रविवारची पत्रे

0
164

सारखी मदत का लागते : स्वावलंबन कधी शिकणार?
कोकणातला शेतकरी मुख्य पीक जे भात, ते तयार झाल्यावर कापून त्याच्या पेंड्या बांधून उडवी घालतो. मळणीच्या वेळी पहिल्या काही पेंड्या हलक्या हाताने झटकून, त्यातील सशक्त व जड दाणे आधी काढून घेतो, ज्याचा तो पुढील मोसमासाठी बियाणे म्हणून उपयोग करतो- आत्मविश्‍वासाने! इतकेच काय, पडवळ, चिबूड,, भोपळा, काकडी अशा भाजी-बियासुद्धा घरच्या घरी करण्याकडे कल असतो. साहजिकच त्याला दुकानात धाव घ्यायला लागत नाही
कोकणाबाहेरचे शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात. जसे- गहू, ज्वारी, कापूस, सोयाबीन, घेवडा, इतर काही, आणि सध्या गाजलेली तूर! अतोनात उत्पादन झालेल्या तूर आणि सोयाबीन यातील चांगल्या वाणाचे बियाणे या शेतकर्‍यांनी तयार केले का? नसल्यास का नाही? कर्जमाफीसाठी तसेच हमीभावासाठी आणि सरकारी खरेदीसाठी आंदोलन करणार्‍या किती शेतकर्‍यांनी आपल्या बियाण्याची व्यवस्था आपल्याच उत्पादनातून केली आहे? यांना बी-बियाण्यासाठी लगेच दुकानात धाव का घ्यावी लागते? त्यांना कोणी मार्गदर्शन करते की नाही? कृषी विद्यापीठे आणि इतर कृषियंत्रणा यासंबंधी काय मार्गदर्शन करतात? तज्ज्ञ आणि जाणत्या शेतीसम्राटांनी गेल्या कित्येक वर्षांत नेमके काय साधले, हा संशोधनाचा विषय आहे.
प्रमोद बापट
पुणे

चंगळवादामुळे आरोग्यास धोका
आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पाश्‍चात्त्य चंगळवादी संस्कृती शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजलेली पाहायला मिळते. यामुळे पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि मसालेदार चायनीज पदार्थ खाण्याचे प्रचंड प्रमाण युवकांसह मध्यम वर्गीयांतही वाढलेले दिसते. युवकांमध्ये केव्हा आणि कधी खावे, किती खावे याला काही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. नियमितपणे जेवणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक असते, याचाही विसर या चंगळवादी संस्कृतीमुळे लोकांना पडला आहे. केवळ उशिराच नव्हे, तर अनियमितपणे वाट्टेल ते खाणे आणि वाट्टेल तेव्हा, रात्री उशिराही जेवणे, जंकफूड खाण्याचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणाचा रोग बालवयातील मुलांनाही झालेला दिसतो. चंगळवादी जीवनशैलीमुळे ताणतणाव, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव अशा विविध कारणांमुळे युवकांसह, मध्यमवयीन वयोगटातील स्त्री-पुरुषात उच्च रक्तदाबाच्या विकाराचेही प्रमाण वाढत आहे ही बाब आरोग्यास घातक ठरते.
आज नोकर व व्यापारीवर्गात निर्माण होणारा कामाचा प्रचंड ताण, कार्यालयात जाण्यासाठी आणि घरी परत येण्यासाठी रोज होणारी धावपळ हे असतानाही टी.व्ही. पाहणे आणि व्हॉटस् ऍपवर निरर्थक चॅटिंगमुळे युवावर्ग पूर्णतः त्रासलेला आहे. परिणामी दहा ते पंधरा वयोगटातील मुला-मुलीतही लठ्ठपणाचे प्रमाण सातत्याने वाढल्यामुळे मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही वाढत आहे. पण, या आरोग्याच्या गंभीर धोक्याकडे पालकही गांभीर्याने लक्ष देत नाहीत, जी चिंता करणारी बाब ठरते. तसेच यामुळे सामाजिक आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे असे वाटते. काही दशकांपूर्वी शहरी आणि ग्रामीण भागात मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. पण, चंगळवादी संस्कृतीमुळे ते अधिक वाढलेले पाहायला मिळते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी जंकफूड, थंड पेयपासून नेहमीच दूर असायला पाहिजे. मोबाईल-इंटरनेट आणि फेसबुकचा अतिवापर टाळणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
प्रा. मधुकर चुटे

