रजनीकांतचा राजकीय पक्ष

0
58

प्रासंगिक
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार, हे आता नक्की झाले आहे. १५ जुलैनंतर तो याबाबतची घोषणा करेल, असा अंदाज आहे. त्याच्या राजकारणप्रवेशानंतर तामिळनाडूच्या राजकारणात काय काय बदल होतील, याची चर्चा सध्या रंगली आहे. तामिळनाडूतील राजकारणाचे साक्षेपी निरीक्षक व विचारवंत एस. गुरुमूर्ती यांच्या मते, रजनीकांतचा राजकारणप्रवेश द्राविडी राजकारणाच्या अस्ताचा आरंभबिंदू ठरणार आहे.
रजनीकांत राजकारणात येणार म्हणजे काय करणार? दोन पर्याय आहेत. तो भाजपामध्ये प्रवेश करू शकतो किंवा स्वत:चा प्रादेशिक राजकीय पक्ष स्थापन करू शकतो. आधी तो द्रमुकमध्ये प्रवेश करेल असा अंदाज यासाठी व्यक्त होत होता की, त्याने १९९६ साली द्रमुकला पाठिंबा दिला होता. परंतु, ती आपली चूक होती, असे नंतर त्याने जाहीर कबूलही केले होते. रजनीकांत हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जबरदस्त फॅन आहे. तसे त्याने बरेचदा खाजगीत कबूलही केले आहे. दुसरे असे की, काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी, रजनीकांत राजकारणात येत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे विधान केले होते. त्यामुळे रजनीकांत भाजपात जाईल, अशी काहींची अटकळ होती. भाजपालाही तामिळनाडूत आपले पाय रोवायला कुणातरी स्थानिक व्यक्तीची गरज आहेच. परंतु, विचक्षण राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, तो तसे करणार नाही. रजनीकांतसारख्या महानायकाला सामावून घेणे भाजपालाही अवघड जाईल. कारण भाजपाची पक्ष म्हणून एक शिस्त आहे. एक रचना आहे. त्यात रजनीकांत सामावणे शक्य नाही. हे वास्तव भाजपालाही ज्ञात आहे. त्यामुळे भाजपाही या गोष्टीला तयार नाही आणि ते योग्यही आहे. शेवटी राहिला दुसरा पर्याय व तो म्हणजे स्वत:चा प्रादेशिक राजकीय पक्ष काढणे आणि रजनीकांत याच पर्यायावर गंभीरतेने कार्य करीत आहे.
रजनीकांत राजकारणात येणार, हे आता सर्वांनीच स्वीकारले आहे. आता प्रश्‍न असा निर्माण झाला आहे की, या घडामोडीमुळे तामिळनाडूतील राजकारणावर काय परिणाम होईल. परिणाम तर होणार आहे; पण तो किती प्रमाणात होईल? गुरुमूर्ती यांच्या मते, रजनीकांतचा राजकारणातील प्रवेश तामिळनाडूतील प्रचलित राजकारणात दूरगामी व सखोल परिणाम करणारा असेल. गुरुमूर्ती यांचे रजनीकांतशी जवळचे संबंध आहेत. रजनीकांतशी त्यांच्या बर्‍याच चर्चा झाल्या आहेत व होत असतात. गुरुमूर्ती यांच्या मते, रजनीकांत हा हिंदू परंपरा मानणारा धार्मिक व्यक्ती आहे. त्याला द्राविडी राजकारणाचा नास्तिकपणा मान्य नाही. १९६७ साली द्रमुक पक्षाचे अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून तेथे द्राविडी पक्षांचेच राज्य राहिले. एक तर द्रमुक नाही, तर द्रमुकमधून फुटून बाहेर पडलेल्या अण्णाद्रमुक पक्षाचे. दुसर्‍या कुठल्याही पक्षाला आजपर्यंत तरी वाव मिळाला नाही. द्रमुक पक्ष स्थापन करणारे अण्णादुराई यांनी घोषित केले होते की, द्रमुक पक्ष हा तत्त्वत: खरा कम्युनिस्ट पक्ष आहे. द्रमुक पक्षातून फुटून नंतर दुसरा पक्ष म्हणजे अण्णाद्रमुक स्थापन करणारे एम. जी. रामचंद्रन् यांनी, आपल्या पक्षात कम्युनिझम्, समाजवाद व भांडवलशाही यांचे मिश्रण असल्याचे सांगितले. या दोन्ही द्राविडी पक्षांना आर्य-अनार्य वाद मान्य होता. उत्तर भारतातील आर्य आपल्यावर म्हणजे द्रविडांवर आक्रमण करून आपले अस्तित्व संपवतील, अशी भीती दक्षिण भारतीय लोकांमध्ये रुजविण्यात आली होती. त्या मानसिकतेचा फायदा घेत तामिळनाडूत द्रमुक पक्ष रुजला. ही मानसिकता रुजविण्यात ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे भारतीय राजकारणात तामिळनाडूमधील राजकारणाचा