन बेशरमीचे पांघरूण डोक्यावर घेऊन घोरत राहील. दुसर्‍याला घोर लावून स्वत: घोरत राहणे, हा चीनचा स्वभावधर्मच आहे.
नरेंद्र मोदींनी गेल्या तीन वर्षांत विदेशनीती व आंतरिक सुरक्षेसंबंधी जे धोरण अंगीकारले आहे ते स्तुत्य आहे, यात शंका नाही. पं. नेहरूंनी अमेरिकेसारख्या धनवादी देशांपेक्षा समाजवादी देशांकडेच अधिक लक्ष दिले. चीनच्या युद्धाचे प्रसंगी त्यांनी पंचशीलचा घोष केला. पण, ज्यांना शीलच नाही, त्यांना पंचशील काय कळणार? प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी, पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केलाय. व्यक्तिश: अचानक, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन आपल्या सद्भावना व्यक्त केल्या. चर्चेसाठी तयारी दाखविली. पण, जिथे मानवतेचाच अभाव व हिंदूंशी नफरत अशी भावना आहे, तिथे परिणाम शून्यतेपेक्षा काय प्राप्त होणार? भारताच्या सीमेवर रात्रंदिवस गोळीबार, छोटे बॉम्ब, मॉर्टरचा मारा करणे हाच त्यांना आपला धर्म वाटतो. काश्मीर घाटीतील हिंसाचार, भारतीय सैन्यावर दगडांचा वर्षाव करण्यासाठी तरुणांना भडकवून सैनिकांवर दगडफेक करणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे, हेच पाकिस्तानचे नापाक धोरण सुरू आहे. सुर आणि असुर, देव आणि दैत्य असे जगाचे द्विभाजन झाले आहे. हे मनाला चटके देणारे वास्तव आहे.
नरेंद्र मोदींनी सुमारे ४५ राष्ट्रांना भेटी देऊन भारताचा विकास व्हावा यासाठी मेक इन इंडियाचा प्रचार तर केलाच, पण अन्य देशांच्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांशी वैयक्तिक व राष्ट्रीय पातळीवर प्रयत्नही केले आहेत. हे रेशीमगाठी संबंध ठरावे! प्रधानमंत्री होताना सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्याची कल्पना मोदींशिवाय कुणालाच सुचली नाही. कधीकधी साध्या गोष्टीही मनावर सकारात्मक भावनिक प्रयत्न करून जातात. यासाठी हृदयात देशभक्तीचे अमृत हवे असते. ते ओठावर आणले की, गाणीही अमृतमय होते व म्हणूनच ते जगातले सर्वप्रथम लाडके प्रधानमंत्री ठरले आहेत! मोदींचा श्‍वास-प्रश्‍वास ‘सबका साथ सबका विकास’ यासाठीच असतो.
नरेंद्र मोदींच्या तीन वर्षांच्या कुशल कार्यशैलीचा सार हा की, ते शत्रूच्या राजकीय रणनीतीशी सामना करण्यात चतुर आहेत. संकटातून मार्ग काढणे, सहकार्‍यांना प्रेरित करणे, हा त्यांचा धर्म आहे. लालबहादूर शास्त्री व अटलबिहारी वाजपेयी यांचे गुण त्यांच्यात आहेत. यामुळे भारताच्या इतिहासाला आभाळाची उंची देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे.
७० वर्षांच्या कॉंग्रेसच्या अविचारी राजनीतीच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार भारताला वैभवाच्या शिखरावर आरूढ करेल, हा आत्मविश्‍वास!
मधुकर हुद्दार\९८५०३१५७५०