स्त्री : कुटुंबाचा केंद्रबिंदू!

0
145

संसाररथाची दोन चाकं म्हणजेच पती आणि पत्नी. त्यांच्या समतोलानंच संसाराचा गाडा पुढे रेटणार असल्याचं पुरुषांनी समजून घेऊन, स्त्रीला कमी लेखणं सोडून द्यावं, यातच शहाणपण आहे.
स्त्रियांना आपल्या संविधानानं कायद्यानं जास्तीच संरक्षण दिलं आहे. सगळे कायदे त्यांच्या बाजूचे. त्यांनी कोणाच्या विरुद्ध तक्रार केली, तर त्याला पोलिस कस्टडीत टाकण्यात पोलिस जराशीही कसर सोडत नाहीत.’ भारतातल्या समस्त पुरुषांचं हे प्रामाणिक मत! त्यात कितपत तथ्य आहे? स्त्रियांना खरोखरीच कायद्यानं झुकतं माप दिलं आहे का? असे प्रश्‍न कोणाच्याही मनात येणं साहजिकच आहे. कायदा नेहमी स्त्रीचीच बाजू घेतो? खरं आहे?
वास्तव
स्त्रियांची वेदना सहन करण्याची शक्ती निसर्गत: अफाट असते. पुरुषांपर्यंत मात्र ही टोचणी पोहचू शकत नाही. स्त्रियांचं सारं आयुष्य, पुरुषांच्या वैफल्यावर फुंकर घालण्यात, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यात जाऊ शकतं, तर मग स्त्रियांची दु:खं, त्यांच्या मनातला सल, परुषांना का अस्वस्थ करू शकत नाही? हुंड्यासाठी नवविवाहितेला जाळणं, तिच्यावर कुणी बलात्कार करणं, या गुन्ह्यापलीकडे अंगावर एकही ओरखडा न उमटता, त्यांच्या उरात वाहणार्‍या भळभळत्या जखमांकडे जागरूकतेनं समाजानं पाहण्याची गरज असते, हे कोणी का लक्षात घेत नाही?
तिचं विश्‍व
सर्वसामान्य स्त्रीचं विश्‍व स्वत:च्या परिवाराशी निगडित असतं. त्यामुळेच पती-पत्नी, सासू-सून, नणंद-भावजय, आई-मुलगी, वडील-मुलगी, आजी-आजोबा-नातवंडं, पालक-पाल्य, पौंगडावस्थेतली मुलं-मुली, अशा नात्यांच्या परिघाभोवती तिला पळावं लागतं. त्यात तिची दमछाक होते. कुटुंबसंस्था समाजाचा मूलभूत पाया असतो. जन्माला येणारं प्रत्येक मूल हे त्याच्या कुटुंबाचं सभासदत्व मिळवतं.
तिची कर्तव्यं
कुटुंब, कसबा, गाव, राज्य हे सारे व्यक्तींचे समुच्चय. त्यामुळे कधीकधी वैयक्तिक समस्या, सामाजिक, राष्ट्रीय समस्येचं उग्र रूप धारण करू शकते. म्हणूनच वैयक्तिक समस्या उद्भवू न देण्यासाठी कुटुंबातल्या स्त्रीला ठामपणे उभं राहावं लागतं. कौटुंबिक नाती, त्यातला गोडवा जपणं, हे स्त्रीचं कर्तव्य असतं. प्रसंगी कठोर, कणखर, जागरूक, सावध राहावं लागतं. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ किंवा ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या तत्त्वांचा अंगीकार करून जीवनातले वेगवेगळ्या वळणावरचे धोके, अडचणी, आघात यापासून पुढच्या पिढीला सावध करण्याचं कामही घरच्या स्त्रीचंच. एकंदरीत, तिचं काम हे महासागरातल्या दीपस्तंभासारखं असतं, हे निर्विवाद सत्य आहे.
विवाहबंधनं
कुटुंबसंस्थेचा उगम विवाहातून होतो. बरेचदा विवाह फसतात. परंतु, कुठल्याही समाजात विवाहित स्त्रीला, पतीशी काडीमोड घेऊन, आयुष्यभर घटस्फोटिता, सिंगल वूमन, परित्यक्ता म्हणून उपेक्षित जीवन जगण्यात आनंद किंवा समाधान नसतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे मुस्लिम समाजातली त्रिवार तलाक पद्धत बंद करण्यासाठी संपूर्ण भारतातून उठलेला आवाज आणि आंदोलनं, चर्चा, वादविवाद. संपूर्ण जगात रूढ होत जाणारी आणि भारतात शिरकाव करू पाहणारी ‘लिव्ह इन रिलेशनशिप.’ ती बंद करण्यासाठी कुटुंबातली स्त्रीच पुढे होते आणि आपल्या पाल्याला, त्यातले संभाव्य धोके दाखवून ‘लिव्ह इन’पासून परावृत्त करते. भारतातल्या विवाहातली नैतिक बंधनं, विवाहसंस्था मजबूतपणे टिकवण्यासाठी निश्‍चित मदत करतात. सुसंस्कार, सुसंस्कृतपणा, सभ्यता, ज्येष्ठांप्रतीचा आदर, एकमेकांबद्दलची आपुलकी, जिव्हाळा, माया, ममता, त्याग, सहनशीलता, परोपकारी वृत्ती, माणुसकी या सर्व गोष्टी संपूर्ण कुटुंबाला शिकवण्याचं कामही घरच्या स्त्रीचंच.
स्त्री एक, भूमिका अनेक
संपूर्ण कुटुंबाचं उदरभरण स्त्रीच करत असते. प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपणं हेही तिचंच काम. घराला घरपण देणं, घराची स्वच्छता, टापटीप, व्यवस्थितपणा, प्रत्येक वस्तूची जागा ठरवणं. एकंदरीत कूक, हाऊसकीपर, केअरटेकरच्या भूमिका घरच्या स्त्रीला वठवाव्या लागतात. कुटुंबातल्या सदस्याच्या आजारपणात त्याचं पथ्यं, आजारानंतरची काळजी, शक्तीसाठी द्यावा लागणारा पौष्टिक-सात्त्विक आहार, अपत्याला जन्म देण्यासाठी नऊ महिने स्वत:च्या उदरात बाळगून त्याच्या जन्मापासून त्याचं पालनपोषण करून त्याला लहानाचं मोठं करणं, त्यासाठी स्वत: खस्ता खाणं, स्वत:च्या करीअरवर पाणी सोडणं… हे सारं मातृदेवतेचंच कार्य.
किराणा, भाजीपाला, फळफळावळं, गृहोपयोगी वस्तू व उपकरणं आणण्याचं कामही तिचंच.
निरूपण
त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेल्या स्त्रीचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं समाजानं- विशेषत: पुरुषवर्गानं मान्य करणं भाग आहे. अर्थात, संसाररथाची दोन चाकं म्हणजेच पती आणि पत्नी. त्यांच्या समतोलानंच संसाराचा गाडा पुढे रेटणार असल्याचं पुरुषांनी समजून घेऊन, स्त्रीला कमी लेखणं सोडून द्यावं, यातच शहाणपण आहे.
– प्रीती वडनेरकर/९८२३९९४७९२