राज्यात पावसाची दमदार हजेरी

0
320

मुंबई, २ जुलै 
राजधानी मुंबईसह राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. अनेक भागात शेतीमध्ये पेरणी, लावण्या आणि रोवण्याची कामे सुरू आहेत.मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरात शनिवारी रात्रीपासून सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. यात अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, सांताक्रूज परिसरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. शिवाय ठाणे,भिवंडी, कल्याण, पवई, चांदीवली परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकरांना दिलासा आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. यातच शनिवारी रात्री पश्‍चिम द्रुतगती मार्गावर दहिसरजवळ टेम्पो घसरून पलटी झाला. या टेम्पोतील चौघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.
खान्देशातील नंदुरबारमध्ये तब्बल १५ दिवसांनी पावसाने दमदार वर्दी दिली. नंदुरबारसह तळोदा आणि नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे, तर जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कुरंझे गावासह २० गाव आणि पाड़्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच देहर्जे नदीवरील पूल गेल्या ४८ तासांपासून पाण्याखाली आहे. या परिसरात ४८ तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कुरंझेकडून वाडाकडे जाणारा रस्ता बंद झाले आहे, तर विक्रमगड मनोरकडे जाणारे रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. (वृत्तसंस्था)