अशिक्षित तत्त्वज्ञान

0
254

शाळेत कधी न गेलेल्या ‘त्या’ अशिक्षित आजीच्या तत्त्वज्ञानाच्या ओझ्याने माझी सुशिक्षित चाल मंदावली. त्या निवांत, रहदारीमुक्त रस्त्याच्या वाटेला मी पुन्हा जाईन का? माहिती नाही.
दिवाळीच्या सुट्टीत पुण्याला आले तरी सकाळी फिरायला जाण्याचा नेम मोडायची इच्छा नव्हती. पण येथे फिरायला जाण्यासाठी ‘रहदारीमुक्त’ रस्ता शोधणेही एक तपश्‍चर्याच होती. रोज नवनव्या दिशांनी माझी शोध मोहीम सुरू झाली. पहाटेच जायचे, त्यामुळे एकदम अंधारी रस्ता नको, रहदारी कमी हवी, पण एकदम सुनसान रस्ता नको, रस्ता थोडा ओळखीचा हवा, अशा अनेक हवं-नकोमध्ये शेवटी एका आडवळणाने एन.डी.ए. कडे जाणारा रास्ता सापडला आणि माझी तपश्‍चर्या फळाला आल्यासारखे वाटले. मुख्य म्हणजे एक मैत्रीणपण मिळाली, जी माझ्यासारखीच एका निवांत रस्त्याच्या शोधात होती. या रस्त्यावरून जाताना आपण पुण्यात आहोत, असे वाटतच नव्हते कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, झाडांना हिवाळी सुगंध त्यामुळे मन अगदी प्रसन्न झाले. दोन्ही बाजूच्या झाडांमधून मोर, हरीण क्वचित रस्त्यावर दिसायचे.
या रस्त्यावरून आमच्यासारखी मॉर्निग वॉक करणारी काही तुरळक मंडळी होती. अधूनमधून फौजी गाड्या, कधी स्कूटर,मोटारी दिसत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक-दोन फार्म हाऊसेस् होती. पण उंच उंच भिंतीमुंळे आतले फॉर्म किंवा हाऊस-काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तिथे राहण्याची कोणाला हौस आहे, हे कळत नव्हते. अशा या रस्त्यावरून सकाळच्या प्रसन्न वेळेला फिरायला जाणे, हा खरच एक ताजा तवाना अनुभव होता, तो रोज मिळणार म्हणून आम्ही खुश होतो. माझ्या मैत्रिणीने क्रमश: तो रस्ता कुठून कोठे जातो, रस्त्याच्या या टोकाला, त्या टोकाला काय जवळ-काय दूरआहे, यांची पूर्ण माहिती काढली. मला मात्र एवढेच पुरे होते की, या रस्त्यावर आपण रोज फिरायला येणार! पण रस्त्याचे हे ‘निर्मनुष्य अंतरंग’ बघितल्यावर एकटे यायचे नाही, याचीही खूणगाठ बांधली. तशातच एक शंकेची पाल मनात चुकचुकली! सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहे म्हणून तर हा रस्ता असा रहदारीमुक्त नाही ना? सुट्ट्या संपल्यावर येथे गर्दी होईल की काय? मन थोडे धास्तावलेच.
सुट्ट्या संपून माझ्या नातींच्या शाळा सुरू झाल्या आणि आज ‘रस्ता कसा सापडतो?’ या विचारात मी फिरायला निघाले. जेव्हा जाताना नेहमीप्रमाणे तुरळक रहदारी व मोजकीच मंडळी दिसली तेव्हा माझ्या उत्साहाने वेग धरला व पुण्यातआहेात, तोवर असे निवांत चालण्याचे सुख मिळणार म्हणून देवाचे आभार मानले.
गप्पा मारता मारता नेहमीच्या ‘टर्निंग पॉईण्ट’ वरून आम्ही परतलो आणि परत येताना आम्हाला दोन शाळकरी मुली समोरून येताना दिसल्या. शाळेचा युनिफॉर्म घातलेला, एका हातात स्कूल बॅग दुसर्‍या हातात वॉटर बॅग, दोन वेण्या घट्ट, त्याला काळ्या रिबिनींचा बो, पायात चप्पल-असा गणवेष! त्यातली एक असेल, ९- १० वर्षांची तर दुसरी थोडी लहान.