एक वेगळा व स्वतंत्र प्रवाह नेहमीच राहिला आहे. द्राविडी राजकारणाचा भर ब्राह्मणवादाला विरोध करण्यावर राहिला. ब्राह्मणवादाचे समर्थक म्हणून तेथील ब्राह्मणांवर नेहमीच अन्याय, अत्याचार करण्यात आले. परिणामी या राज्यातील बहुतेक ब्राह्मण कुटुंबे राज्य सोडून दुसरीकडे स्थायिक झालेले बघायला मिळतात. गेली शंभर-दीडशे वर्षे तामिळनाडू राज्यात सातत्याने द्राविडी विचारसरणीचा राजकीय प्रभाव असला, तरी या राज्यातील जनतेने मात्र वैदिक परंपरेशी असलेली आपली नाळ तुटू दिली नाही. हा एक विरोधाभासच म्हटला पाहिजे. म्हणजे, येथील राजकीय सत्ता सातत्याने वैदिक परंपरा नाकारणार्‍या पक्षांकडे राहिली; परंतु सर्वसामान्य जनता मात्र वैदिक परंपरांचे निष्ठेने पालन करणारी राहिली. ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी हेतुपुरस्सर आखलेली आर्य-अनार्य विभाजन रेषा, रजनीकांत यांच्या राजकारणप्रवेशाने हळूहळू धूसर होत जाईल, असे गुरुमूर्ती यांचे म्हणणे आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर भारतीय राजकारणात होणारा हा अत्यंत महत्त्वाचा, दूरगामी परिणाम करणारा बदल असेल.
गुरुमूर्ती यांचा कयास आहे की, रजनीकांत यांचा पक्ष, भाजपानेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक बनेल. रजनीकांत, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या तसेच भ्रष्टाचारविरहित राजकारणाचे चाहते आहेत आणि रजनीकांत यांच्या पक्षालाही हीच भूमिका घ्यावी लागणार आहे. रजनीकांत सध्या आपल्या समर्थकांना भेटत आहेत. त्या वेळी ते म्हणाले की, मी माझ्या कुठल्याही समर्थकाला माझ्या नावाचा उपयोग करून पैसे गोळा करू देणार नाही.
तामिळनाडूत रजनीकांत यांच्या लोकप्रियतेची आपण कल्पना करू शकणार नाही. त्याचे समर्थक प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा विधानसभा निवडणुका होतील, तेव्हा रजनीकांतचा पक्ष बहुमतात येऊन, रजनीकांत मुख्यमंत्री झालेला दिसेल, असे गुरुमूर्ती यांचे म्हणणे आहे. ज्या क्षणी रजनीकांत राजकारणात पाय ठेवेल, त्याचक्षणी तामिळनाडूतील सर्व लहान-लहान पक्ष संपतील. रजनीकांतच्या पक्षाचा सर्वात मोठा फटका अण्णाद्रमुक पक्षाला बसेल. सध्या हा पक्ष नेतृत्वहीन आहे. जयललिता यांचे निधन झाले आहे. राजकीय सत्ता ई. पलानीस्वामी यांच्याकडे आहे. पक्षातील बहुतेक कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या बाजूने आहेत, तर पक्षाजवळ असलेली प्रचंड संपत्ती शशिकला यांच्याकडे आहे. त्यामुळे नेतृत्वहीन अण्णाद्रमुकचे ७५ टक्के मतदार रजनीकांत यांच्या बाजूला जातील. दुसरीकडे, द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी विकलांग अवस्थेत आहेत. त्यांचा उत्तराधिकारी एम. के. स्टॅलिनबाबत लोकांमध्ये चांगली भावना असली, तरी या पक्षाचेही संघटन खिळखिळे झालेले आहे. त्यामुळे द्रमुक पक्षाचेही बरेच मतदार रजनीकांत ओढेल, असा गुरुमूर्ती यांचा अंदाज आहे. अर्थात, हे अण्णाद्रमुक किंवा द्रमुक पक्षाला मान्य नाही. ते रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश (जाहीर रीत्यातरी) हलक्याने घेत आहेत. पण तसे अजीबात नाही. हे खरे आहे की, जुन्या पक्षांचे संघटन आहे. गावागावात त्यांच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत. पण, रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश एखाद्या झंझावातासारखा असेल. या गोंधळाच्या परिस्थितीतून नंतर मात्र रजनीकांत यांचाच उदय होईल, यावर बहुतेकांचे एकमत आहे. असे झाले तर, एका महत्त्वाच्या राज्यातून कम्युनिस्ट विचारसरणी संपण्याच्या मार्गाला लागेल. भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची घटना ठरणार आहे.
श्रीनिवास वैद्य