नाशिकमध्ये अनेक व्हॉट्‌सऍप अकाऊंट हॅक!

0
72

नाशिक, २९ जून
तुम्हाला जर तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून व्हॉट्सऍपवर अश्‍लील मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण आले तर सावध व्हा. कारण राज्यात व्हॉट्सऍप हॅकर्सचे रॅकेट कार्यरत असल्याचे नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेत समोर आले आहे.
नाशिकमधील डॉक्टर, मॉडेल, उद्योजक अशा ४० पेक्षा अधिक नेटीझन्सचे व्हॉट्सऍप अकाऊंट हॅक झाले असून, सगळ्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली आहे.
गेल्या २ दिवसांपासून डॉ. मनीषा रौंदळ यांच्या नावाने त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांना अश्‍लील मेसेज, व्हिडीओ क्लिप पाठवल्या जात आहे. मनीषा यांनी आपला मोबाईल, व्हॉट्सऍप, नेट सगळे बंद करून ठेवले तरी हॅकर्सचे उद्योग सुरू आहेत. त्यांच्या नावाने सोशल मिडीयावरून अश्‍लील मेसेज पाठवले जात आहेत. मैत्रिणीच्या नावाखाली हॅकर्सने केलेल्या व्हॉट्सऍपवरच्या मेसेजला मनीषा यांनी रिप्लाय दिला आणि त्यांना हा रिप्लाय देणे चांगलेच महागात पडले आहे.
नाशिकमध्ये ही स्थिती केवळ मनीषा रौंदळ यांचीच आहे असे नाही. डॉक्टर सारिका देवरे यांच्या बाबतीतही तसेच झाले आहे. यांनीही काल सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
डॉक्टर मनीषा, सारिका यांच्याप्रमाणेच नाशिक शहरातले अनेक नामवंत डॉक्टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थी नेटीझन्स या हॅकर्सच्या उपद्रवांनी हैराण झाले आहेत. अनेकांच्या मोबाईल आणि फ्रेण्डलिस्टमधल्या शेकडो-हजारो नेटीझन्सला अशा पद्धतीचे मेसेज हॅकर्सकडून पाठवले जात आहेत. आता तर राज्यभरात या प्रकरणाचे लोण पोहण्याची शक्यता सायबर पोलिस विभागाने व्यक्त केली आहे.
नाशिक सायबर पोलिसांकडे गुरुवारपर्यंत सुमारे ४० लोकांनी या संदर्भातली तक्रार दाखल केली आहे. तर सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात हॅकर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅक झाल्यास काय कराल?
१. तुमच्या फोनमधून व्हॉट्सऍप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा. पुन्हा तुमचा नंबर वापरून व्हॉट्सऍपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा.
२. तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करू नका
३. अनोळखी व्यक्तींशी चॅट करणे टाळा
४. फोनमध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा(वृत्तसंस्था)