रामनाथ कोविंद आणि मीराकुमार

0
90

दिल्लीचे वार्तापत्र
राष्ट्रपतिपदासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या पदासाठी निवडणूक आता अटळ झाली आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक सर्वसहमतीने व्हावी, हा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न यामुळे असफल ठरला आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच जिंकणार ही दगडावरची रेघ आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापेक्षा कितीतरी जास्त संख्याबळ रालोआजवळ आहे. त्यामुळे कॉंग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या मीराकुमार हरण्यासाठी निवडणूक लढवत आहे, हे स्पष्ट आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांनी रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘बिहार की बेटी’ असलेल्या मीराकुमार यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या आधीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली असता, पराभूत होण्यासाठीच मीराकुमार यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केेला. ज्या वेळी कॉंग्रेस आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या स्थितीत होती, त्या वेळी ‘बिहार की बेटी’ असलेल्या मीराकुमार यांना उमेदवारी का देण्यात आली नाही, असा बोचरा सवाल नितीशकुमार यांनी करताच सर्वांचीच बोलती बंद झाली. याचाच अर्थ रामनाथ कोविंद यांची निवडणूक सर्वसहमतीने होऊ नये म्हणून कॉंग्रेसने मीराकुमार यांना जबरदस्तीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवत एकप्रकारे त्यांचा बळीचा बकरा केला आहे.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्याएवढे बहुमत रालोआजवळ असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे समाधान होत नाही. रामनाथ कोविंद तीनचतुर्थांश बहुमताने जिंकावे, असा मोदी आणि अमित शाह यांचा आग्रह आहे. त्या दृष्टीने मोदी आणि शाह यांचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एकूण १० लाख ९८ हजार ९०३ मते आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी किमान ५० टक्के म्हणजे ५ लाख ४९ हजार ४५२ मतांची आवश्यकता आहे. आजच्या स्थितीत रालोआतील मित्रपक्षांशिवाय जदयु, बीजद आणि अण्णाद्रमुकच्या पाठिंब्यामुळे रालोआजवळ ६२ टक्के मते आहेत.
तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर कॉंग्रेस यांनी याआधीच रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला आपला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. रालोआ आणि अन्य मित्रपक्ष पकडून रामनाथ कोविंद यांना ३४ पेक्षा जास्त पक्षांचा पाठिंबा आहे, तर मीराकुमार यांना १७ पक्षांचा. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही.
आम आदमी पार्टी, भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि एआयएमआयएम या पक्षांनी अद्याप कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिला नाही. भाजपाच्या कट्टर विरोधात असतानाही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला कॉंग्रेसने आपल्या आघाडीत सहभागी करून घेतले नाही. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीलाही केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आले नाही. केजरीवाल यांच्या पक्षाजवळ नाही म्हटले तरी ४ खासदार आणि जवळपास ७० आमदार आहेत. मात्र त्यांच्या पाठिंब्याची गरज कोणालाच वाटत नाही, एवढी केजरीवाल यांची राजकीय विश्‍वसनीयता रसातळाला गेली आहे. भाजपाला पाठिंबा देणे शक्य नसल्यामुळे बिनबुलाये मेहमान म्हणून केजरीवाल मीराकुमार यांच्या उमेदवारीला नाइलाजाने पाठिंबा देऊ शकतात.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा मिळून ७७६ खासदार आहेत, यातील भाजपाच्या ३३७ खासदारांसह रामनाथ कोविंद यांना रालोआ आणि अन्य मित्रपक्षांच्या एकूण ५२४ खासदारांचा पाठिंबा आहे. मीराकुमार यांना पाठिंबा असलेल्या खासदारांची संख्या २३५ आहे. रामनाथ कोविंद यांना मिळणार्‍या खासदारांच्या मतांचे मूल्य ३ लाख ७० हजार ९९२ आहे, तर मीराकुमार यांना मिळणार्‍या खासदारांच्या मतांचे मूल्य १ लाख ६६ हजार ३८० आहे. रामनाथ कोविंद यांना विविध राज्यातून मिळणार्‍या आमदारांच्या मतांचे मूल्य ३ लाख ११ हजार ६८५ आहे. मीराकुमार यांना मिळणार्‍या आमदारांच्या मतांचे मूल्य २ लाख ९ हजार ८८१ आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षादेश (व्हीप) काढता येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील अनेक खासदार आणि आमदारांनी रामनाथ कोविंद यांच्या बाजूने मतदान केले तरी आश्‍चर्य वाटायला नको.
