प्रवासाची तयारी…

0
138

प्रवासाच्या त्या बॅगा पाहून आनंदराव म्हणाले, ‘‘अगं, आपण उत्साहाने वर्षभराचा घरातला, ऑफिसचा शीण घालवायला बाहेरगावी जातो की, तिकडून परत आल्यावर घरी अंथरुणावर पडून शीण घालवायचा?’’
आनंदराव ऍफिसातून घरी आले. त्यांचा चेहरा खुललेला दिसला. ‘‘काय हो, आज बडे खुष नजर आ रहे. क्या बात हैं?’’ स्वातीने विचारले.
‘‘अगं हो, आहेच मुळी खुष. आज माझी पंधरा दिवसांची सुटी मंजूर झाली. रोजच्या दिनचर्येला कंटाळलो होतो. मुलांच्या शाळांनाही सुट्‌ट्या आहेत म्हणून साहेबांकडे सुटीचा अर्ज पाठविला. पण, साहेब म्हणजे साहेबच. अर्ज दाबून ठेवला. खूप विनवण्या केल्या, पण त्यांचा सतत नकारच.’’
‘‘मग काय, भांडलात की काय? कुठे बदली वगैरे केली तर…’’
‘‘म्हणजे मी भांडखोर वाटतो काय? एक युक्ती केली. निमूटपणे कामे करीत गेलो. साहेबांनी अडवून ठेवायला सांगितलेल्या कामांचा गाळ उपसायला घेतला व कामे निस्तरत गेलो. ठेकेदारांची बिले, वरच्या कार्यालयाला मंजुरीसाठी पाठवायची प्रकरणे हातावेगळी केली व साहेबांकडे स्वाक्षरीसाठी पाठविली. माझ्याकडे कामे तुंबून आहेत, असे म्हणायला त्यांना जागाच उरली नाही. त्यांचे डोके ठणकले. मला केबीनमध्ये बोलावून घुश्शातच म्हणाले, ‘महाशय, तुम्ही सुट्‌टीवर जा. हे काय, अशी झटपट कामे करायची नसतात, हे कळत नाही का? माझ्या कोर्टात बॉल टाकून मला तोंडघशी पाडता होय. जा निघा, सुट्‌टी मंजूर केली आहे.’’
‘‘वाऽ, कायपण युक्ती! चला, सुट्‌टी मिळालीच तर जाऊ या की बाहेरगावी. मलाही माहेरी जायचेच होते, पण आता अपण सगळे कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाऊ. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बदरीनाथला जाऊ.’’ स्वाती म्हणाली.
‘‘कशाला? मरायला? प्रलय कसा झाला, त्याने कसा कहर केला.’’ हे सांगितल्यावर म्हणते, ‘‘नको बाई!’’
म्हणालो, ‘‘रात्रीच्या जेवणाचे वेळी कुठे जायचे ते ठरवायला हवे, नाहीतर ठरविण्यातच अर्धी सुट्‌टी संपायची!’’ मुलांना विचारले. एक म्हणतो, ‘‘उटीला जाऊ.’’ एक म्हणतो, ‘‘सिमला, कुलू-मनालीला जाऊ.’’ म्हणालो, ‘‘कार्ट्यांना जवळची ठिकाणे नकोत!’’ मुलांच्या मर्जीनुसार सिमला-मनालीला जाण्याचे निश्‍चित केले.
कशाने जायचे? ट्रॅव्हलने की स्वतंत्र? खर्चाचा अंदाज घेऊन स्वतंत्रपणे जाण्याचे ठरले. रेल्वे वेळापत्रक उघडले. उत्तर भारताच्या ठिकाणावर वर्तुळ केले. वाटले, तेथे पोहोचलोच. गाडीचे, हॉटेलचे आरक्षण करण्याची सोय इंटरनेटवर असतेच. मध्येच पोरगा म्हणाला, ‘‘सर्व प्रवास, हॉटेल मुक्कामाला ए.सी.चे बुकिंग करा हं बाबा.’’ म्हणालो, ‘‘गाढवा थंडीच्या प्रांतात जातो आहोत. तेथे हॉटेलात पंखेही नसतात, इतकी थंडी असते.’’ असे सांगून त्याचे अज्ञान दूर केले.
