मळभ

0
79

मेट्रोतल्या बायका
अहो, ऐकलंत का? आपण आज जरा भटकून येऊ या का? सुचेताताईंनी निशिकांतना म्हटलं. कित्येक दिवसांत घरापासून लांब गेलोच नाही. माझी सगळी कामं आटोपलीत. तुम्ही म्हणत असाल तर पानं घेते, म्हणजे जेवून, वामकुक्षी घेऊन आणि चहा घेऊन कुठेतरी जाऊन येता येईल. निशिकांतनी काहीच उत्तर दिलं नाही, म्हणून सुचेताताईंनी स्वयंपाकघरातून बाहेर डोकावून पाहिलं. निशिकांत बाल्कनीतल्या त्यांच्या खुर्चीत बसून नेहमीप्रमाणे पक्षिनिरीक्षण करण्यात रमलेले होते. त्यांच्या घरासमोर जांभळाचं मोठं झाड होतं, त्यावर चिमण्या, कावळे, मैना यांचं वास्तव्य असायचं. त्या पक्ष्यांना पिण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या बाल्कनीत मातीचं पसरट भांडं भरून पाणी ठेवायला सुरुवात केली आणि जांभळं खाऊन सगळे पक्षी नेमानं त्यांच्याकडे पाणी प्यायला येऊ लागले. मग थोडे धिटाईनी रेंगाळू लागले. त्यांच्यासाठी मग त्यांनी मूठमूठ धान्यपण ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या त्या छोट्या बाल्कनीत पक्ष्यांचा राबता वाढला. अगं, मला पक्ष्यांची भाषा येणार बहुतेक काही दिवसांतच. कृतज्ञतेनं ते त्यांच्या भाषेत थँक यू म्हणताहेत आपल्याला. आनंदून निशिकांत म्हणाले होते. पक्षी निरीक्षणाच्या छंदातली त्यांची लहान मुलांसारखी निरागसता बघून सुचेताताईंना गंमत वाटली होती.
तुम्ही तासन्‌तास त्या पक्ष्यांच्या विश्‍वात रमलेले असता. घरात बोलायला दुसरं माणूस नाही. तुम्हाला माझी मुळी काळजीच नाही. तुम्ही वर्तमानपत्रं वाचण्यात गढलेले असता, त्यातल्या निवडक बातम्यांवर प्रतिक्रिया देणारी पत्रे वृत्तपत्रांना पाठवत असता, नाहीतर चिमण्या-कावळे बघण्यात गुंतले असता. मी घरात एकटीनं करायचं तरी काय? किंचित उद्वेगानं सुचेताताई म्हणाल्या.
अगं, तू माझ्या बिझी असण्याचं कौतुक करते आहेस की तक्रार करते आहेस, तेच मला कळत नाहीये. बघ, आता मी निवृत्त झालोय. नोकरीत असताना किती धावाधाव व्हायची. वर्तमानपत्रसुद्धा धड वाचायला सवड मिळायची नाही. आणि आपण सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडायला हवीत ना? मला काही तुझ्यासारखं उत्तम बोलता येत नाही, पण मी पोटतिडकीने चांगलं काही सुचवतो, ते वर्तनपत्रांमध्ये छापून येतं. आणि पक्ष्यांचं म्हणशील, तर त्यांचं स्वतःचं एक जग आहे. त्यांच्या सवयी, त्यांचे स्वभावविशेष यावर संशोधन करू म्हटलं एखाद्याने, तर आयुष्य अपुरं पडेल! मुंबईसारख्या महानगरात या उपनगरात हिरवाई आहे आणि पक्षी तिथे विहार करताहेत, ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे बरं ! निशिकांत सुचेताताईंना म्हणाले. बरं, चुकीचं परिमार्जन करण्यासाठी पाहिजे तर एखाद्या नाटकाला नेतो तुला.
