अग्रलेख

0
152

पाऊस आणि कविता…

कविता हा तसा अक्षुण्ण असा प्रकार आहे. कवी मरतात (लोक कुणाच्या मरणावरही कविता करतात), पण कविता कधीच मरत नाही! कुणावर कुणी मरत असेल (हा आपला लोकल शब्दप्रयोग- मरणे म्हणजे जीव टाकणे, लव्ह करणे), तर तो हमखास कविता करतोच. किमान तितक्या वेळासाठी तरी त्याच्या हृदयाच्या गाभार्‍यात वगैरे कविता प्रस्फुटित होत असते. कविता म्हणजे ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक’ अन् ‘सर्व हळवेजीव प्रतिपालक’ असा प्रकार आहे. नेमके काय झाल्याने कविता होते, हे कळायला मार्ग नाही. म्हणजे आजकाल प्रेम नेमके कशाने होते, हेही शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. जीवशास्त्रीयदृष्ट्या कुठली रासायनिक प्रक्रिया झाल्यावर प्रेम होते, हे आता सांगतात डॉक्टर्स, मात्र कविता नेमकी कशामुळे आणि केव्हा होऊ शकते, हे काही सांगता येत नाही. म्हणजे कवितेचे बीज कसे ‘कंसिव्ह’ होते आणि मग ती कशी प्रकट होते, जन्म घेते, हे काही अद्याप कळू शकलेले नसल्याने, कवी होण्याचा धोका कुणाला टाळता आलेला नाही. कविता झाली की मग आपल्याला कळते, की कविता झालेली आहे अन् मग ती व्यक्ती कवी झालेली असते. हे फार म्हणजे फारच डेंजर आहे. असे ठरवून वगैरे कवी होता येत नाही. हं, आजकाल लोक कविता पाडतात. शीघ्र वगैरे कवी असतात. ते मग कुणाच्या लग्नात आवश्यक असे संदर्भ घेतले की मंगलाष्टके वगैरे करून देतात. कुणी कुणाच्या बारशाला किंवा मग वाढदिवसालाही कविता करतात. आजकाल तर व्हॉटस् ऍप अन् फेसबुकमुळे कविता केली की, ती कुणीतरी वाचावी (म्हणजे त्याने मरावे परी कविता वाचून कीर्तिरूपे उरावे) यासाठी वाट बघावी लागत नाही. कुणाशी जांगळबुत्ता जमत असेल, तर मग दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सूचक अशा कवितांचा भडिमार केला जातो. म्हणजे थेट, लट्‌टू पडोसन की भाभी हो गयी, असे न म्हणता कवितेच्या माध्यमातून आडवळणाने ‘आय एल यू’ असे सूचित करता येते. समजा समोरच्याने आक्षेप घेतला तर ‘अरे! कविता आहे ही’ असे म्हणत कन्नी काटायची अन् समजा तिकडून प्रत्युत्तरादाखल तसलीच कविता आली तर मग गाडी समोर धकवायची… तर एकुणात काय की, कविता अशी सर्वच बाबतीत कामी येत असते. तरीही कविता होते कशी, हे काही कळायला मार्ग नाही. हं, कवितेचे पीक उदंड आहे. कुठल्याही वर्तमानपत्रांच्या कचेरीत बाकी मजकुराची वानवा असली, तरीही कवितांचा मात्र पाऊसच पडत असतो! म्हणजे सगळे ऋतू, मास, दिवस, अमक्या राष्ट्रीय नायकाची जयंती- पुण्यतिथी, सगळे सण, कुठला हादसा, अपघात, सामाजिक आणि इतर सगळ्याच समस्या, नैसर्गिक घटक, शाळा, आई, बायको, सखी, प्रेयसी, मायबाप, देवदेवता अन् काहीच नसेल तर मनाची व्यथा तर कविता करायला हमखास विषय ठरतेच! तर अशा असंख्य विषयांवरील कवितांचा पाऊसच पडत असतो. अरे बापरे! पाऊसवरून आठवलं, कविता कशी होते हे नाही सांगता येत, मात्र ती पावसाळ्यात हमखास होत असते, हे मात्र नक्की! पावसाळा आला की धरित्री हिरवा शालू वगैरे नेसून फुलांचा शृंगार लेवून वगैेरे कवींच्या दिमतीला हजरच असते! इकडे शेतीत काहीही समस्या असोत, पावसाळ्यात चिखल, घाण अन् कचरा साचून असल्याने विविध प्रकारच्या रोगराईचा प्रकोप झालेला असो, पावसाने दडी मारल्याने शेतकरी विहिरीत उडी मारण्याच्या अवस्थेत आला असो, कवितेतला पाऊस मात्र रिमझिम कोसळत असतो, पाण्याचे तुषार प्रेयसीच्या गालांवर लडिवाळ खेळ मांडत असतात. वारा कसा खट्याळ चाळे करत असतो… तिकडे झोपड्यांमधून पाऊस वैरी बनून वाहत असला, तरीही यांच्या सुरक्षित घरांच्या खिडकीतून मादक पाऊस यांना हाका मारत असतो… पावसाचे जलबिंदू (शब्दकळा तर बघा कशा धो धो वाहू लागलेल्या) पानांवर, खिडकीच्या