लघुशंकेचे कवित्व!

0
125

चौफेर
छे! छे! राधामोहनसिंह साहेब, चुकलंच तुमचं! अहो, केंद्रात मंत्री असलेल्या माणसानं असं करायचं? चक्क रस्त्याच्या कडेला लघुशंकेला जायचं? छे! काहीतरीच. केवढं वाईट वाटलं या देशातल्या लोकांना! आम्हा बापुड्यांचं ठीक. सामान्य लोक आम्ही. रस्त्याच्या कडेला काय नि नदी-नाल्यांच्या काठावर काय, चालून जातं आमचं! पण, तुम्ही तर दस्तुरखुद्द मंत्री! तुम्ही असं करायचं? शिवं शिवं… कुठे चाललाय् हा देश? तिकडे बघा, सारा समाज कसा चवताळून उठलाय् तुमच्या या वागण्याविरुद्ध. जणूकाय देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग घडलेला बघितला लोकांनी. माणसं केवढी पेटून उठली! म्हणाली, तुम्ही पंतप्रधानांच्या स्च्छता मोहिमेचा पार बट्‌ट्याबोळ केलाय्. लाज आणली, ही मोहीम राबवणार्‍या सरकारला. हो! स्वत: अतिशय काटेकोरपणे वागणारी माणसं आहेत बरं का ती, तुमच्यावर चवताळून उठलेली. त्यांच्यापैकी एकानेही उभ्या आयुष्यात कधी असले ‘लाजिरवाणे’ कृत्य केलेले नाही. अगदी शपथेवर सांगू शकेल, त्यातला प्रत्येक माणूस हे! खरं तर नरेंद्र मोदींनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेची प्रेरणाच मुळात ही तमाम मंडळी आहे- स्वच्छतेचा वसा घेतलेली! परवा व्हायरल झालेली मंत्र्यांची ‘ती’ चित्रफीत बघून खवळलेल्या, टीका करायला सरसावलेल्या एकेका माणसावर नजर टाकून बघा! धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आढळेल एकेक जण. त्यातला कुणी ना कधी रस्त्यावर थुंकला, ना कधी कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण केली! त्यामुळे इतरांवर चिखल उडविण्याचा तर हमखास परवाना लाभलाय् त्यांना! तेच करायला सरसावलेत सारे.
नाहीत आपल्या देशात असल्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध सर्वदूर. बड्या शहरांचंतरी थोडंफार बरं आहे. तिकडे गावाकडे तर परिस्थिती फारच बिकट आहे ना राजेहो! तिकडे तर सारंच उघड्यावर… पण, ‘या’ मंडळीला अजीबात रुचत नाही तसला प्रकार. विशेषत: भाजपा विरोधकांना तर जराही खपलेले नाही ते. एका मंत्र्याने उघड्यावर निसर्गविधी उरकणे, अजीबात रुचलेले नाही काहींना. मग काय, केवढा संताप झाला त्यांचा! अरे, केवढ्या सुविधा उभारून ठेवल्यात त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्याच्या सात दशकांत! शौचालंयं काय, मुतार्‍या काय, स्वच्छतागृहे काय, कशाची म्हणून कशाचीच वानवा नाही इथे. लोकंच खुळे. भरपूर शौचालयं अस्तित्वात असताना उगाच भर रस्त्यावर लज्जेचे प्रदर्शन मांडायला बसतात. तर सांगायचा मुद्दा असा की, वैयक्तिक जीवनात स्वच्छतेची मोहीम फत्ते करूनच मग राधामोहनसिंहांवर टीकेची सरबत्ती करायला पुढे आलेत बघा हे लोक!
आपल्या देशाचा एक वयोवृद्ध मंत्री एका नैसर्गिक गरजेची पूर्तता करण्यासाठी उभा असताना त्याचे चित्रीकरण करून वर पुन्हा सार्‍या जगाला ‘दाखवण्यासाठी’ ते व्हायरल करणार्‍या त्या हुश्शार माणसाला तर काय, दादच द्यायला हवी! त्याच्या बुद्धिमत्तेलाही कुर्निसातच केला पाहिजे! या अभिनव कर्तबगारीसाठी जमल्यास जाहीर सत्कारही व्हावा त्याचा! असले दृश्य चित्रित न करण्याचे आणि केले तरी ते इतर कुणासमोर उघड न करण्याचे साधे संकेत पाळण्याचे भान ज्याला जपता आले नाही, दुर्दैवाने त्या दीडशहाण्याच्या कृत्यावर कुठेही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही अद्याप. ना नाराजी, ना संताप. पण, मंत्र्यांच्या कृत्यावर मात्र राजकारण करायला निघालेत सारे. स्वत: कधीही रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंकेची नैसर्गिक क्रिया पार पाडली नसल्याच्या थाटात त्यांना शहाणपणाचे डोस पाजायला उठलेत लोक! पंतप्रधानांनी आरंभलेल्या स्वच्छता मोहिमेची या एका कृत्यामुळे पाऽऽर ऐशीतैशी झाली असल्याची मल्लिनाथी करायलाही विसरलं नाही इथे कुणी.
