परमवीरचक्राचा अनोखा इतिहास…

0
207

परमवीरचक्र या पदकाची निर्मिती अशा महिलेने केली आहे जी जन्माने भारतीय नाही. या विशिष्ट महिलेचे नाव आहे- इव्हा यव्होन्ने लिण्डा मेडे- डे-मारोस. त्यांची आई रशियन होती तर वडील हंगेरियन. कॅप्टन विक्र्रम खानोलकर या भारतीय सैन्याधिकार्‍याशी विवाह केल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला.

स्वातंत्र्यपूर्वकाळात युद्धात पराक्रम गाजविल्याबाबत भारतीय सैनिकांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात येत असे. प्रथम महायुद्धात शौर्य गाजविल्याबाबत ११ सैनिकांना, तर द्वितीय महायुद्धात तब्बल २८ सैनिकांना पुरस्कृत करण्यात आले. द्वितीय महायुद्धातील पहिला व्हिक्टोरिया क्रॉस सन्मान सेकण्ड ले. पी. एस. भगत यांना प्राप्त झाला होता. पुढे ते ले. जन. या पदावरून निवृत्त झाले.
स्वातंत्र्यलढा ज्या विचारधारेने प्रेरित होऊन लढला गेला त्याचे प्रतिबिंब शौर्यपदकाच्या संकल्पनेत उमटणे स्वाभाविक होते. ब्रिटिशांच्या काळात हे पुरस्कार हुद्यानुसार देण्यात येत होते. भारतीय पुरस्कार देताना उच्च दर्जाचा पराक्रम व समर्पण हेच निकष ठरविण्यात आले. युद्धात शत्रूबरोबर लढताना अतुलनीय पराक्रम गाजविणार्‍या सैनिकास आपल्या देशात परमवीरचक्र या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजपर्यंत २१ शूरवीरांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. यातील १४ सैनिकांना हा पुरस्कार मरणोपरान्त बहाल करण्यात आला. या पुरस्काराचे गठन जानेवारी १९५० मध्ये झाले असले, तरी याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात आली. यामुळे १९४७-४८ मध्ये काश्मीर लढाईत शौर्य गाजविणार्‍या पाच जवानांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यापैकी मे. सोमनाथ शर्मा हे या पदकाचे सर्वप्रथम मानकरी ठरले. या देशाच्या बहुधर्मीय जडणघडणीला अनुसरून हा पुरस्कार प्राप्त करणार्‍यांच्या यादीत सर्व धर्म व पंथांच्या सैनिकांचा समावेश आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. १९५२ पासून शांतता काळात शत्रूबरोबर लढताना शौर्य गाजविणार्‍या सैनिकांना अशोकचक्र या पदकाने सन्मानित करण्यात आले. १९६२ साली चीनबरोबर झालेल्या लढाईत शत्रूच्या अव्याहत मार्‍यासमोर अत्यंत विपरीत परिस्थितीत शौर्य गाजविल्याबद्दल सुभेदार जोगेन्द्रसिंग, मेजर ध्यानसिंग थापा व मेजर शैतानसिंग यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६५ च्या लढाईत मर्दुमकी गाजविल्याबद्दल क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद व ले. कर्नल ए. बी. तारापोर यांना मरणोपरान्त हे पदक देण्यात आले. १९७१ च्या लढाईतील पराक्रमाबद्दल वैमानिक निर्मलजितसिंग सेखॉन तसेच लान्स नायक अल्बर्ट एक्का यांना पुरस्कृत करण्यात आले. १९८७ च्या सियाचीनवरील युद्धासाठी सुभेदार मे. बानासिंग यांना हे सर्वोच्च पदक देण्यात आले. १९९९ च्या कारगिल युद्धासाठी चार सैनिकांना या पुरस्काराने अलंकृत करण्यात आले. या पदकाने सन्मानित झालेले सेकण्ड ले. अरुण क्षेत्रपाल हे सर्वात तरुण सैनिक होते. १६ डिसेंबर १९७१ रोजी ते लढाईत शहीद झाले तेव्हा त्यांचे वय फक्त २१ वर्षे २ महिने २ दिवस इतके होते. युद्धाला तोंड फुटण्याच्या ६ महिने अगोदरच त्यांना १७ पूना हॉर्स या तुकडीत कमिशन मिळाले होते. (आपल्या लष्करप्रमुखांना गुंड ठरविणार्‍या राजकारण्यांनी ही घटना प्रामुख्याने ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.)
आजपर्यंत या यादीत महाराष्ट्रातील एकाच सैनिकाचा समावेश होऊ शकला. ८ एप्रिल १९४८ रोजी सेकण्ड ले. रामा राघोबा राणे यांना काश्मिरातील सरहद्दीवर शत्रूचे भूसुरुंग निकामी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी जखमी झाले असतानाही ८, ९, १० व ११ या चार दिवशी सतत कठीण परिस्थितीत काम करत आपल्या सैन्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना परमवीरचक्र बहाल करण्यात आले.
