खबर मध्यपूर्वेची…

0
1182

विश्‍वसंचार

‘अल् आसद’ या अरबी शब्दचा अर्थ ‘सिंह.’ सीरियाचा राष्ट्राध्यक्ष बशर अल् आसद आणि त्याचा धाकटा भाऊ महेर अल् आसद हे दोघे आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून नरभक्षक सिंह बनले आहेत. त्यांचा बाप हाफिज अल् आसद हा डाव्या विचारांचा हुकूमशहा होता. सगळ्या अरब देशांचा शत्रू जो इस्रायल, त्याला अमेरिकेचा पाठिंबा असल्यामुळे अरब राष्ट्रांनी सोव्हिएत रशियाशी मैत्री करावी, हे ओघाने आलंच, पण हाफिज अल् आसदची सोव्हिएत मैत्री ही फक्त राजकारणापुरती नव्हती. आपण डाव्या विचारसरणीचे आहोत, असं तो म्हणत असे. त्यामुळे दडपशाहीच्या बाबतीतही त्याने स्टॅलिनचा कित्ता गिरवला.
सध्या बशर अल् आसदविरुद्ध ‘ते’ प्रचंड आंदोलन सुरू आहे. त्याचं एक महत्त्वाचं केंद्र आहे हामा हे शहर. आता १९८२ सालचा म्हणजे तीन दशकांपूर्वीचा एका पत्रकाराचा हा अनुभव पाहा. टॉमस फ्रीडमन हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रख्यात स्तंभलेखक. १९८२ साली तो लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये ‘टाइम्स’चा मध्यपूर्वेतला वार्ताहर होता. फेबु्रवारी १९८२ मध्ये सीरियाच्या हामा शहरात हाफिज आसदविरुद्ध सुन्नी बंडखोरांनी उठाव केला. हाफिज असदने तो थेट रशियन शैलीने चिरडून टाकला. प्रथम हामा शहरातल्या सुन्नीबहुल वस्त्यांवर सरळ तोफांचा भडिमार करण्यात आला. मग रणगाडे धडधडत आले. त्यांनी वस्त्यांमध्ये खोलवर शिरून तोफा डागल्या. मग लष्करी बुलडोझर आले. त्यांनी उद्ध्वस्त झमारतींमध्ये कोणी जिवंत आहेत का? जखमी आहेत का? याची कसलीही पर्वा न करता समोर दिसेल ती इमारत पार भुईसपाट करून टाकली.
ही घटना फेबु्रवारी १९८२ मध्ये घडली. तेव्हा ना इंटरनेट होतं ना भ्रमणध्वनी. दूरध्वनी, टेलेक्स, तार आणि डाक ही संपर्काची साधनं होती. ती बंद करण्यात आली. तब्बल तीन महिने कुणीही देशी-परदेशी वार्ताहराला हामा शहरात प्रवेश नव्हता. अखेर मे महिन्यात वार्ताहरांना सीरियन राजधानी दमास्कसमध्ये जाऊ देण्यात आलं. फ्रीडमन लिहितो, ‘‘घाईघाईने मी एक टॅक्सी ठरवली आणि हामा शहराकडे निघालो. शहरांच्या आसमंतात पोहोचलो. कसला बोडक्याचा आसमंत! सगळं तोफांच्या मार्‍याने विद्रूप झालेलं! उद्ध्वस्त! खुद्द हामा शहरात तर फुटबॉलची मैदानं तयार झाली होती. साधी मैदानं नव्हती ती. कुठेही पायाने जरा ठोकरलं तरी एखादा गालिचा, एखादा पडदा, एखादं स्वयंपाकाचं भांडं, एखादं टेबल अशा घरगुती वस्तू बाहेर येत होत्या. बुलडोझर्सनी राहत्या घरांना जमीनदोस्त केल्यामुळे बनलेली ‘प्रेत मैदानं’ं होती ती! ‘किलिंग फिल्डस्’! ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल’ने नंतर सादर केलेल्या अहवालानुसार, हामा शहरातली ती बंडाळी दडपताना हाफिज आसदने किमान २० हजार माणसं ठार केली होती.
‘अल् जम्हूरिया अल् अरबिया अस् सीरिया’ उर्फ ‘सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ सीरिया’ हा एक अत्यंत प्राचीन देश आहे. कॅननाईट, फिनिशियन, असीरियन इत्यादी प्राचीन संस्कृतींनी इथे शतकानुशतके अंमल गाजवला. ग्रीकांनी आणि त्यांच्या नंतर रोमनांनी असीरियन लोकांचा हा देश असीरिया जिंकला. त्यांच्या भाषेतून ‘अ’ गळून पडला आणि ‘सीरिया’ शिल्लक राहिला. रोमन साम्राज्याच्या वैभवाच्या काळात रोम आणि अलेक्झांड्रियाच्या खालोखाल सीरियामधलं अँटिऑक हे अतिशय महत्त्वाचं शहर होतं. ख्रिश्‍चन धर्माच्या दृष्टीनेही सीरिया हा महत्त्वाचा देश होता. कारण सेंट पॉल हा महान ख्रिस्त धर्मप्रसारक सीरियातला होता.