संपला जून महिना…
आसमंतात पसरणारा मृदगंध जशी जून महिना आल्याची वर्दी देतो तद्वतच ‘नेमेचि येतो पावसाळा’प्रमाणे दरवर्षी पुस्तकांची फुललेली बाजारपेठ जून महिना आलाऽऽरेऽऽ ची हारोळी देत असतो. तो जून महिना कालच संपला.
या महिन्याची सुरुवातच ‘शाळांचे नवीन वर्ष’ सुरू होण्याने होते. सगळीकडेच जून महिन्यात शाळा उघडल्या. नवीन पुस्तके, नवीन कव्हर्स, पुस्तकांचा ‘कोरा’ वास! शाळेचे युनिफॉर्म्स, वॉटर बॉटल्स, स्कूल बॅग्स, टिफीन बॉक्सेस, नवनवीन प्रकारातील कंपास बॉक्सेस इ. तत्सम वस्तूंच्या खरेदीसाठी बाजार फुलून गेला होता. खरेदीसाठी मुले नि पालकांची झुंबड उडाली होतीे.
आमच्या काळी जुनी पुस्तके डागडुजी करून, नवीन कव्हर्स लावून विकण्यात एक वेगळाच आनंद मिळायचा. पूर्वी अशी जुनी शालेय पुस्तके विकणारी दुकाने व विकत घेणारे विद्यार्थी पुष्कळ असायचे. अशा या वातावरणामुळे मुलांची शाळेत जाण्याची मानसिक तयारी पूर्णपणे होत असे. सगळ्या जुन्या मित्रांना भेटण्याची आतुरता असायची. जून महिना आला की, आजही या आठवणींचा चित्रपट डोळ्यांसमोरून झरझर सरकतो नि मन त्या जुन्या वातावरणात फेरफटका मारून येते. आता ‘सबकुछ’ शाळेतूनच घ्यावे लागते. बाबांसोबत स्वत:ची खरेदी करण्याचा आनंद त्यामुळे हरवला आहे.
जून महिना आठवणीत राहतो तो आणखी एका कारणामुळे. हिरव्याकंच कैर्‍यांचा बाजार नि अर्थातच त्यांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी! या महिन्यात पूर्वी घरोघरी कैरीच्या लोणच्याची तयारी सुरू व्हायची. कैरीचे लोणचे बनविणे हा एक सोहळा असायचा. थंड मसाल्यात कैरीच्या फोडी मिसळून बरणीत भरले जाई नि वरून स्वच्छ पांढरे फडके बरणीच्या तोंडाला बांधले जाई.
आम्ही मुले कधी एकदा चविष्ट लोणचे पानात पडतेय याची आतुरतेने वाट पाहायचो. शाळेच्या डब्यात हमखास लोणचे न्यायचे. प्रत्येकाच्याच डब्यात वेगवेगळ्या चवीचे लोणचे असायचे नि ते खाण्यात मजाही यायची. लोणच्याबरोबर घरोघरी कैरीचा ‘मुरांबा’ म्हणजे साखरेचा साखर आंबा नि गुळाचा गुळांबा बनविला जायचा. चातुर्मासात विशेषत: श्रावण महिन्यात देवाच्या नैवेद्याला वाढला जायचा. पूर्ण घरदार या सोहळ्यात आनंदाने सम्मिलीत व्हायचे. आता असे सोहळे काळाच्या ओघात गडप झाले. बाजारात आता तयार लोणची नि तयार मुरांबे, जॅम मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेत. गृहिणींनाही नोकरीमुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे लोणच्याची नवीन बाजारपेठ अस्तित्वात आली. पूर्वीची ती मजा मात्र काही औरच होती. नुसत्या आठवणींनी मन आनंदित होते. असो. कालाय तस्मै नम:
मंजिरी मुकुंद अनसिंगकर
८६९८५९८७६४

