इंद्राणी मुखर्जीवर आणखी एक गुन्हा

0
135

महिला कैद्यांना चिथविल्याच्या आरोप
मुंबई, २६ जून
हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर कारागृहातील महिला कैद्यांना चिथावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्राणीसह अन्य पाच महिलांवर नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
असे आहे प्रकरण
भायखळा तुरुंगात ३५ वर्षीय मंजुळा शेट्ये या महिला कैद्याची कथित हत्या झाली होती. याविरोधात तुरुंगातील महिला कैद्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. यात तुरुंगातील अनेक कर्मचारी जखमी झाले होते.
इंद्राणी मुखर्जीने महिला कैद्यांना हिंसक आंदोलनासाठी प्रवृत्त केले आणि मुलांचा वापर मानवी ढाल म्हणून करण्यास सांगितले, असा तिच्यावर आरोप आहे. भायखळा तुरुंगात महिला कैद्यांना सहा वर्षांच्या मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची परवानगी आहे.
तुरुंग अक्षीक्षकाने मंजुळा शेट्येला कथित मारहाण केली होती. पण तुरुंग अधिकार्‍यांच्या मते तिचा मृत्यू हृदयविकाराने झाला होता. मात्र, तिच्या डोक्यावर अनेक जखमा झाल्या होत्या, शिवाय अंतर्गत जखमाही होत्या असा खुलासा शवविच्छेदन अहवालातून झाला. या अहवालानंतर तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकर आणि पाच सुरक्षा जवानांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
मनीषा पोखरकर यांनी २३ जून रोजी मंजुळा शेट्येला कथितरित्या थोबाडात लगवाली होती आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर इंद्राणी मुखर्जीने कैद्यांना भडकविण्यास सुरुवात केली. मंजुळाच्या मृत्यूनंतर इंद्राणीने कैद्यांना आंदोलन करण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर मुलांचा ढाल म्हणून वापर करण्यास सांगितले, जेणेकरून तुरुंग प्रशासन त्यांच्याविरोधात बळाचा वापर करणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)