इ. स. ६४० मध्ये अरब मुस्लीम सेनापती खालिदा इब्न अल् वालिद याने सीरिया जिंकला. अरबांच्या राजवटीत सीरियाची राजधानी दमास्कस किंवा मूळ अरबी नाव ‘दमिश्क’ या शहराला अतोनात महत्त्व प्राप्त झालं. अरबांच्या साम्राज्याची राजधानी खरं म्हणजे बगदाद. त्यांचा एकाच वेळी राजा आणि धर्मगुरू असणारा सर्वोच्च नेता, जो खलिफा, तो बगदादमधून राज्य करायचा. पण पुढच्या काळात खलिफादी गादी काही काळ दमास्कसमध्येही होती. अरबांकडून तुर्कांनी साम्राज्य हिसकावलं आणि थेट २०व्या शतकापर्यंत तुर्कांच्या विशाल उस्मानी किंवा ऑटोमन साम्राज्यात सीरिया सुखाने नांदला.
२० व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात म्हणजे सन १९१४ ते १९१८ मध्ये जगात अत्यंत भीषण असं महायुद्ध झालं. पुढे त्याला ‘पहिलं महायुद्ध’ असं नाव मिळालं. या युद्धात एका बाजूला ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका होते, तर दुसर्‍या बाजूला जर्मनी आणि ऑटोमन साम्राज्याचा मालक तुर्कस्तान हे होते. जर्मनी आणि तुर्कस्थान युद्ध हरले. मग विजेत्या अँग्लो फ्रेंचांनी जर्मनी आणि तुर्कांच्या विशाल साम्राज्याचे लचके तोडून खाणं ओघानेच आलं. त्यातला सीरियाचा भूप्रदेशाचांच्या वाट्याला आला. १९२० सालच्या ‘लीग ऑफ नेशन्स’च्या करारानुसार हा बदल घडला. फ्रेंचांच्या अंमलामुळे सीरियन अरब मुसलमानांना आधुनिकतेचं किंचित वारं लागायला सुरुवात झाली. त्यातूनच त्यांनी फ्रेंच अधिसत्तेविरुद्ध बंड करायला सुरुवात केली.
१९३९ ते १९४५ या काळात जगभरात पहिल्या महायुद्धापेक्षाही अत्यंत भीषण असं दुसरं महायुद्ध झालं. त्यातही जर्मनी हरला आणि अँग्लो फ्रेंच जिंकले. पण त्यांची माणसं इतक्या मोठ्या संख्येने मारली गेली होती की, आशिया-आफ्रिकेतल्या आपल्या वसाहती ताब्यात ठेवणं आता त्यांना अशक्य बनलं. त्यामुळे एप्रिल, १९४६ मध्ये फ्रेंचांनी सीरिया सोडला.
पण म्हणून तिथे लोकशाही आली नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर झपाट्याने स्वतंत्र झालेले आशिया आफ्रिकेतले अनेक देश आणि भारत यांचा तौलनिक राजकीय अभ्यास करताना आपण हा महत्त्वाचा मुद्दा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे. भारताच्या आगेमागे स्वतंत्र झालेले बहुतेक आशियाई देश मुसलमान होते. तिथे कुणातरी जबरदस्त लष्करी हुकूमशहाचीच सत्ता आली. अगदी भारतातूनच अलग झालेल्या मुसलमानी पाकिस्तानचं उदाहरण पाहा. पाकचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा खून झाला. नंतर भरपूर घडमोडी होऊन अखेर अयूबखान हा लष्करी अधिकारीच सर्वेसर्वा बनला. आफ्रिकन देश हे धर्माने ख्रिश्चन होते. पण त्यांच्याही मनावर युरोपीय लोकशाही मूल्यांपेक्षा त्यांच्या मूळ टोळी संस्कृतीचाच पगडा होता. आजही आहे. त्यामुळे नवस्वतंत्र आफ्रिकन देशांमध्येही कुणीतरी लष्करी हुकूमशहाच सत्तेवर आला. युरोपमधल्या देशांच्या लोकशाही सत्तांना कित्येक शतकांचा इतिहास आहे. असंख्य घडमोडी, बंडं, क्रांत्या उठाव यामधून त्या सत्ता विकसित होत गेल्या आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच म्हणजे गेल्या सव्वादोनशे वर्षांपासून लोकशाही देश आहे. भारत हा असा एकमेव देश आहे की, जो इतर लोकशाही देशांच्या तुलनेत नवस्वतंत्र असूनही, तिथल्या लोकसमूहाने ही नवी राज्यव्यवस्था सहजपणे आत्मसात केली आहे. कारण तो समाज हिंदू आहे.