रेल्वे, बस, हॉटेलचे आरक्षण झाले म्हणजे निघण्याचा वार व तारीख पक्की झाली. बारा दिवस बाहेर राहायचे म्हणजे निदान सहा ड्रेसेसतरी लागतील, मुलांची फर्माईश. ‘‘तेथे पहाडी प्रदेशात साडी नको, चारपाच पंजाबी ड्रेसेस लागतील. घोड्यावर साडी नेसून बसणे अवघड होईल आणि तुम्हीसुद्धा जरा रुबाबदार दिसतील असे कपडे घ्या.’’ स्वातीची टकळी सुरूच. म्हणते कशी, ‘‘तिकडे थंडी भारी असते. आपले जुनाट गरम कपडे उपयोगी नाही. सिमल्यालाच नवीन उनी कपडे घेऊ.’’ कपड्यांचा खर्चाचा आकडा सात हजारावर पोहोचला. तो कपड्यांचा ढीग डोळ्यांसमोर आला म्हणजे बॅगाही तशाच लागतील. घरातल्या जुन्या बॅगा नेल्या तर हसे होईल म्हणून कपड्यांसाठी दोन भल्या मोठ्या व्हीलच्या बॅगही खरेदी कराव्या लागणारच. उत्साहाच्या भरात खर्चही उत्साहानेच केला.
स्वतंत्रपणे जायचे म्हणजे एक एक गोष्ट आठवणीने घ्यायची, म्हणून प्रत्येक गोष्टीची यादी केली. टूथब्रश, पेस्ट, दाढीचे सामान, अंगाचा-कपड्याचा साबू, सुरी, डिशेश, टॉर्च व त्याचबरोबर स्वातीने सुईदोराही दाढीच्या डब्यात टाकला. म्हणालो, ‘‘कशाला?’’ म्हणाली, ‘‘घोड्यावर बसताना नको त्या ठिकाणी पँट उसवली तर असू द्या.’’
‘‘एवढा मोठा प्रवास. वापस येईपर्यंत पुरतील एवढे खाण्याचे पदार्थ सोबत घ्यायला हवे. गाडीत व बाहेर मिळणार्‍या पदार्थांनी प्रकृती बिघडायला नको.’’ स्वाती कामाला लागली. चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकल्या… दिवाळीतही होत नाही एवढे पदार्थ केले. ‘‘अगं, आपण खाण्यासाठी बाहेरगावी जात नाही आणि हेच खाऊन तब्येत बिघडली तर…’’ असे म्हणताच, काही जुजबी औषधे घेण्याला ती विसरली नाही.
‘‘बाबा, एवढा लांबचा प्रवास, बसून बसून बोअर होईल. पत्त्यांचा जोड, ट्रांझिस्टर घेऊ या.’’ मुले म्हणाली. ‘‘बोअर होणे असेल तर तुमचे येणे रद्द!’’ बिचारी मुलं हिरमुसली बघून, ‘‘ठीक आहे. घ्या म्हणालो.’’
दोन दिवसांत एवढी तयारी झालेली बघून व स्वातीने प्रवासाला निघण्याची जाहिरात केल्याने भेटायला येणारे वाढतच गेले. जाताच आहात तर आमच्यासाठीसुद्धा स्वेटर-शाली आणाल म्हणून त्यांची वेगळी फर्माईश.
जाण्याचा दिवस उजाडला. रात्री साडेनऊची गाडी. प्रवासाच्या सामानाचा फाफटपसारा बघून वाटले, तेथे नवा संसारच थाटायचा आहे! एक एक वस्तू आठवणीने बॅगामध्ये भरणे सुरू केले व दोन मोठ्या बॅगा भरायला तीन तास लागले, तरी उरलेले सामान बॅगेमध्ये आपले आरक्षण कुठे म्हणून बाहेरच होते! प्रवाशांची गर्दी बघून गाडीला अधिक दोन डबे जोडतात तशा दोन वेगळ्या बॅगा भरल्या. शिवाय खाण्याच्या पदार्थांची वेगळीच बॅग. आम्ही जाणारे चौघे व डागा सहा व त्याही वजनदार.
सामान बघून आनंदराव डोक्यावर हात देऊन होते. मध्येच कमरेला दोन्ही तळव्यांनी आधार देत होते. कारण, सर्व सामान त्यांनाच उचलावे लागणार होते. स्वाती आपली पर्स खांद्यावर लटकवून बाहेर पडली.
आनंदराव म्हणाले, ‘‘अगं, आपण उत्साहाने वर्षभराचा घरातला, ऑफिसचा शीण घालवायला बाहेरगावी जातो की, तिकडून वापस आल्यावर घरी अंथरुणावर पडून शीण घालवायचा?’’ स्वाती म्हणाली, ‘‘इश्श्य! हे काय. एवढी तयारी झाली. घरातून बाहेर पडलोच नाही आणि असले काय तुम्हाला विचार सुचतात. तुम्ही सोबत आहात म्हणजे प्रवास सुखकर होणारच. काय रे मुलांनो?’’ मुलांनीही होऽ म्हणून शंख फुंकला.
– बाळ लोखंडे
९२७३०७२९२८