मतदारयादीत नाव नोंदविण्याचे फेसबूक देणार स्मरण!

0
69

मुंबई, २९ जून
आता काळाची गरज ओळखून निवडणूक आयोगानेही पुढचे पाऊल टाकले आहे. सोशल मीडियाचा वापर करून निवडणूक आयोगही आता मतदानाविषयी माहिती देणार आहे.
मतदारांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने फेसबूकच्या साथीने एक विशेष अभियान सुरू केले आहे. फेसबूकच्या मदतीने १ जुलैपासून ‘व्होटर रजिस्ट्रेशन रिमाइंडर’ सुरू करणार आहे. जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, १ जुलैपासून फेसबूक १८ वर्ष पूर्ण होणार्‍या यूजर्संना नोटिफिकेशन पाठवणार आहे. हे रिमांइडर मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम्, कन्नड, बंगाली, उर्दू, असामी आणि उडिया या भाषांमध्ये असणार आहे.
फेसबूक यूजर्सने ‘रजिस्टर नाऊ बटन’वर क्लिक केल्यानंतर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर जाता येईल. जिथे त्यांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी म्हणाले की, मला ही घोषणा करताना आनंद होत आहे. निवडणूक आयोग पहिल्यांदा मतदान करणार्‍या मतदारांवर विशेष लक्ष देणार आहे.
त्यासाठी विशेष अभियानही सुरू करणार आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या दृष्टीने उचलेले हे एक पाऊल आहे. मतदानासाठी पात्र असणार्‍या सर्व नागरिकांना मी मतदान करण्याचे आवाहन करतो. मला विश्‍वास आहे की, यामुळे निवडणूक आयोगाचे मतदान अभियान आणखी सशक्त होईल, असेही झैदी म्हणाले. (वृत्तसंस्था)