३६,६०८ हरित सैनिक वृक्षारोपणासाठी सज्ज

0
179

वर्धा, ३० जून
वृक्षलावगवडीच्या कार्यक्रमाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या मोहिमेत शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था, वन विभाग, सामाजिक वनीकरण व इतर शासकीय विभागाच्या प्रतिसादामुळे जिल्ह्यात यावर्षी १२ लाख ८० हजार झाडे लावण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. १ ते ७ जुलैदरम्यान राबविण्यात येणार्‍या वृक्षलागवडीच्या मोहिमेत जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. वनमहोत्सवाचा शुभारंभ शनिवार, १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता करुणाश्रम, पिपरी मेघे येथे आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या हस्ते वृक्षारोपण करून होणार आहे.  जिल्ह्यात १२ लाख ८० हजार खड्डे पूर्ण झाल्याचा अहवाल ग्रीन आर्मी या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. १४६२ रोपवन स्थळांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जिल्ह्याला ६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. पण सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत दुप्पट खड्डे खोदण्यात आले आहेत.या उपक्रमात लोकसहभाग वाढवून याचे चळवळीत रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र हरितसेना प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातून आतापर्यंत ३६,६०८ सदस्यांनी नोंदणी केली आहे. नागरिक मोबाईलमध्ये ऍप डॉऊनलोड करून या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. तसेच २५ ते २८ जून या कालावधीत रोपे आपल्या दारी हा उपक्रम वर्धा, हिंगणघाट, कारंजा, आर्वी या प्रमुख शहरांमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये शहरातील नागरिकांना १७१६ रोपे सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय आ. अनिल सोले यांच्या ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनतर्फे  कारंजा, तळेगाव, आर्वी, पुलगाव या शहरांमधून वृक्षदिंडी काढण्यात आली. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्षरोपण करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेमधून आतापर्यंत ५ लाख ७८ हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या वनमहोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी व्यक्ती, संस्थांना रोपे खरेदी करण्यासाठी तालुस्तरीय वन परिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपवनसंरक्षक  दिगांबर पगार यांनी केले आहे. (तभा वृत्तसेवा)