मला तुमच्याबद्दल तक्रार नाहीये हो काही! सुचेताताईंनी म्हटलं. मात्र, मी एकटी कंटाळते हल्ली. मुलं त्यांच्या नोकर्‍या, त्यांचे संसार, त्यांची मुलंबाळं यात रमली आहेत, आपली आठवणसुद्धा कुणाला येत नाही. पूर्वी कसे न चुकता फोन करायचे, सुनासुद्धा अमुक पदार्थ कसा करायचा, हे आवर्जून विचारायच्या. आता कुणालाच वेळ नाही. मला तर फार एकटं-एकाकी असल्यागत वाटू लागलं आहे. आता आपण हाती-पायी धड आहोत, पण उद्या काही झालं तर मुलं काही आपलं करणार नाहीत, हे स्वच्छ दिसतंय! सुचेताताईंच्या बोलण्यात निराशेचा सूर डोकावू लागला होता. महानगरात मळभ दाटून आलं होतं. वातावरण कुंद झालं होतं.
अगं एक म्हणच आहे, एकपुती रडे आणि सातपुतीही रडे! मुलं मजेत आहेत, परक्या मुलुखात सगळं स्वत:चं स्वतः मॅनेज करताहेत, लहानसहान गोष्टींसाठी आपल्याला त्रास देत नाहीयेत, यात आनंद मानायचा की, त्यांना आपली आठवण येत नाही, म्हणत त्यांना दूषणं द्यायची? त्यांनी आपल्याला समजा कायमचं त्यांच्याजवळ राहण्यासाठी बोलावलं, तरी आपण तिथे जाऊ शकणार आहोत का? आणि वृद्धावस्थेत आपण कोणावर भार होऊन कशाला राहायचं? शेवटच्या श्‍वासापर्यंत आपण आनंदी आणि निरोगी राहायचंय! त्यासाठी रोज सकस आहार, सोसवेल एवढा व्यायाम, पुरेशी झोप आणि आनंदी वृत्ती एवढी चतु:सूत्री पाळायचीय ! निशिकांतनी मृदुपणे समजावून सांगितलेलं सुचेताताईंना पटलं. तेवढयात दारावरची घंटी वाजली. आता या वेळी कोण असेल, याचा अचंबा करीत सुचेताताईंनी दार उघडलं. दाराबाहेर, बर्‍यापैकी समाजकार्य करणारे त्यांच्या लांबच्या नात्यातले दीर-जाऊ उभे होते.
सुचेताताईंनी आणि निशिकांतनी त्यांचं स्वागत केलं.
आज अवचित न कळवता आलो, तुमच्या बाजूच्याच हाऊसिंग सोसायटीमध्ये एक जोडपं नव्यानं राहायला आलंय, म्हणजे अलीकडे आम्हीच त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था करून दिलीय, त्यांचं कसं चाललंय ते बघायला म्हणून आलो होतो. म्हटलं घरी असाल, तर तुम्हा दोघांना उभ्या उभ्या भेटून जावं.
वा, उभ्या उभ्या कसे, आता जेवूनच जायचं! निशिकांतनी त्यांना आग्रह केला. सुचेताताईंनी त्यांना पाणी दिलं. स्वयंपाक तयार आहे, मी पानं घेते.
काय आहे सुचेतावहिनी, आम्हाला देवानी जसं अपत्य दिलं नाही, तसं अनेक अपत्यांना मातृ-पितृछत्र दिलं नाही. एक दिवस मनात विचार आला, की देवानी आपल्याला बाकी गोष्टी भरपूर दिल्या आहेत. समाजात मातृ-पितृछत्र हरवलेली अनेक बालकं आहेत, त्यांनाच आपलं मानून मातृ-पितृप्रेम द्यावं, त्यांना शिस्त लावावी. जमेल तितकं त्यांना घडवावं. मग पगारातली एक ठरावीक रक्कम, आठवड्यातला एक ठरावीक वेळ आम्ही या कामी एका सेवाभावी संस्थेला देऊ लागलो. आता निवृत्तीनंतर तर दिवसातले संपूर्ण आठ-दहा तास आम्ही दोघे त्यातच व्यग्र असतो. दीरांनी सुचेताताईंना सांगितलं.
