भुशी धरण तुडुंब भरले

0
110

पर्यटकांची अफाट गर्दी
पुणे, २६ जून
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील पाहायला मिळते.
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. पावसाने ऐन सुटीच्या दिवशी हजेरी लावल्याने भुशी धरण ओसंडून वाहू लागले. मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. या पावसाने पर्यटकांना चांगलीच संधी मिळाली. धरणाच्या सांडव्यावरून वाहणार्‍या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसतात. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी ४० टक्के भरलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल अर्ध्याहून अधिक पाणी साठा वाढला. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे.
शनिवार, रविवार आणि ईदची अशी तीन दिवस सलग सुटी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भुशी धरणावर फेरफटका मारण्यासाठी आले होते. या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांनी धरणाच्या पायर्‍यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा तसेच फोटो काढण्याचा आनंद लुटला. धरणाच्या पाणीपातळीत झालेली वाढ स्थानिक विक्रेत्यांना सुखावणारी आहे. पावसाचा आनंद घेणार्‍या नागरिकांना प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)