१९४६ साली सीरिया स्वतंत्र झाला खरा, पण त्याची सत्ता कायम एका लष्करी हुकूमशहाकडून दुसर्‍या हुकूमशहांकडे अशीच राहिली. त्या काळातल्या सगळ्याच अरब राष्ट्रांप्रमाणे सीरियासुद्धा सोव्हिएत रशियाच्या गोटात दाखल झाला. १९६७ साली इजिप्त आणि सीरिया यांनी इस्रायलवर हल्ला चढवला. इस्रायलने दोघांनाही हग्या मार देत सीरियाकडून गोलन टेकड्या हा लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग हिसकावून घेतला. आजही तो इस्रायलकडेच आहे.
एकेकाळी सीरियन हवाई दलात अधिकारी असलेला आणि त्यावेळी सीरियाचा संरक्षणमंत्री असलेला हाफिज आसद हा महत्त्वाकांक्षी इसम अशा संधीची वाटच पाहत होता. त्याने क्रांती केली आणि १९७० साली सत्ता हडपली. तेव्हापासून २००० सालापर्यंत म्हणजे ३० वर्षं हाफिजने सीरियावर अप्रतिहत सत्ता गाजवली. या काळात हाफिजविरुद्ध अनेकदा उठाव झाले. त्यातल्या १९८२च्या हामामधल्या उठावाची वासलात त्याने कशी लावली, ते आपण टॉमस फ्रीडमनच्या शब्दांत वाचलंच आहे. आजूबाजूचे सगळे अरब देश सुन्नीपंथीय होते. त्यांचे हुकूमशहादेखील सुन्नीच होते, पण सीरियाची गंमत अशी की, तिथे सुन्नी जनता ७४ टक्के आणि त्यांच्यावर हुकूमत गाजवणारा हाफिज आसद मात्र अलावीस किंवा आल्वाईट या शियांमधल्या एका उपपंथाचा अनुयायी. अलावीस , आल्वाईट, नुसायरी आणि अन्सारी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा शिया उपपंथ मुळात गुप्त तांत्रिक पंथ समजला जातो. त्यामुळे शुद्ध शियापंथीय लोक अलावीस मंडळींना चार हात दूरच ठेवतात. हाफिजविरुद्ध होणार्‍या बंडात, त्याच्या दडपशाहीविरोधापेक्षा हा भिन्न पंथाचा भाग जास्त होता.
२००० साली हाफिजच्या मृत्यूमुळे सत्तेवर आलेल्या बशर आसदने बापाचाच दडपशाही वारसा चालवला आहे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. सोव्हिएत रशियाचा आधार तुटला आहे. मानवाधिकाराची पायमल्ली करण्यावरून बोंबाबोंब करणार्‍या संस्था वाढल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे जगभर बदनामी होण्यासाठी काही मिनिटं पुरतात. तरीही बशर आसद रेटून राज्य करतो आहेे, असं म्हटलं जातं की, लोकांना रगडून काढण्याच्या कामात त्याचा धाकटा भाऊ महेर अल् आसद हा जास्त माहिर आहे. बशर हा अवघा ५२ वर्षांचा आहे, तर मेहर फक्त ५० वर्षांचा आहे. राष्ट्राध्यक्ष बशरच्या खास तैनातीत असलेलं कमांडो पथक रिपब्लिकन गार्ड, सीरियन लष्कराची प्रसिद्ध तुकडी चौथी आर्म्ड डिव्हिजन यांच्यासह, सीरियन गुप्त पोलीस दलाचंही प्रमुख पद महेर आसदने स्वत:च्या हातात ठेवलं आहे. तो अत्यंत आक्रमक आणि जुलमी स्वभावाचा असून थोरला भाऊ बशर यांच्याखेरीज तो कुणाचंही ऐकत नाही. दोघेही भाऊ उच्चविद्याविभूषित आहेत, पण राज्यकारभार मात्र ते मध्य युगातल्या लहरी आणि अनियंत्रित सुलतानांप्रमाणेच करतात. मुसलमान हे अशिक्षित असल्यामुळे क्रूरपणे वागतात, दंगे करतात, असा आपल्याकडच्या विचारवंतांचा एक नेहमीचा मुद्दा असतो. त्यासाठी हे मुद्दाम सांगितलं.
सध्या वेगवेगळ्या मानवाधिकार संस्थाच नव्हे, तर खुद्द अमेरिकाही बशर आसदवर राजनैतिक दडपण आणून त्याला सत्तेवरून पायउतार करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण अजून तरी बशर आणि महेर या अरबी सिंहांचं नरसंहाराचं सत्र अजिबात उणावलेलं नाही.

मल्हार कृष्ण गोखले