मतदान करायचे आहे, मला सोडा; भुजबळांची विनंती

0
113

मुंबई, ३० जून
पुढील महिन्यात होत असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मला मतदान करायचे असल्याने मला मुक्त करण्यात यावे, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विशेष न्यायालयाला केली. त्यांच्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आणि सिंचनासह अनेक प्रकल्पांमधील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोप सध्या ऑर्थर रोड कारागृहात असलेले भुजबळ यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयात जामीन अर्ज सादर केला.
यावेळी न्यायालयात उपस्थित असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे वकील हितेन वेणेगावकर यांनी भुजबळ यांच्या अर्जाला विरोध केला. ईडीने यावेळी काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४४ नुसार अशा व्यक्तीला घटनेच्या ५४ व्या कलमानुसार मिळणार्‍या अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष न्यायालयाला नाही. तसेच हे न्यायालय एखाद्या कैद्याविषयी विशेष सुविधा देण्याचे आदेश देऊ शकत नाही. असा आदेश केवळ उच्च न्यायालयच पुनर्विचार याचिकेवर देऊ शकते आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम ६२(५) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी लागू करता येते का, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे, याकडे वेणेगावकर यांनी लक्ष वेधले.
यावर न्यायालयाने भुजबळ यांच्या वकिलाला, अर्ज मागे घ्यायचा आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण भुजबळांशी बोलून अर्ज मागे घ्यायचा की उच्च न्यायालयात जायचे, हे कळविण्यात येईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था)