सासरी येणं माझं अन् तिचं…

0
223

मी तिचं सासरी येणं म्हणजे माझ्या घरी येणं पाहात होते. मनोमन तुलना करत होते. खरं तर आम्ही दोघी याच घरी सासरी आलोत. पण, तेव्हाची परिस्थिती अन् आताची परिस्थिती यात खूप अंतर होतं. नवीन सून आली. थोडी बावरली, थोडी हिरमुसली, पण थोड्या वेळातच पूर्ण शांत. हक्काच्या घरात निवांत, सहजतेनं वावरू लागली.
तिचं स्फुंदून आईच्या गळ्यात पडून रडणं पाहिल्यावर मलाही रडू आलं. मी विसरलेच की, आता मी सासूच्या भूमिकेत आहे. मला माझं सासरी जाणं म्हणजेच या कुटुंबात सासरी येणं डोळ्यासमोर तरळू लागलं. रडून तर माझ्या चेहर्‍याची पार रया गेली होती. घरी आल्यावर तर एवढे पाहुणे की काही सुचत नव्हतं. मला अठवतं, या कित्येक दिवस मी घरात उभीच असायचे. प्रत्येक काम करताना मन साशंक! बरोबर करतेय ना सगळं? माझा घाबरट ससा झाला होता तेव्हा. पुन्हा सासरी आल्यावर कुणी लग्नातली उणीदुणी, मानपान काढले की, टचकन डोळ्यांत पाणी ठरलेलं.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर, मी तिचं सासरी येणं म्हणजे माझ्या घरी येणं पाहात होते. मनोमन तुलना करत होते. खरं तर आम्ही दोघी याच घरी सासरी आलोत. पण, तेव्हाची परिस्थिती अन् आताची परिस्थिती यात खूप अंतर होतं. नवीन सून आली. थोडी बावरली, थोडी हिरमुसली, पण थोड्या वेळातच पूर्ण शांत. हक्काच्या घरात निवांत, सहजतेनं वावरू लागली. तसंही आजकाल नवी नवरी घरात साडीत वावरत नाहीच. हवे ते म्हणजे चारचौघात बरे दिसणारे कपडे घालण्याची मुभा असते. पूर्वीच्या सुना पलंग, कपाट, चौरंग-पाट असं आंदणात घेऊन यायच्या. आता स्वत:च्या सामानाबरोबर आधी मोबाईल, लॅपटॉप घेऊन येतात. या पिढीची सहजता मला कधीकधी अचंबित करते. इट्‌स ओके! हा ऍटिट्यूड कुठून येतो यांच्यात? हा शिक्षणामुळे आलेला आत्मविश्‍वास, की एकट्याने घराबाहेर राहिल्याने आलेली आत्मनिर्भरता, की संसारातल्या खर्‍या समस्यांशी तोंडओळख न झाल्याने असलेला अति आत्मविश्‍वास? सासूबाईंना विचारत, मदत करत आमच्या पिढीने स्वयंपाकघरात स्थान मिळवले. तर आताच्या सुनांची पिढी गूगलवर पाककृती पाहून झटपट तयारी करून एखादा पदार्थ बनविणार अन् बाजूला होणार! उगीच किचकट पदार्थांच्या मागे लागण्यासाठी त्यांना वेळही नाही आणि कौशल्यही नाही.
तसं माझ्या काळातल्या अन् तिच्या काळातल्या लग्नातपण तर बराच फरक झालाय. तेव्हा मुलीचे आईवडील आधीपासून सगळी तयारी घरी करून दमून जायचे. काळजाचा तुकडा दूर जाणार या दु:खापेक्षाही सगळं कार्य नीट पार पडेल ना, सासरची मंडळी खुश होतील ना, याच तणावाखाली राहायचे. आता प्रत्येक गोष्टीचा कॉण्ट्रॅक्ट दिलेला असतो. जेवणाची व्यवस्था, गुरुजी, बॅण्ड, हारतुरे, विहिणीची पंगत… सगळं कार्यालयात एका छताखाली उपलब्ध असतं. समजा काही कमी-जास्त झालं तर त्याचा दोष कॅटरिंग, कार्यालय व्यवस्था यांना जातो, प्रत्यक्ष आईवडिलांना नाही. पूर्वीसारखं लग्न नीट केलं नाही किंवा व्यवस्थेतल्या उणिवा काढून रुसणं किंवा त्या नवरीला बोल लावणं हे सगळं काळानुरूप थांबलं. उलटपक्षी, मोकळ्या मनाने खूप छान झाले हो कार्य, असं कौतुकही मुलीच्या आईवडिलांच्या वाटेला येतं.
मुला-मुलींचं वय हाही त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मुलगा/मुलगी दोघेही जास्त शिकलेले, नोकरीत स्थिर झालेले आणि स्वत:चं मत, स्वत:चं व्यक्तिमत्त्व विकसित झालेले असतात. त्यामुळे स्वयंपाकघरापासून तर पैेशाच्या गुंतवणुकीपर्यंत त्यांचं मत कदाचित वेगळं असू शकतं. हे आजच्या सासूने गृहीत धरलं असतं. मी म्हणेन ती पूर्वदिशा, असं म्हणणारी सासू नव्या पिढीत दिसणार नाही, तर तडजोड करणार्‍या, कौतुक करणार्‍या सासवा नव्या पिढीत जास्त आहेत.
मुलांच्या मानसिकतेतही बराच फरक पडलाय. तिच्याकडे बायको या संकल्पनेतून हक्क गाजविण्यापेक्षा ते मैत्रीण, जोडीदारीण म्हणून तिच्याकडे पाहतात. दोघांच्या कामाच्या वेळा भिन्न असतील, तर तिच्या पाठीमागे घरातली काही कामे उरकतात. इतकंच काय, आजकाल बाळाला आईपेक्षा बाबा जास्त सांभाळतो, असं चित्र दिसू लागलंय. पती-पत्नीच्या नात्यात समानतेकडे उचललेलं हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे.
मनोमन अशी दोघींच्या ‘सून’पणाची तुलना करताना माझ्या लक्षात आलं की, अरे, आता मला बढती मिळालीय. मी सासूच्या भूमिकेत आहे आणि मी एकदम मनाशी ठरवलं. चांगली सासू होण्यासाठी आधी तिची मैत्रीण व्हायचं. एक वेळ पायात काटा गेला तरी चालेल, पण कटु अनुभवांचे सल मनात रुतू द्यायचे नाहीत. नवीन भांड्यांना चरे पडलेत तरी अलहिदा, पण मनाला चरे पडू द्यायचे नाहीत! सासू-सुनेच्या नात्याचा पाया जर मैत्रीचा, आपुलकीचा झाला, तर मुलांच्या संसाराचा, पर्यायाने आमच्या घराचा डोलारा दिमाखात उभा राहील. सासरचा रस्ता माहेरच्या वाटेइतका सुंदर नसेलही कदाचित, पण त्या वाटेवरचे खडे बोचणार नाहीत, याची काळजी मी घेऊ शकेन नक्कीच. तरच तिचं सासरी येणं हे हक्काच्या आपल्या घरी येणं होईल.
– शिल्पा सोहोनी-ओक/९९२३१७६५११