२०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचे प्रणव मुखर्जी यांना ७ लाख १३ हजार ७६३ मते पडली होती. मुखर्जी यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ६९.३१ होती. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीच्या प्रतिभाताई पाटील यांना ६ लाख ३८ हजार ११६ मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ६५.८२ होती. कोविंद यांच्याजवळ आजच्या स्थितीत ६ लाख ८२ हजार ६७७ मते निश्‍चित आहेत, तर मीराकुमार यांच्याजवळ ३ लाख ७० हजार २६१ मते आहेत. याचाच अर्थ रामनाथ कोविंद ३ लाख १२ हजार ४१६ मतांनी आघाडीवर आहेत. मतदानाच्या तारखेपर्यंत आणखी काही छोटे राजकीय पक्ष आणि अपक्ष रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रणव मुखर्जींपेक्षा जास्त मतांनी रामनाथ कोविंद यांनी निवडणूक जिंकावी, हा मोदी आणि शाह यांना आग्रह अनाठायी नाही, तर वस्तुस्थितीला धरून आहे.
१९६९ चा अपवाद वगळता आतापर्यंत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सरळ लढती झाल्या आहेत. १९६९ मध्ये कॉंग्रेसमध्ये फुटीची सुरुवात झाली होती. कॉंग्रेसमधील सिंडिकेट गटाचे एस. निजलिंगप्पा यांनी नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली. निजलिंगप्पा गटाला शह देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ज्येष्ठ नेते जगजीवनराम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पण, ते रिंगणात उतरलेच नाही. कार्यवाहक राष्ट्रपती असलेले व्ही. व्ही. गिरी यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. विरोधी पक्षांनी सी. डी. देशमुख यांना उमेदवारी दिली होती. निजलिंगप्पा यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत सी. डी. देशमुख यांना पहिल्या पसंतीची तर नीलम संजीव रेड्डी यांना दुसर्‍या पसंतीची मते देण्याची विनंती केली.
निजलिंगप्पा यांच्या उमेदवाराला म्हणजे नीलम संजीव रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा न देता श्रीमती इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेसच्या खासदारांना सदसद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन करत आपला अप्रत्यक्ष पाठिंबा व्ही. व्ही. गिरी यांना जाहीर केला. या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत गिरी फक्त १५ हजार मतांनी विजयी झाले. गिरी यांना ४ लाख २० हजार तर नीलम संजीव रेड्डी यांना ४ लाख ५ हजार मते मिळाली. सी. डी. देशमुख यांना १ लाख १३ हजार मते पडली. हे आठवण्याचे कारण म्हणजे ज्या जगजीवनराम यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार श्रीमती इंदिरा गांधी १९६९ मध्ये करत होत्या, पण प्रत्यक्षात उमेदवारी दिली नव्हती, त्याच जगजीवनराम यांच्या कन्येला म्हणजे मीराकुमार यांना कॉंग्रेसने २०१७ मध्ये उमेदवारी देत जबरदस्तीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्याही वेळी इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी जगजीवनराम यांच्या नावाचा वापर केला, तसाच आज श्रीमती सोनिया गांधी यांनी मीराकुमार यांना उमेदवारी देत केला आहे. मात्र या वेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापुढे कॉंग्रेसची डाळ शिजणार नाही.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७