सरसकट कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना  विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखणार

0
245

बळिराजा शेतकरी संघटनेचा इशारा
कराड, २ जुलै 
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी न केल्यास पंढरपुरात बळिराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाहीत, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी दिला.येथे पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीच्या घेतलेल्या निर्णयचा केवळ १५ टक्केच शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. कर्जमाफीसाठी अजूनही पैशांची आवश्यकता आहे. राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय सुकाणू समितीला मान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय बदलून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. त्यांनी तसे न केल्यास पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांना आमचे कार्यकर्ते विठ्ठल पूजा करू देणार नाहीत, असे त्यांनी इशारा देताना सांगितले. यावेळी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, अध्यक्ष पंजाबराव पाटील, नितीन पाटील, भीमाशंकर बिराजदार, साजिद मुल्ला उपस्थित होते.
घाटणेकर पुढे म्हणाले की, दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावर्षी त्यांना ही शासकीय पूजा करू देणार नाही. त्यांनी पोलिसांचा वापर करून देवपूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बळिराजाचा उद्रेक पाहावा लागेल. राज्यातील शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी तीव्र आंदोलने केली. मात्र, त्यांना निराशाजनक कर्जमाफी दिली गेली. कर्जमाफी देताना अनेक निकष लावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे होते. तसेच सुकाणू समितीच्या काही मागण्याही मान्य करायला हव्या होत्या. मात्र, त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांनी व राज्य सरकारने शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांचे ३० जून २०१७ पर्यंतचे चालू आणि थकीत कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.जनहित शेतकरी संघटनाही आक्रमक
दरम्यान, राज्य शासनाच्या या फसव्या कर्जमाफीचा निषेध म्हणून आषाढी वारीच्या महापूजेला येणार्‍या मुख्यमंत्र्यांना रोखणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैया देशमुख यांनीही दिला आहे. सध्या राज्य सरकारने जी शेतकरी कर्जमाफी केली आहे, ती फसवी आहे. जर शेतकर्‍याकडे पैसे असते तर तुमची कर्जमाफी नको होती. मात्र दीड लाख रुपयांची शासनाची कर्जमाफी मिळवायची असेल तर सर्व कर्ज फेडावे ही अट जाचक अट आहे. म्हणून या फसव्या कर्जमाफ़ी निषेधार्थ आषाढी वारीच्या महापुजेपासून फडणवीस यांना जनहित शेतकरी संघटना रोखणार असल्याचे संघटनेचे संस्थापक भैया देशमुख यांनी जाहीर केले. (वृत्तसंस्था)