ईश्‍वरी संकेताचेच अनुसरण
‘विश्‍व योगदिन’ दि. २१ जूनला मोठ्या उत्साहात जवळजवळ संपूर्ण जगाने पार पाडला. ही काही साधी घटना नाही किंवा योगायोग वा आकस्मिक घडलेलीसुद्धा घटना नाही. ही ईश्‍वरी योजना आहे. हे ईश्‍वरी संकेताचेच अनुसरण आहे. याचे पडसाद स्वामी विवेकानंदांच्या एका लिखाणात पाहायला मिळतात. क्रांतदर्शी प्रतिभेच्या स्वामीजींनी, भारताच्या उज्ज्वल भविष्याचे व विश्‍वकल्याणासाठी भारताचे काय योगदान असणार, यासंबंधी पुढीलप्रमाणे उद्गार काढलेले आहेत. ते म्हणतात-‘‘अत्यंत प्राचीन काळापासून भारतात अनेक धर्मसंस्थापकांचा उदय झाला असून, त्यांनी वारंवार जगाला आध्यात्मिकतेचा पुरवठा केला आहे… येथूनच फिरून अशी एक लाट उठणार आहे की, जी आधुनिक जगाच्या इहलोकनिष्ठ सभ्यतेला आध्यात्मिक संजीवन प्रदान करणार आहे. इतर देशांतील लक्षावधी, कोट्यवधी स्त्री-पुरुषांच्या जीवनाचा दाह करणारा, त्यांची हृदये करपून टाकणारा जडवादाचा वन्ही विझविण्याचे सामर्थ्य असलेला अमृतोषम शांतिजलाचा अक्षय ठेवा एकमात्र या आपल्या भारतभूमीतच विद्यमान आहे. बंधूंनो! विश्‍वास ठेवा, घटना अशीच घडणार आहे. आपला भारतच जगाला अध्यात्माचे पसायदान देणार आहे.’’ स्वामीजींचे हे दिव्यस्वप्न, योगमूर्ती जनार्दनस्वामींच्या रूपाने आज साकार झालेले सारे विश्‍व पाहात आहे. जग इकडचे तिकडे झाले तरी ‘न भवति पुनरुक्त भाषितं सज्जनानाम्’ म्हणजे स्वामीजींसारखे महापुरुष जे एकदा बोलतात ते कधीही खोटे होणार नाही. कारण त्यांचे बोल खरे करण्याची जबाबदारी अखेर परमेश्‍वरावरच असते!
अ. स. गिजरे
९३७२८७६७६३

फायदा कोणाला?
५ मे २०१७ च्या आकांक्षा पुरवणीत, ‘हरवलेे ते बालपण’ हा लेख वाचला. या लेखात लेखिकेने बालपणीच्या आठवणींसोबतच आजच्या शैक्षणिक सत्रांवरही प्रकाश टाकला.
चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मपुरी, अकोला, अमरावती ही विदर्भातील अति तापमानाची शहरं. विदर्भात साधारणपणे २० मार्चनंतर उन्हाचे चटके जाणवायला लागतात. एप्रिल आणि मे या महिन्यात तर सूर्य अक्षरश: आग ओकतो. या तापदायक दिवसांत रस्त्यांवर शुकशुकाटासह जणू कर्फ्यूजन्य परिस्थिती असते. यावरून येथील उन्हाची दाहकता लक्षात यावी. जून महिन्याच्या १०-१२ तारखेपर्यंत ही स्थिती असते.
मला आठवते, वसंत पुरके महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनी १२ जूनला माध्यमिक शाळांचे सत्र सुरू केले होते, तेव्हा त्यांना येथील शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. इंग्रजीचे भूत जणू पालकांच्या मानगुटीवर बसलेले आहे की काय? कारण जो तो पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यावरच अधिक भर देतो. परिणामी इतर माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावते. ऐपत नसतानादेखील मोठमोठी डोनेशन्स देतात. पालकांच्या या इंग्रजाळलेल्या मानसिकतेचा नेमका फायदा शाळा व्यवस्थापन उठविते.
पालकांचा असा समज असतो की, आपल्या पाल्याला महागड्या शाळेत प्रवेश मिळाला, आता त्याला तेवढ्याच महागड्या ट्युशन क्लासमध्ये पाठविले की आपली जबाबदारी संपली! सीबीएसई शाळेच्या व्यवस्थापनाला येथील भौगोलिक परिस्थिती, येथे साजर्‍या होणार्‍या उत्सवांची, परंपरांची माहिती का असू नये? सणाच्या निमित्तानं तान्ह्या पोळ्याचे उदाहरण देता येईल. या दिवसाचे महत्त्व ओळखून माध्यमिक शाळांना सुट्‌टी असते, तर सीबीएसईचे विद्यार्थी शाळेत जातात.
या शाळांच्या देशभरातील शाळांचे सुट्‌ट्यांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्याप्रमाणे रायपूरच्या शाळांना ११ एप्रिलपासून सुट्‌ट्या लागल्या, पण नागपुरातील या शाळांच्या विद्यार्थ्यांना नागपूरच्या कडक उन्हाचा सामना करत एक आठवडाभर शाळेत जावे लागले. हे का आणि कसे चालते?
गजेंद्र डोळके
७५०७५५२९७७

