अकोल्यातील बिल्डर अमित वाघ कुटुंबीयांसह बेपत्ता

0
178

– घटनेने खळबळ
– बांधकाम जगतात भीतीचे वातावरण
अकोला, २९ जून 
बांधकाम क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिकांना आता यश आणि व्यवसाय धोकादायक ठरत असून या क्षेत्रातील स्पर्धा काहींच्या जिवावर उठली असल्याचे दिसून येत आहे. त्याचे ताजे उदाहरण येथील बांधकाम व्यावसायिक अमित वाघ यांचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक बांधकाम व्यवसायी अमित वाघ, त्यांच्या कुटुंबियांसह सातार्‍यातून बेपत्ता झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पत्नी प्रियंका व दोन मुले स्पंदन व शाश्वत ही त्यांच्या सोबतच बेपत्ता झाले आहेत. सातारा पोलिस त्यांचा शोध घेत असून विशेष म्हणजे त्यांचा शोध घेण्यासाठी सातारा पोलिस अकोल्यातही येऊन गेल्याचे वृत्त आहे.
अमित वाघ यांचे संपूर्ण कुटुंबीय बेपत्ता झाल्याने बांधकाम व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमित वाघ यांचा सध्यातरी कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे ते बेपत्ता झाले असल्याचेेच सांगण्यात येत आहे.
स्थानिक खडकी परिसरामधील संतोषनगरात राहणारे तथा बांधकाम व्यवसायी अमित भरत वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि ३ व ६ वर्षांची दोन मुले सातारा येथे सुट्यांमध्ये गेले होते. सातारा ही अमित वाघ यांची सासूरवाडी असल्याची माहिती आहे. १३ जूनच्या रात्रीपासून अमित वाघ आणि त्यांचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाले आहे.
अमित वाघ यांनी खडकी, मलकापूर भागात मोठ्या सदनिकांचे बांधकाम केले असून गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठ्या अपार्टमेंटचे बांधकाम प्रगतिपथावर आहेत.
काटा काढल्याची चर्चा
अमित वाघ हे एक यशस्वी बांधकाम व्यवसायी होते. व्यवसायाच्या स्पर्धेतूनच त्यांचा काटा काढण्यात आल्याची चर्चा गत तीन दिवसांपासून पोलिस वर्तुळात सुरू आहे. एवढेच नव्हे, तर बांधकाम व्यावसायिकांमध्येही ही चर्चा असून, अमित वाघ बेपत्ता होण्यामागे नेमके कारण काय, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. (तभा वृत्तसेवा)