कर्जमाफीच्या यादीत मुंबईचे ८१३ शेतकरी

0
166

लाभार्थींच्या यादीवरून खळबळ
मुंबई, ४ जुलै 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली असून जिल्हानिहाय लाभार्थी शेतकर्‍यांची यादीदेखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र या यादीमध्ये मुंबईत ६९४ तर, मुंबई उपनगरात ११९ लाभार्थी दाखवण्यात आले असून मुंबईसारख्या मेट्रो शहरात एवढे शेतकरी आले कुठून आणि मुंबईकर गच्चीवर मशागत करतात काय, असे प्रश्‍न उपस्थित होत आहे.शेतकरी आंदोलनामुळे आणि शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या दबावापुढे नमते घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली. या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा लाभ ८९ लाख शेतकर्‍यांना मिळणार असून सरकारवर सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. ‘कोणत्या गावातील किती शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला हे सगळ्या शेतकर्‍यांना कळले पाहिजे आणि ४० लाख कर्जमुक्त शेतकर्‍यांची यादी जाहीर केली पाहिजे’ अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर या योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची जिल्हानिहाय आकडेवारी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून शेअर केली. यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगर असे एकूण ८१३ लाभार्थी शेतकरी असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, मुंबई उपनगरापेक्षा मुंबईतील शेतकरी जास्त असल्याने या यादीवर सोशल मीडियावरून प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. ‘मुंबईकर गच्चीवर मशागत करून पिकवतात काय’ असा प्रश्‍न उपस्थित करून गमतीदार किस्से शेअर केले जात आहे. मुंबईत रेल्वे रुळालगत शेती होते. उर्वरित ठिकाणी शेतीसाठी फारशी जागा उपलब्ध नाही. मग नेमके लाभार्थी कोण असा प्रश्‍न अनेकांनी उपस्थित केले आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या नावांची यादीच आता प्रसिद्ध करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
कर्जमाफीची जिल्हानिहाय आकडेवारी
अहमदनगर – २ लाख ८६९
औरंगाबाद – १ लाख ४८ हजार ३२२
बुलडाणा – २ लाख ४९ हजार ८१८
गडचिरोली – २९ हजार १२८
जळगाव – १ लाख ९४ हजार ३२०
लातूर – ८० हजार ४७३
नागपूर – ८४ हजार ६४५
नाशिक – १ लाख ३६ हजार ५६९
परभणी – १ लाख ६३ हजार ७६०
रत्नागिरी – ४१ हजार २६१
सिंधुदुर्ग – २४ हजार ४४७
वाशिम – ४५ हजार ४१७
अकोला – १ लाख ११ हजार ६२५
बीड – २ लाख ८ हजार ४८०
चंद्रपूर – ९९ हजार ७४२
गोंदिया – ६८ हजार २९०
जालना – १ लाख ९६ हजार ४६३
मुंबई शहर – ६९४
मुंबई उपनगरे – ११९
नांदेड – १ लाख ५६ हजार ८४९
उस्मानाबाद – ७४ हजार ४२०
पुणे – १ लाख ८३ हजार २०९
सांगली – ८९ हजार ५७५
सोलापूर – १ लाख ८ हजार ५३३
यवतमाळ – २ लाख ४२ हजार ४७१
अमरावती – १ लाख ७२ हजार ७६०
भंडारा – ४२ हजार ८७२

धुळे – ७५ हजार १७४
हिंगोली – ५५ हजार १६५
कोल्हापूर – ८० हजार ९४४
नंदुरबार – ३३ हजार ५५६
पालघर – ९१८
रायगड – १० हजार ८०९
सातारा – ७६ हजार १८
ठाणे – २३ हजार ५०५
हा प्रश्‍न मलाही पडला : मुख्यमंत्री
मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्‍न मलाही पडला होता. मी तसे अधिकार्‍यांना विचारलेही होते. मात्र चौकशी करूनच कर्जमाफी दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील शेतकर्‍यांनी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर, मुंबईतले हे शेतकरी नेमके कोणते, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. आता जाहीर केलेली यादी प्रस्तावित लाभार्थ्यांची आहे. ‘प्रत्येक शेतकर्‍याच्या कर्जाची व्यवस्थित चौकशी करून मगच कर्जमाफी दिली जाणार आहे. मुंबई आणि उपनगरात शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे. या शेतकर्‍यांची जमीन मुंबईलगत असण्याची शक्यता आहे, या शेतकर्‍यांनी मुंबईतील राष्ट्रीयीकृत बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे. कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळया गोष्टी स्पष्ट होतील, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
कर्जमाफीत बुलडाणा अव्वल
कर्जमाफीची सर्वात जास्त लाभ बुलडाण्यातील शेतकर्‍यांना मिळाला आहे. बुलडाण्यातील २ लाख ४९ हजार ८१८, त्यानंतर यवतमाळ २ लाख ४२ हजार ४७१, तर त्या खालोखाल मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात २ लाख ८ हजार ४८० शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. कर्जमाफीचे सर्वात कमी लाभार्थी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत दीड लाखापर्यंत कर्ज असलेले शेतकरी आणि सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहेत, अशा शेतकर्‍यांचीही आकडेवारी सांगितली आहे. राज्यात एकूण ३६ लाख १० हजार २१६ शेतकर्‍यांवर दीड लाखांपर्यंत कर्ज असून, या सर्वांचे सातबारेही कोरे होणार आहेत. या आकडेवारीत नियमित कर्ज भरणारे शेतकरी, पुनर्गठित खातेदार आणि ओटीएसचा (वन टाईम सेटलमेंट) लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचा समावेश नाही.