गजांवर साचून असतात आणि मग त्यातून यांना विश्‍वदर्शन वगैरे होत असतं. बालकवींनी कधीकाळी, ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे’ असे लिहून ठेवले. आता तसे काही नसतेच. एकतर मैदानेच राहिलेली नाहीत. असलीच तर ती कचर्‍याची डम्पिंग यार्ड असतात. नाहीतर मग बिल्डरांच्या घशात गेलेली असतात. पावसाचे काय की, तो जे पेराल तेच उगवून देत असतो. आता तुम्ही सगळीकडेच कचरा, घाण असेच काही करत असाल, तर त्यावर पाऊस पडला की डास, किडे, रोगाराईच उगविणार की नाही? त्यामुळे आता यावर कशा कविता लिहिणार? आताशा मग कौलारू टुमदार घरेच राहिलेली नाहीत. मोठ्या फ्लॅटस्कीम्स असतात. त्यात भांडणे असतात. प्रत्येक जण आपल्या सदनिकेचे दार बंद करून पावसाळ्यात हमखास ‘गारवा’ची सीडी लावून पाऊस अनुभवत बसलेला असतो. मग बालकवींचेच शब्द इकडचे तिकडे करून धरित्रीला (पावसाळ्यातच जमीन म्हणजे धरित्री असे तालेवार नाव धारण करत असते.) हिरवा वगैरे शालू नेसवून टाकला जात असतो. आता पोरी शालू लग्नातही नेसत नाहीत- अगदी तिचं नाव ‘शालू’ असेल तरीही नाहीच! बरे, आजकाल नावही शालू, मालू वगैरे नसते. मुलींना जीन्स पॅण्ट, टी-शर्टच लागतो. असे असूनही पावसाळ्यात धरित्रीला हिरवाच शालू घातला जातो कवितेत. ‘रंगबिरंगी ड्रेस घालायचे पावसाळ्यात खास टॉप असायचे’ अशी कविता नाही केली जात किंवा निबंधातही गवताळ कुरणे अन् त्यावर चरणार्‍या गायींचेच देखावे उभे केले जातात. पावसाळ्यात कवितांइतकाच गरम भज्यांचा माहोलही गरम असतो. आत्ताच पाऊस अद्याप रुळायचा असताना, तिकडे मुंबईत मराठी माणूस अधिक प्रमाणात असल्याची अंधश्रद्धा असलेल्या दादर भागात ‘भजी महोत्सव’ साजराही करण्यात आला आहे. ‘भजी’ आणि ’भुट्‌टे’ हे पावसाळ्याचे खास समीकरण झालेले आहे. सोबत चहा-कॉफी हे समीकरण थोडे बॅकवर्ड झालेले आहे, पण उघडपणे पिण्यासारखे तेच प्येय असल्याने काही इलाज नसतो. एक मात्र नक्कीच की, पावसाळा आला की भल्याभल्यांना कविता सुचते. म्हणजे कवी होण्याची सुरुवात पावसाळ्यापासूनच होते. कदाचित हा पेरणीचा हंगाम असल्यानेही असेल. पुढे मग दिवाळी असते आणि दिवाळी अंकांसाठी लिहायचे असते. त्यामुळे पावसाळ्यातच सुरुवात केलेली बरी असते. जे एस्टॅब्लिश वगैरे कवी असतात त्यांना दिवाळी अंकांसाठी पत्रं याच काळात आलेले असतात. नसतील आली तरीही उगाच आव आणत, ‘‘काय बुवा खूप पत्रं आलीत अंकांसाठी लिहिण्याची… आपण नाही लिहीत ना त्या अमक्या-तमक्यासारखं, वर्षातून चार-दोन कविता केल्या तर केल्या… त्याच्यासारख्या कविता पाडतो थोडीच,’’ असे म्हटले जाते. मात्र, या काळात न मागताही काही दिवाळी अंकांना कवितांचा रतीब पुरविला जात असतो. कोण कुठल्या दिवाळी अंकाचे संपादन करतो आहे, हे माहीत करून त्याच्यापर्यंत साहित्य पुरविले जात असते. त्यासाठी मग जून-जुलैतच काय त्या कविता पाडाव्या लागतात. मग त्यातच कुणाला कधी कथाही होऊन जात असते. काही लोक मात्र अतिच तांत्रिक असतात. म्हणजे ऋतूंचा त्यांच्या काळजावर परिणाम होतच नाही. हृदयात ऋतूंची नोंद घेण्याइतके ते हळवे नसतात. उन्हाळ्यात गॉगल, शुभ्र दुपट्‌टा त्यांच्या स्कूटरच्या डिकीत असेल, तर अगदी ७ जूनच्या मृग नक्षत्रावर त्यांच्या स्कूटरच्या डिकीत रेनकोट येत असतात. हिवाळ्यात रेनकोट जाऊन तिथे स्वेटर-मफलर येते. घरातही मग ऋतूनुसार वस्तू बदलतात. पावसाळ्यात फ्रीजमध्ये आलं वगैरे हमखास सापडेल अशांच्या घरात. या पलीकडे ते काही करत नाहीत. अशातल्या किती जणांना ऐन पावसाळ्यात कविता होते, हा मात्र अभ्यासाचा विषय आहे. ‘पाऊस आणि कविता’ यांचं नातं मात्र एलआयसी एजंट आणि पॉलिसीसारखंच आहे. त्यामुळे पावसानं यावं मात्र कवितेनं वाहून जावं, असंच वाटतं…!