खरं तर मंत्र्यांच्या त्या कृत्याची नवलाई नाहीच इथे कुणाला. कशी असेल सांगा? या देशाला अपूर्वाई फक्त, एका मंत्र्याने उघड्यावर लघुशंका उरकण्याची आहे. लाल दिव्याच्या गाडीत फिरणार्‍या, वातानुकूलित वातावरणात वावरणार्‍या, अलिशान जीवन जगणार्‍या माणसानंही तेच करावं, जे आम्ही रोज करतो? एवढीच एक बाब आश्‍चर्याची आहे सर्वांच्या लेखी. राहिला प्रश्‍न उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्याचा, तर त्याचे कुणाला फारसे आश्‍चर्य वाटण्याचेही कारण नाही इथे. कारण हजारो लोक याच पद्धतीने विधी उरकतात या देशात. कोण फोटो काढतो अन् कोण व्हायरल करतो हो ती दृश्यं? हजारो लोक तसे करताहेत म्हटल्यावर कोण उठतो पोटतिडिकीने बोलायला अन् कुणाला वाटते की, ही बाब स्वच्छतेच्या मोहिमेत बाधा पोहोचवते म्हणून? गावं गोदरीमुक्त झाल्याचा दावा करणार्‍यांनी सकाळच्या वेळी एक फेरफटका मुंबईच्या लोकलमधून मारून यावा अन् बघावे रुळाशेजारचे चित्र. म्हणजे, खुद्द देशाच्या आर्थिक राजधानीतली वस्तुस्थिती जराशी तरी ध्यानात येईल त्यांच्याही. हो! हे तमाम लोक स्वच्छता मोहिमेचा बट्‌ट्याबोळच करताहेत. पण, दोष कुणाला द्यायचा? व्यवस्थेच्या अभावाला, की…
दिल्लीतले मंत्री असो की मग गावाकडची माणसं, निसर्गाच्या पलीकडे कुणीच नाही. पण, त्या गरजांच्या तुलनेत पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. ज्या आहेत, त्याचा दर्जा चांगला नाही. गावातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय म्हणावी अशी असते. इतकंच कशाला, अगदी मेट्रो सिटी चेन्नईच्या प्रसिद्ध मरीना बीचवर उभारलेल्या स्च्छतागृहाची एकविसाव्या शतकातली अवस्थाही, वापर न करता, नाक बंद करून बाहेर पडण्याच्या लायकीची आहे. ज्या देशातल्या ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातल्या झोपडपट्‌ट्यांमधील ७० टक्के घरातही शौचालय नाही, तिथल्या सार्वजनिक स्वच्छताघरांची अवस्था ही ‘अशी’ असताना, कोण कशाला हसतंय् मंत्र्यांनी उघड्यावर लघुशंका केली म्हणून? ही व्यक्ती केंद्रात मंत्री नसती तर? मग चाललं असतं त्यांनी तसं केलेलं? व्यवस्थेच्या अभावात एका मंत्र्यांवर ही वेळ आली. या समाजातल्या महिलांची स्थिती काय होत असेल, कधी कल्पना तरी करू शकू आपण?
मंत्र्यांनी जे केलं त्याचं समर्थन नाहीच करणार कुणी. एखाद्या स्वच्छतागृहाचा शोध त्यांनी घ्यायला हवा होता, हेही खरंच! पण, तसा प्रयत्न झालाच नसेल, या निष्कर्षाप्रत इतक्या घाईगर्दीनं कशाला यायचं? दिमतीला असलेल्या चाकरमान्यांनी, सुरक्षारक्षकांनीही साहेबांची गरज ओळखून धावपळ करत शोधाशोध केली असणारच की! त्याउपरही मंत्र्यांना असे उघड्यावर जावे लागले, याचा सरळ, साधा अर्थ एवढाच की, तिथे स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नव्हती. यावरून एवढे अकांडतांडव कशासाठी चाललेय्? सुविधांच्या अभावाची ही परिस्थिती योग्य नाही. पण, तेच धगधगते वास्तव आहे. ते बदलण्याचाच तर प्रयत्न स्वच्छतेच्या मोहिमेतून साकारायचा आहे. ते करायचं सोडून या प्रकरणात, फुशारक्या मारत तुटून पडलेले लोक मुळातच या मुद्याचे राजकारण करू बघताहेत. त्यांना दुरून तमाशा बघायचा आहे. आता ‘मोदी मास्तर’ आपल्या वर्गातल्या या विद्यार्थ्याला कसा दम देतात, त्याला छड्यांचा कसा मार बसतो, हे बघण्यात स्वारस्य असलेली ही मंडळी आहे. अरे, स्वत:च्या घरासमोरचं अंगण आणि त्यापुढचा जरासा रस्ता स्वच्छ ठेवा, हे सांगायलाही ज्यांना एक ‘मोदी’ लागतो, असे लोक आहोत आम्ही! जागा मिळेल तिथे पचापचा थुंकणारे, पान खाऊन लिफ्टच्या कोपर्‍यात पिचकार्‍या मारणारे, केळी खाऊन त्याची सालं बसल्या जागेवरून जमेल त्या दिशेने भिरकावणारे, स्वत: जवळच्या कचर्‍यातून जमेल तिथे उकिरडे निर्माण करणारे… अन् तरीही केवढा गहजब चालला आहे बघा स्वच्छतेच्या मुद्यावर! खरंच काही कळत नाहीय्… हा देश खरंच सुधारतोय्, का जरा जास्तच राजकारणी होतो आहे…!
सुनील कुहीकर