निवृत्ती महाराज वक्ते यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार

0
182

मुंबई, ४ जुलै 
राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१६-१७ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते यांना आज घोषित करण्यात आला.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणार्‍या महनीय व्यक्तीला राज्यशासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रूपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, मारोती महाराज कुर्‍हेकर आणि डॉ. उषा देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निवडीसाठी तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ. प्रशांत सुरू, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड आणि सय्यदभाई आदी सदस्यांच्या समितीने काम पाहिले.
ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. अवध्या नवव्या वर्षापासून त्यांनी कुटुंबीयांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरू केली. बालवयातच त्यांनी अडीच हजार अभंगांचे पठण केले होते. १९५४ ते १९५८ या काळात त्यांनी साखरे महाराज मठात गुरू नीलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. गेल्या ६० वर्षांपासून त्यांचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य चालू आहे. विठ्ठल कवच, विठ्ठल सहस्त्रनाम, विठ्ठल स्तवराज, विठ्ठल अष्टोत्तरनाम, विठ्ठल हृदय, मुक्ताबाई चरित्र, ज्ञानेश्वर दिग्विजय, वाल्मिकी रामायण, संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे.  (तभा वृत्तसेवा)