झाडांच्या फांद्या व घाण
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. लोकं अंगणातील झाडांच्या फांद्या, वाळलेली झाडे याची कटाई करून तो कचरा दारासमोर टाकतात. कुठे टाकावा, हा प्रश्‍न प्रत्येक नागरिकाला पडला आहे. त्याचप्रमाणे एमएसईबीने रस्त्यावरील मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत व त्या रस्त्याच्या कडेलाच टाकून दिल्या आहेत. त्या उचलल्या नाहीत. पावसामुळे त्या सडल्या आहेत. रोज येणारा कचरेवाला त्या नेण्यास तयार नाही. कुण्या माणसाला सांगितले, तर तो ४०० ते ५०० रुपये मागतो व कुठे टाकणार माहीत नाही. रोजचे शिळे अन्न टाकतात व कुत्रे त्यावर घाण करतात. खूप दुर्गंधी सुटली आहे. त्यावर माश्या बसतात. कुत्रे, कचरा, फांद्या पसरवून ठेवतात. जाळ्ण्यास मनाई आहे व पावसामुळे ते शक्य नाही. तेव्हा मायबाप सरकारने याकडे त्वरित लक्ष द्यावे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत झाडण्याचा, स्वच्छतेचा नुसता शो आहे काय? आम्हाला एखादी जागा सांगा, तेथे कचरा नेऊन टाकू. परंतु, एमएसईबीने तोडलेल्या फांद्यांचे काय? स्वच्छ, हिरवेगार नागपूर आता गलिच्छ होण्याच्या मार्गावर आहे. डास व इतर रोगराई होण्यापूर्वी यावर उपाय करा.
-निर्मला गांधी
नागपूर

श्रीजगन्नाथ रथयात्रेचे संस्कृत समालोचन
ओडिशा राज्यातील श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील बाराव्या शतकातील महाप्रभू श्रीजगन्नाथाची विश्‍वप्रसिद्ध वार्षिक रथयात्रा नुकतीच आषाढ शुद्ध द्वितीयेस प्रारंभ झाली. गर्भगृहातील प्रत्यक्ष पूजनमूर्ती मंदिराबाहेर आणून रथयात्रा काढली जाणारे जगातील हे एकमेव उदाहरण आहे! दोन दशकांपूर्वी दूरदर्शनने आपल्या राष्ट्रीय वाहिनीवर जगन्नाथपुरीचा हा रथयात्रासोहळा थेट प्रक्षेपित करायला प्रारंभ केला होता. या थेट प्रक्षेपणामुळे जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व आणि महाप्रभू जगन्नाथ संस्कृतीचे दर्शन घराघरांत व्हायला लागले. यंदाचा रथयात्रासोहळा पाहताना, दूरदर्शन आणि प्रसारभारतीने समस्त दर्शकांना आश्‍चर्याचा सुखद धक्काच दिला. नेहमी हिंदी आणि इंग्रजीतून केल्या जाणार्‍या रथयात्रेचे समालोचन यंदा देववाणी संस्कृतमधूनदेखील केले गेले. अस्खलित संस्कृत समालोचनामुळे समस्त संस्कृतप्रेमी रसिकांना अत्यानंद झाला आहे. संस्कृत समालोचकाने विष्णुसहस्रनाम, श्रीमद् शंकराचार्यकृत मधुराष्टकस्तोत्र, श्रीरामरक्षा आदीमधून श्‍लोक, सुभाषिते आणि दाखले देऊन जगन्नाथयात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या ‘आँखो देखा हाल’मधे विशद केले. महाप्रभू श्रीजगन्नाथ, ज्येष्ठ बंधू बळिभद्र आणि भगिनी सुभद्रा यांचे अनुक्रमे नंदीघोष, तालध्वज आणि पद्मध्वज रथारूढ मनोहारी दर्शन संस्कृतमधून ऐकताना मन भरून आले होते. खरेतर संस्कृत ही कधीच मृतभाषा नव्हती आणि नाही. परंतु, हिंदुत्वफोबिया झालेल्या अनेक पूर्ववर्ती सरकारने संस्कृत भाषेचे संवर्धन म्हणजे हिंदुत्वपोषक आणि भगवेकरण, असे समजून जाणूनबुजून गीर्वाणसुधा संस्कृत भाषेला मुख्य प्रवाहात येऊ दिले नाही. परंतु, आता संस्कृत आणि संस्कृतिनिष्ठ सरकार केंद्रात असल्याने संस्कृत भाषेवरील हा अन्याय आता दूर होतो आहे. जगन्नाथपुरी रथयात्रेचे संस्कृत समालोचन करून असंख्य संस्कृतप्रेमी अभ्यासक, शिक्षक आणि रसिकांचे मनोबल उंचावण्याचे कार्य दूरदर्शनने केले आहे. गेल्या अनेक वर्षांतील छद्मी सेक्युलॅरिस्ट लोकांच्या पाताळयंत्री कारभारामुळे संस्कृत, संस्कृतिक्षेत्रात एक मोठी पोकळी मुद्दाम तयार करण्यात आली होती. पुरी रथयात्रेच्या संस्कृत समालोचनामुळे ती पोकळी प्रातिनिधिक का होईना, मात्र भरण्यात आली आहे. पुरी रथयात्रेचे संस्कृत समालोचन केल्याबद्दल दूरदर्शन, प्रसारभारती आणि माहिती नभोवाणी मंत्री वैंकया नायडू यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
प्रा. भालचंद्र माधव हरदास
वंजारीनगर, नागपूर