या अशा रस्त्यावर त्या दोघींना बघून आम्ही थबकलोच. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास, रस्त्यावर सामसुम असताना या दोघी मुली पायी चालत कोणत्या शाळेत जात होत्या? त्यांच्या सोबत मागे-पुढे कोणी असणारच असे वाटून आम्ही थोडे हळूहळू चालू लागलो. पण पुढे-मागे कोणीही दिसले नाही. त्या दोघी मात्र झपाझप चालत पुढे निघून गेल्या.
आम्ही दोघी मात्र त्यांच्याकडे वळून वळून बघत राहिलो. त्यांचेे आई-वडील त्यांना एकटे या रस्त्याने कसे काय पाठवतात? सध्या दिवस किती खराब आहे, रोज वृत्तपत्रामध्ये काय काय बातम्या येतात, पण या अडाणी, अशिक्षित लोकांना कोण अक्कल शिकवणार? यावर मनसोक्त चर्चासत्र घेत आम्ही परतलो. हेच चर्चासत्र घरी दिवाणखान्यातही दीर्घकाळ रंगले. सर्वांचे एकमत झाले की, त्या दोघी मुलींच्या आई-वडिलांना त्यांची अजिबात काळजी नसणार. जर कधी भेटलेच तर त्यांना योग्य शब्दात समज द्यायची. शेवटी शिकलेल्या समाजाने अशिक्षितांना शिकवण द्यायची असते.
मग हा रोजचाच एक छंद जडला! त्या दिसल्या की त्या सुरक्षित आहे, म्हणून बरे वाटायचे व त्यांच्या आई-वडिलांच्या अडाणीपणाला नावे ठेवत व त्यांच्या भविष्याबद्दल चिंता करत आमचा परतीचा प्रवास व्हायचा. असे चार-पाच दिवस गेलेत आणि मग त्या दिवशी त्या दिसल्याच नाहीत. आम्ही एकदम हतबल! मग लक्षात आले की, आज शनिवार असल्याने त्यांची दुपारची शाळा असेल अन् मग एकदम काळजी वाटली. ‘बापरे! दुपारी तर या रस्त्यावर अजूनच सामसूम असणार! तरी त्या दोघी एकट्याच गेल्या असतील?
रविवार अस्वस्थतेत गेला. सोमवारची मी आतुरतेने वाट बघत होते. एकदाच्या त्या दिसल्या. आज त्यांच्याशी बोलायचेच ठरवले.
‘‘काय गं कोणत्या शाळेत जाता?’’
‘‘म.न.पा.च्या शाळेत.’’
‘‘कुठे आहे ती शाळा?’’
‘‘बावधनला’’
‘‘अगं, पण इकडून का जाता?’’
‘‘इकडून जवळ पडती म्हनून जातो’’.
‘‘भीती नाही वाटत?’’.
‘‘भीती? अन् ते कशापायी?’’
त्यांचा आत्मविश्‍वास बघून आम्ही चाटपडलो. मी विचारले, ‘‘कोणत्या वर्गात आहात?’’
‘‘ही चौथीत अन् मी तिसरीत’’.
‘‘घरी कोण कोण असतं?’’ माझ्या नसत्या चौकशा!
‘‘माझे बा, आजी अन् धाकटा भाऊ’’ती म्हणाली.
‘‘आई-बाबा कामावर जातात?’’
‘‘आई गावाला गेली हाय, अन् बा छपाईचं काम करतो.’’
माझी चौकशी आटोपती घेत आम्ही परतलो. पण त्यांच्याशी बोलल्यावर बरे वाटले. दुसर्‍या दिवशी त्या आपणहून हसल्या. बोलतांना समजले की दोन दिवसांनी त्यांची परीक्षा आहे.