इतकी वर्षे संस्थेनं सांभाळ केलेल्या काही मुलांनी आणि मुलींनी खरोखरी मेहनत करून आपापलं आयुष्य आकाराला आणलं. त्यातला एक मुलगा आणि एक मुलगी आम्हाला एकमेकांसाठी अनुरूप वाटले… दोघेही कर्णबधिर आहेत. मग संस्थेनं आणि आम्ही पुढाकार घेऊन एवढ्यातच त्यांचं लग्न लावून दिलं. भाड्यानं घेतलेल्या या वन रूम किचनमध्ये त्यांच्यासाठी खास सोयी करून घेतल्या, मगच तिथे त्यांचा संसार थाटून दिला. दोघांनाही जवळच्या मॉलमध्ये कपड्यांच्या एका मोठ्या शोरूममध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. मात्र, खूप चटपटीतपणे दोघे सगळी कामं करतात. सेल्स वूमन म्हणून ती आणि बिलिंग काऊंटरवर तो. कुणावाचून त्यांचं अडत जरी नसलं, तरी त्यांचं ठीकठाक चाललंय ना, हे बघायला आलो होतो, त्यांनी आग्रह करून आम्हाला खाऊ घातलं आणि मगच ते कामावर गेलेत. त्यामुळे जेवायचा खरंच आग्रह नका करू. जावेनं सुचेताताईंना म्हटलं.
पुढच्या वेळी तुम्हा दोघांची त्यांच्याशी ओळख करून देईन. पण, काही लागलं सवरलं तर तुम्ही अधूनमधून त्यांच्याकडे जाल का? कुणीतरी ओळखीचं आधाराला असलेलं बरं, म्हणून विचारतोय. दीरांनी विचारलं, तेव्हा सुचेताताईंनी आणि निशिकांतनी त्यांना आनंदानं होकार दिला.
आम्हीही समाजाचं काही देणं लागतो. तुमच्याप्रमाणे जरी नाही तरी, फूल ना फुलाची पाकळी म्हणून, तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही दोघे आठवड्यातून दोन तास संस्थेतल्या मुलांना शिकवू शकतो. सुचेताताईंनी आणि निशिकांतनी त्यांना म्हटलं.
अहो, समाजकार्यासाठी मदतीचे हात हवेच असतात. तुमच्या सोयीनं या, आम्ही असूच तिथे. सुचेताताईंनी प्रेमानं दिलेलं सरबत संपवून दोघे निघाले. सुचेताताईंनी आणि निशिकांतनी त्यांना निरोप दिला, तेव्हा त्यांच्यातलं लांबचं नातं अधिक जवळचं झालं असल्याचं त्यांना जाणवलं. महानगरातल्या आपल्या आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीत समाजसेवेचा एक अंकुर ते नकळत रुजवून गेले आहेत ,याची त्यांना जाणीव झाली.
अहो, तुमचे लाडके पोपट तुम्हाला हाका मारताहेत बाल्कनीत येऊन. अनायासे चण्याची डाळ भिजलेली आहे, द्या त्यांना खायला. तोवर मी पानं घेते. सुचेताताईंनी निशिकांतना म्हटलं. तोच पावसाची एक मोठी सर आली आणि समोरच्या रस्त्यावरच्या लोकांची तारांबळ उडाली. महानगर क्षणभर थांबलं. पण महानगरातल्या समस्यांनी सुचेताताई आता त्रासणार नव्हत्या. प्रसन्नतेचा शिडकावा त्यांच्या मनावर झालेला होता.
***
सुषमा, धिस इज नथिंग बट एम्प्टी नेस्ट सिंड्रोम… वीणानं आपल्या बहिणीला म्हटलं. चहाचा कप हातात धरून सुषमा उदासवाणी बसली होती, हे तिच्याशी व्हिडीओ चॅट करीत असलेल्या वीणाच्यानं बघवेना. हे बघ, तू एकटी असलीस तरी एकाकी नाहीयेस! पक्षीण पिलांना भरवते, मोठं करते, त्यांच्या पंखात बळ निर्माण करते आणि मग ती पिलं ते सुरक्षित घरटं सोडून उडून जातात. घरटं सुनं सुनं होतं. पण म्हणून पक्षिणीनं रडत बसावं का? आपण डबल सासू झालो आहोत, तरी आपली सेवा करायला मुलं-सुना जवळ नाहीत म्हणून व्हॉट्स ऍपवर लिहिलंस त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला ना? मुळात कुणी आपली सेवा करावी ही अपेक्षा का करायची? त्यांची काही महिन्यांपूर्वी लग्नं झालीयेत, नवी नवलाई आहे, तू कशाला त्यांच्या नवलाईच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला बघतेस? फार फार तर काय करतील? चुकतील! पण त्यातून शिकतील! सामाजिक कार्यकर्ती असलेल्या वीणानं आपल्या बहिणीला म्हटलं. ती तशीच निर्विकारपणे बसली राहिली.