मराठी भाषा धोरण
मराठी भाषेच्या संदर्भात चिंता व्यक्त करत राहणे, हा उच्चभ्रूंचा विरंगुळ्याचा छंद झालेला आहे. केवळ चिंता व्यक्त करायची, त्यासंदर्भात प्रत्यक्षात काहीच करायचे नाही. इतर कसे नालायक आहेत, हे दाखवीत राहण्याची अकर्मण्यक उच्चभ्रू मानसिकताच समाजातील अनेक समस्यांना कारणीभूत आहे. त्यातच मराठी भाषेच्या संदर्भात चिंता करणार्‍यांचा ढोंगीपणाही कारणीभूत आहे. मराठी भाषेला इतक्या वर्षांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यासाठी सत्ताधार्‍यांच्या मागे हीच मंडळी लागली होती. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आता काय? मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय केले जाते आहे? कुठलीही भाषा, संस्कृती ही काही सत्ताधारी टिकवीत नसतात. भाषेचा विकास हा समाजानेच करायचा असतो. त्यासाठी पुरेसा भाषाभिमान असायला हवा. तो नेमका मराठी समाजात नाही. त्यासाठी अनेक कारणे आहेत.
एकतर मराठीभाषक हे जात, धर्म, पंथ, प्रदेश आणि आर्थिक वर्ग यात विभागलेले आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यातला मराठी माणूस अन् गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील मराठी माणूस यांच्यात काहीच संवाद नाही. त्यांचे जगणे, त्यांची अभिव्यक्ती तिकडे पोहोचतही नाही. पुण्या-मुंबईकडे बोलली जाते तीच प्रमाणभाषा, असे मानले जाते. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी, विकासासाठी फारसे काही केले जात नाही. आता टीव्ही हे माध्यम प्रभावी आहे. त्यावरही मुंबई, पुण्याचेच वर्चस्व आहे. टीव्हीच्या मालिका आणि व्यावसायिक नाटकांत तिकडच्या उच्च मध्यमवर्गीयांचे जगणेच मांडले जाते. मग भाषाही तीच असते. त्या सगळ्याच मांडणीचा स्तर अत्यंत सुमार असाच असतो. तरीही ते इतर मराठी जनांना मुकाट सहन करावे लागते. विदर्भातील वर्‍हाडी त्यांना रुचत नाही, त्यांची मालवणी-कोकणी मात्र सर्रास मांडली जाते. या तफावती दूर केल्याशिवाय अन् अठरापगड बोलभाषांना भाषेच्या मुख्य प्रवाहात स्थान दिल्याशिवाय मराठी भाषेचा दर्जा सुधारणार तर नाहीच, पण ती सकल मराठीभाषकांना आपली भाषा वाटणार नाही. मराठी समीक्षकांची रसास्वादाची भाषा इतकी कठीण असते की, सामान्यांना त्यांची समीक्षा वाचून साहित्याच्या आकलनापर्यंत पोहोचणेच कठीण होऊन जाते. इतक्या दुर्बोध पद्धतीने समीक्षा केली जाते की, मग साहित्यच नको वाटू लागते. मराठीच्या संदर्भात काम करणार्‍या संस्थाही केवळ उत्सव आणि मिरविणे यापलीकडे फार काही करताना दिसत नाही. त्यामुळे मराठी भाषेचे नवे धोरण ठरविताना या सार्‍या मुद्यांचा नीट विचार केला जायला हवा.
अनिकेत साठे
अमरावती