ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल कालवश

0
69

मुंबई, २ जुलै 
प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे आज रविवारी आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. शुक्रवार रात्रीपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि आज त्यांनी वांद्रे येथील आपल्या घरातच जगाचा निरोप घेतला.
तोरडमल यांना नाट्यसृष्टी ‘मामा’ म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. तब्बल पाच दशकांपेक्षा जास्त काळ रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणार्‍या या नाटकाचे पाच हजाराहून अधिक प्रयोग झाले. या नाटकात डॉ. तोरडमल यांनी प्राध्यापक बारटक्केंची भूमिका साकारली होती. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे असे म्हटले होते की, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये. पण झाले उलटेच. रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला व मुलींनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. लेखक म्हणून त्यांनी कादंबरी, नाटक आणि चरित्र असे साहित्यप्रकार हाताळले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंबर्‍यांचा अनुवादही त्यांनी केला.
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाशिवाय त्यांची गुड बाय डॉक्टर, गोष्ट जन्मांतरीची, चांदणे शिंपित जाशी, बेईमान, अखेरचा सवाल, घरात फुलला पारिजात, चाफा बोलेना, म्हातारे अर्क बाईत गर्क, ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, लव्ह बर्ड्स, विकत घेतला न्याय, आदी नाटकेही प्रचंड गाजली.
मराठी रंगभूमीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांचे प्रचंड योगदान होते. ज्योतिबाचा नवस, सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसं, आत्मविश्‍वास, शाब्बास सूनबाई आदी चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ज्योतिबाचा नवस हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
त्यांनी धोंडोपंत कर्वे यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवादही केला. याशिवाय २० पुस्तके लिहिली आहेत. उत्तरमामायण या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे मामांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.
नाट्यसृष्टीत शोककळा
मधुकर तोरडमल यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि नाट्यसृष्टी व मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रपट व नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करीत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.