मी आत्ता एका मुलीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जात्येय. सहसा मी कुणाला क्लायंट्सचे प्रॉब्लेम्स सांगत नाही, पण हे सगळ्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याइतके झणझणीत आहेत. ही सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेली इंजिनीअर मुलगी बाहेरगावी राहणार्‍या आपल्या सासूच्या ढवळाढवळीपायी त्रस्त आहे. तिचं म्हणणं आहे, नवरा चांगला आहे, पण अजूनही आपल्या आईचा मुलगा आहे, माझा नवरा नाही! प्रत्येक गोष्ट तो आईला विचारून करतो. दोघे फर्निचर घ्यायला गेले, तेव्हा बायको बरोबर असूनसुद्धा तिच्या पसंतीच्या खुर्च्या न घेता त्यानं आपल्या आईला फोन करून विचारलं- डायनिंग टेबलच्या खुर्च्या कोणत्या रंगाच्या घेऊ म्हणून! सासू त्यांच्याकडे दहा-पंधरा दिवस राहायला गेली, तेव्हा सुनेनी लावलेलं स्वयंपाकघर पसंत न पडून तिनं डबे, भांडी सगळं पुन्हा नव्यानं लावून टाकलं. इतकंच नाही, तर मुलगा धो धो पावसात चिंब भिजून आल्यावर धावत जाऊन स्वतः त्याचं डोकं खसाखसा पुसून काढलं. त्या सुनेला बिचारीला नवर्‍याचं डोकं पुसायची रोमँटिक संधीसुद्धा घेऊ दिली नाही! प्रत्येकानं आपापली बदललेली भूमिका स्वीकारायला हवी गं! म्हणूनच तूसुद्धा आपल्या मुलांना आणि सुनांना त्यांची स्पेस दे, त्यांच्या स्पेसमध्ये अतिक्रमण नको करूस! थोड्या वेळात येतेच मी तुला भेटायला. आपल्या दोघींच्या लग्नानंतरसुद्धा इतकी वर्षं आपण सुदैवानं जवळपासच्या उपनगरांमध्ये राहतो, सतत भेटत राहतो, हे सुख काय कमी आहे का गं? वीणा सुषमाला म्हणाली.
मुंबई नामक या महानगरात एकट्या असलेल्या अनेक जणी आहेत, एकाकी असलेल्या अनेक जणी आहेत. काही जणी वयामुळे, जोडीदार गेल्यामुळे, मुले परगावी असल्यामुळे एकट्या आहेत. काहींना बोलायलाच कुणी नाही, म्हणून एकट्या नसल्या तरी भरल्या घरात एकाकीपण खायला उठतंय. आपण सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अशा महिलांचा शोध घेऊन त्यांचं एकाकीपण घालवू या आणि हो!सुदैवानी तुझ्या घराच्या जवळ लंडनमधल्या हाईड पार्कच्या धर्तीवर एक कट्टा कार्यरत आहे. रोज संध्याकाळी एक तास तिथे सुमारे शंभर लोक तरी फिरायला येतात, त्या वेळी कुणीही येऊन तिथे आपले विचार मांडू शकतो. तुझा एकटेपणाचा प्रश्‍न तिथे निकालात लागू शकेल. शुभस्य शीघ्रम! प्रत्यक्ष भेटीत वीणानं सुषमाला गप्पांमध्ये गुंतवून तिचं मन प्रफ़ुल्लित केलं.
छान सांगितलंस. काही दिवसांपूर्वीच मला शेजारच्या काकू त्यांच्या सासूबाईंना कुणी ज्ञानेश्‍वरी वाचून दाखवेल असे कुणी माहीत आहेत का, म्हणून विचारत होत्या. मीही निर्बुद्धासारखे नाही म्हणाले. पण घरात ज्ञानेश्‍वरी आहे. चांगली लाल, मखमली कापडात गुंडाळलेली आहे. आत्ता त्यांना जाऊन सांगते, की मीच येऊन वाचत जाईन, आपण तिघी ऐकू आणि त्याचा अर्थ आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. सुषमा म्हणाली. महानगरात ढग दाटून आले होते. आकाश कुंद झालं होतं, मात्र तिच्या मनावरचं एकटेपणाचं साचलेलं मळभ दूर झालं होतं…
– रश्मी घटवाई
९८७१२४९०४७