आपल्या देशाने संयुक्त राष्ट्र संघाच्या योजनेंतर्गत अनेक देशांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी परदेशात तुकड्या पाठविल्या आहेत. १९६१ साली कॅप्टन गुरुबचनसिंग सलारिया यांना आफ्रिकेत कांगो देशात बंडखोरांशी सामना करताना वीरमरण आले. या शौर्यासाठी त्यांना परमवीरचक्र देण्यात आले. श्रीलंकेतील शांतिसेनेचे सैनिक मेजर रामस्वामी परमेश्‍वरन् यांना नोव्हेंबर ८७ मध्ये आतंकवाद्यांशी लढताना हौतात्म्य प्राप्त झाले. यासाठी त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपले सैन्यदल हे अराजकीय असून, ते अत्यंत तटस्थपणे व व्यावसायिक पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडत आले आहे. असे असतानाही काही महिन्यांपासून त्यांना अनावश्यक व अनुचित टीकेला सामोरे जावे लागत आहे. देशाच्या भविष्यातील वाटचालीस हे मारक ठरू शकते. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलापुढे संपूर्ण शरणागती पत्करली. भारतीय सैन्याने ‘इन्स्ट्रुमेन्ट ऑफ सरेण्डर’ या दस्तावेजाद्वारे सर्व प्रकारच्या वांशिक अल्पसंख्यक गटांना संरक्षण देण्याचे लिखित आश्‍वासन दिले. अशाप्रकारे सैन्याद्वारे लिखित हमी देणारा अनोखा दस्तावेज जगात अन्यत्र कुठे अस्तित्वात असेल असे वाटत नाही. (या दस्तावेजाचे प्रारूप भारतीय सैन्याच्या मे. जन. जे. आर. एफ. जेकब या ज्यू अधिकार्‍याने तयार केले होते, हे विशेष!) सैन्यावर टीका करणारे या महत्त्वपूर्ण बाबीकडे का डोळेझाक करतात, हे समजण्यास मार्ग नाही.
भारतीय वंशाच्या लोकांना विदेशात यश प्राप्त झाल्यावर व मानाचे स्थान मिळाल्यावर देशवासीयांना हर्ष होणे स्वाभाविक आहे. असे होत असताना विदेशी वंशाच्या लोकांनी भारताला दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव होत नाही व त्यांना सामावून घेतले जात नाही, असा टीकेचा सूर उमटतो. अशी वस्तुस्थिती नाही हे दर्शविणारे उदाहरण या निमित्ताने प्रस्तुत करणे गरजेचे ठरते. देशाला अभिमानास्पद असलेल्या या घटनेची फारशी चर्चा झाल्याचे आढळत नाही. ही घटना पुढीलप्रमाणे-
परमवीरचक्र या पदकाची निर्मिती अशा महिलेने केली आहे जी जन्माने भारतीय नाही. या विशिष्ट महिलेचे नाव आहे- इव्हा यव्होन्ने लिण्डा मेडे- डे-मारोस. त्यांची आई रशियन होती तर वडील हंगेरियन. २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लण्ड येथे त्यांचा जन्म झाला. त्या देशात होणार्‍या एका हिवाळी खेळाच्या महोत्सवात कॅप्टन विक्रम खानोलकर या भारतीय सैनिक अधिकार्‍याशी त्यांचा परिचय होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. १९३२ साली भारतात येऊन त्यांनी कॅप्टन खानोलकर यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी सावित्रीबाई खानोलकर हे नाव धारण केले. विवाह करताना त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. अल्प कालावधीत त्यांनी हिंदी, मराठी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व मिळविले. हिंदू तत्त्वज्ञान व वेदान्ताच्या आदर्श मूल्यांचे अध्ययन केले. १९५० साली परमवीरचक्र पदकाच्या स्वरूपनिर्मितीचे काम मे. जन. हिरालाल अटल यांच्यावर सोपविण्यात आले होते. या कामासाठी त्यांनी सावित्रीबाई खानोलकर यांची निवड केली. ही निवड करण्यामागील कारण म्हणजे त्यांचे वेदान्ताचे व भारतीय पुराणांचे असलेले सखोल ज्ञान! यासोबतच त्या चित्रकार आणि कलाकारही होत्या. त्यांनी ही निवड सार्थ ठरवत भारतीय संस्कृतीशी सुसंगत अशी कलाकृती घडविली. हे घडवत असताना त्यांना दधिची ॠषींनी केलेल्या त्यागाचे स्मरण झाले व प्रेरणा मिळाली. दधिची ॠषींनी देवांना स्वत:चे शरीर अर्पण केले होते. त्यांच्या अस्थींपासून वज्र या अस्त्राची निर्मिती झाली. सावित्रीबाईंनी वज्र अस्त्राचा उपयोग परमवीरचक्रपदकात चित्रित केला. दोन वज्रांच्या मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची भवानी तलवार रेखांकित केली. अशाप्रकारे एका विदेशी वंशाच्या व्यक्तीकडून एक अजरामर व अस्सल भारतीय कलाकृतीचा आविष्कार घडून आला. या महान व्यक्तीने या देशाच्या धरतीवरच २६ नोव्हेंबर १९९० रोजी आपला देह ठेवला.
या देशातील सर्व आबालवृद्धांनी अशाप्रकारच्या घटनांची दखल घेतली पाहिजे, असे प्रकर्षाने वाटते.
सतीश भा. मराठे/९४२२४७७६६८