प्रतीक्षा

0
50

प्रतीक्षा करणंं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, ही कल्पनाच तुझ्यासाठी असंभवनीय आहे. वाट पाहता पाहता कधी कधी वाट लागते की काय, असा नकळत येणारा विचारसुद्धा काळीज पिळवटून टाकतो. हे वरुण राजा, तुझी एक सर सुद्धा माझ्या मृद गंधाला सुवासीक करते.
ग्रीष्म तप्त मृदेचा प्रचंड उष्मा, जिवाची नुसती काहिली होत असताना अकस्मीतपणे तुझी चाहूल लागावी, या नुसत्या भ्रामक कल्पनेनेच माझे गात्र अन् गात्र सुखावून जातं. गंधवेडी होऊन ही वसुंधरा गंधमय होते. त्यामुळे उत्साहाला ही उधाण येतं. प्रमोद तर एकसारखा उसळतच असतो.
हे परर्जन्यराजा, दिलेल्या वचनाची पूर्तता करतो की काय, याची उत्कंठा तर शिगेस लागलेली आहे. कारण आम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही पती सहवास अमृतासारखा लज्जतदार वाटत असतो. परंतु खंत याची वाटते की, माझ्या मनातील आक्रंदन तुला कधी कळलेच नाही.
प्रतीक्षा करणंं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, ही कल्पनाच तुझ्यासाठी असंभवनीय आहे. वाट पाहता पाहता कधी कधी वाट लागते की काय, असा नकळत येणारा विचारसुद्धा काळीज पिळवटून टाकतो.
हे वरुण राजा, तुझी एक सर सुद्धा माझ्या मृद गंधाला सुवासीक करते. अनेक परिमळ द्रव्य माझ्यावरनं जीव ओवाळून टाकतात. तेव्हा मात्र अनेक घटिकांचा एकत्र नाद उमटून आनंदाचा झंकार अणुरेणूत पोहोचतो. कारण मांगल्याच्या मंदिरात मांगल्याने प्रवेश केलेला असतो.
तुझं असं अवचित जलसिंचन बघण्यासाठी आकाशाच्या गर्भगृहातच शुभ नक्षत्र दाटी करतात. मी ही वनदेवीसारखा शृंगार करून आपलं रूप अधिकाधिक सुंदर करते अन् तुझ्या स्वागतासाठी सज्ज होते. देवदेवता गुप्त रूपाने तुला सामर्थ्य प्रदान करतात. त्यांनी केलेली पुष्पवृष्टी तू हळूवार माझ्या महिरूपी कुंतलात माळतो. हे मनमोहक कुंतल जलद जेव्हा कुरवाळतो तेव्हा तू ऐन बहरात आलेला असतो. मीही मैनेसारखी उत्साही झालेली असते. त्यामुळे दिवस डौलदार आणि रात्र नादमय होते. चौफेर आरक्त होत मूकपणे बोलू लागलेला असतो, तेव्हा तू खर्‍या अर्थाने प्रगटलेला असतो. तुझे आणि मासांचे असे येणे आणि कळ्यांची कूस उजळून फुलांचे उमलत जाणे किती अवर्णनीय दृष्य आहे हे.
अशा प्रकारे माझ्या भावभावनांचा पापुद्रा अन् पापुद्रा सोलून तुझ्या समोर ठेवते. बहुधा तुला वाटत असेल की, मी शृंगारण्यासाठी तुझी प्रतीक्षा करते. पण तो विचार फार रास्त ठरणार नाही. कारण आठ महिने तू युद्ध पातळीवर रिपूंना कंठस्नान घालण्यात व्यस्त असतो. त्यामुळे आपल्या अपत्यांचा उदरनिर्वाह मी जातीने बघत असते. त्यांना सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी अविरत प्रयत्नशील असते. त्यांना मायेने वाढवते. परंतु पितृछत्र मात्र तूच धरू शकतो. माझ्या पंखाखाली ते निर्भिड असतात. परंतु त्यांच्या पंखात तूच बळ आणू शकतो. तद्वत मी त्यांना संस्कारशील घडवेल, पण आदर्श मात्र ते तुझाच ठेवतील, त्यासाठी हे सर्व तादात्म्य साधण्यासाठी तरी या चातुरमासात अवतरणे अपरिहार्य आहे. अरे, कुंपणाशिवाय न वाढणार्‍या लहान रोपांच्या भोवतालचे कुंपन काढून घेऊ नकोस. मला हेही माहिती आहे की, तू शीघ्रतेने येण्याची पराकाष्ठा करीत असावा. कारण,
‘दुःखाचा जिवंत झरा
उरात बाळगून ओथंबलेले
काही ढग
आकाशाला ही पेलवत नाहीत
कधी कधी … ’
त्यामुळे शंकाकुशांकांचे जे किल्मिष आहे, ते आता पूर्णपणे काढून टाक आणि असा बरस की,
‘तुझा एक एक थेंब
रूपांतरीत व्हावा तटिनी संग
तो प्रचंड प्रवाह खळवळावा
अन् निळ्या सागरात विलुप्त व्हावा ’
अशा प्रकारे वसुंधरेची प्रखर निष्ठा पाहून वरूनराज आपल्या शुभ सहस्त्रकरांनी तिला सर्वांगी वेढून टकतो अन् सरतेशेवटी तिची प्रतीक्षा संपुष्टात येते.
– जयश्री हेमंत कविमंडन
७७९८७८९८८८