‘‘झाला का गं अभ्यास’’? माझ्यातल्या शिक्षिकेनेे विचारले,
‘‘हो झाला की’’
‘‘आणि नवा पेन-पेन्सील आणली का?’’
‘‘नाही! बा म्हणाला जे आहे तेच वापरायचे.’’
हे ऐकून मला कसेतरीच वाटले. आपल्या नातींना दर परीक्षेला आपण व त्यांचे आई-वडील कंपॉस-बॉक्समध्ये मावतनाही एवढे पेन-पेन्सील आणून देतो. अन् या बघा! बिच्यार्‍या!!
मला चैन पडेना. दुसर्‍या दिवशी त्या दोघींसाठी मी नवा पूर्ण कंपॉस बॉक्स घेऊन गेले. दोघी भेटल्यावर त्यांच्या हातात दिले. चकित होऊन त्यांनी ते उघडले व आत सर्व साहित्य बघून आनंदाने ओरडायच्याच बाकी होत्या! मी तर तृप्तच झाले. ‘‘परीक्षेत छान लिहायचे बरं का!’’ असा तोंड भरून ‘बेस्ट ऑफ लक’चा भाषांतरित आशीर्वाद देऊन आम्ही परतलो.
दुसर्‍या दिवशी फिरायला जाताना कालच्या समाधानाचे मोरपीस सर्वांगावर फिरत होतेच. परतीच्या वाटेवर दोघी दिसल्या. त्यांच्या बरोबर नऊवार नेसलेली एक बाई होती. आम्हाला पाहून तिघी थांबल्या. त्या आजीबाई बोलायला लागल्या,
‘‘ताई, तुम्हीच दिली न्हवं ही कंपास पेटी’’
‘‘हो’’
‘‘कशापायी?’’
‘‘अहो, त्यांची परीक्षा आहे म्हणून दिल्या’’
‘‘ताई, तुम्ही चांगल्या मनाने दिलं पण उद्याच्याला कोणा वाईट माणसानं काही द्यावं अन् यांनी ते घ्यावं, मंग? यांना चांगलं कोन, वाईट कोन कळतय् व्हय? मी यांना सांगितलय् की रस्त्यावर कोणाशीबी बोलायचे नाही. तुम्हीच यांच्याशी बोललात अन् कंपासबी दिलात! वळख ना पाळख.तुम्हीतरी यांना कशाला भुलवताजी आसं काही देऊन? सवय लागली की कोणाकडून काहीबी घेतील’’ आजीबाई मनातल सारच बोलत होत्या अन् आमची वाचाच बंद होती.
‘‘ताई तुम्हीच सांगा, सगळी मानसं तुमच्यासारखी असतात व्हय? या लेकरांना चांगल्या वाइटाची अजून पारख नाय म्हनून त्यांना सांगावं लागतं. ताई मी अडानी हाय, पण तुम्ही तर शिकल्या सवरलेल्या दिसताजी. तुम्हाले माझं सांगनं ठीक वाटतं न्हवं?’’ असे म्हणून त्या आजीने दोन्ही कंपास बॉक्स माझ्या हातात ठेवले व म्हणाली,
‘‘नाराज नका होऊ ताई. म्या बापजन्मात शाळा पाहिली नाय. पन यांनी ती शिकावी म्हनून रोज त्यांनला शाळेत सोडायला नि आनायला जाती. आठ दिवस हिची माय गावाला गेल्ती, म्हनून मले धाकट्यासाठी घरी थांबावं लागलं. आज हिची माय आली अन् मी संग आलेच. चला गं पोरींनो’’ आजी व नाती झपाझप चालत दिसेनाशा झाल्या.
मात्र शाळेत कधी न गेलेल्या त्या अशिक्षित आजीच्या तत्त्वज्ञानाच्या ओझ्याने माझी सुशिक्षित चाल मंदावली. त्या निवांत, रहदारीमुक्त रस्त्याच्या वाटेला मी पुन्हा जाईन का? माहिती नाही.
प्रा. अनुपमा भेदी/ ९४२१७८६३८१