इस्रायलमधील पहिल्या पावलांचा रोमांच 

0
134

अन्वयार्थ
दोन हजार वर्षांपासून संबंध असलेल्या देशात ७० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुणा भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच इस्रायलचा दौरा आहे. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक प्रसंगाचा थरार काही वेगळाच आहे. अंगावर रोमांच आणणारा हा क्षण आहे. भारताच्या  स्वातंत्र्यानंतर येथील पंतप्रधानांची इस्रायल भेट हा अपूर्व उत्साहाचा प्रसंग आहे. सारे विश्‍व आगळ्या कुतूहलाने याकडे बघत आहे. पंचवीस वर्षांच्या राजनयिक संबंधानंतर हा योग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौर्‍यावर जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत, ही गोष्टच अतिशय आश्‍चर्यचकित करणारी आहे. संपूर्ण जगाने हाकलून लावलेल्या, सर्वांनी उपेक्षा केलेल्या यहुदी समाजाला तब्बल दोन हजार वर्षांपासून उदारपणे आश्रय देणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. दुधात साखर पूर्णपणे विरघळून जावी त्याप्रमाणे हा समाज भारताशी, भारतीय संस्कृतीशी एवढा एकरूप झाला आहे की या समाजाने भारताच्या विकासात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र, त्यांनी स्वत:साठी कधीच विशेषाधिकार मागितला नाही. यहुदी समाजाला दोन वर्षांपूर्वी अल्पसंख्यक दर्जा देण्यात आला असला तरी महाराष्ट्र वगळता देशात कुठेही याची अंमलबजावणी झाली नाही.इस्रायलची निर्मिती १९४८ मध्ये झाली. भारताने या देशाला १७ सप्टेंबर १९५० रोजी मान्यता दिली. मात्र, अरब देशांशी संबंध बिघडतील या भीतीने १९९२ पर्यंत भारताचे इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. एवढे असूनही १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धात इस्रायलने भारताला महत्त्वपूर्ण सामरिक मदत केली होती. तर याउलट मुस्लिम राष्ट्रांनी खासकरून तेल उत्पादक अरब देशांनी काश्मीर तथा अन्य मुद्यांवर कधीही भारताला साथ दिली नाही. एवढेच नव्हे तर पाकिस्तान समर्थक धोरण अवलंबले.
इसवीसनपूर्व आठव्या शतकात (ई. पू. ७४०-७२२) सीरियाने इस्रायलवर हल्ला करून त्यावर कब्जा केला होता. तेव्हापासून यहुदींचा इतिहास स्थलांतर, यातना, बंदी शिबिरे, वांशिक नरसंहार, भेदभाव आणि हिटलरच्या गॅस चेंबरमध्ये तडफडून मरण्याचाच राहिला आहे. संपूर्ण विश्‍वातून केवळ भारतातील हिंदू समाजाने आणि येथील हिंदू राजांनीच यहुदींना संपूर्णपणे स्वीकारले, त्यांना आपले मानले, सन्मान आणि बरोबरीचा दर्जा दिला. एवढेच नव्हे, तर पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्की साम्राज्याच्या मगरमिठीतून इस्रायलची हाइफानगरी मुक्त करण्यासाठी भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावली आणि २३ सप्टेंबर १९१८ रोजी हे नगर तुर्कांच्या तावडीतून मुक्त केले होते. ऐतिहासिक हाइफानगरी भारतीय सैनिकांनी मुक्त केल्याची खबर कानी पडताच जगभरातील यहुदींनी आनंदोत्सव साजरा केला, सर्वत्र जल्लोष केला. विशेष म्हणजे नवी दिल्लीतील महत्त्वपूर्ण ‘तीन मूर्ती चौक’ याच विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनला आहे. मोदी सरकारने आता या चौकाचे नामकरण ‘हाइफा चौक’ असे केले आहे. पंतप्रधान मोदी हाइफा येथे भारतीय सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
भारतातील हिंदू समाजाला यहुदींविषयी आस्था, आपलेपणा वाटणे अगदी स्वाभाविक आहे. यहुदी समाज भारताशी एवढा एकरूप झाला आहे की, कित्येकांनी भारतीय नावे, आडनावे धारण केली आहेत. खानपान व वेशभूषेबाबतही ते अस्सल भारतीयच राहिले. भारतीय लष्करात अर्थात सेनादलात यहुदींनी महत्त्वाची व जबाबदारीची पदे भूषविली आहेत. एवढेच नव्हे, तर येथील साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रात आपले प्रचंड योगदान दिले आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे नायक लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब यहुदीच होते. व्हाईस ऍडमिरल बेंजामिन सॅमसन किलेकर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. यहुदी समाजाने बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. मुंबई विद्यापीठाच्या भव्य ग्रंथालयाची निर्मिती केली. मुंबईचे ससून बंदर उभारले. ‘गेट वे ऑफ इंडिया’देखील यहुदींचीच देणगी आहे. भरतनाट्यम कलावंत तथा संस्कृतच्या गाढ्या अभ्यासक लीला सॅमसन आणि सुलोचना (रूबी मायर्स), नादिरा आणि डेव्हिड हे सर्व महान चित्रपट कलावंत यहुदीच होते.
यहुदींवर संपूर्ण जगभरात जे भयानक अत्याचार झाले, त्यात हिंदूंना विदेशी आक्रमकांनी केलेला हिंदू नरसंहार, मंदिरांचा विध्वंस, धर्मांतरण आणि यातनांचे प्रतिबिंब दिसते. १४ मे १९४८ रोजी इस्रायल स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. मात्र, स्वातंत्र्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत या देशावर इजिप्त, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन आणि इराकने एकत्रितपणे आक्रमण केले. हे युद्ध १५ महिने चालले. शेवटी इस्रायलचा विजय झाला. इस्रायलचे राष्ट्रपती बेन गुरियन यांनी दोन हजार वर्षांपासून वापरात नसलेल्या हिब्रू भाषेला राष्ट्रभाषा बनविण्याचे साहस दाखविले. संपूर्ण विश्‍वात विखुरलेले यहुदी इस्रायलला परतले. चारही बाजूंनी मुस्लिम शत्रू अरब देशांनी वेढलेला इस्रायल आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सायबर विज्ञान, संरक्षण, सॉफ्टवेअर या क्षेत्रात जगातील प्रथम श्रेणीचा देश बनला आहे. केवळ ८५ लाख लोकसंख्या आणि २०७७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा इस्रायल संरक्षण साहित्य, रडार, क्षेपणास्त्रांच्या निर्मितीतच नव्हे तर कृषी, डेअरी उत्पादनाच्या क्षेत्रात जगात अव्वल ठरला आहे. भारताला दहशतवादासंबंधी महत्त्वपूर्ण गुप्त माहिती व सामरिक मदत इस्रायलकडूनच मिळत आहे. राजस्थानचे वाळवंटी क्षेत्र हिरवेगार करून तेथे शेती पिकविण्यात व फलोत्पादन घेण्यात इस्रायलने भारताला अतिशय मोलाची मदत केली आहे. इस्रायलशी १९९२ मध्येच राजनयिक संबंध प्रस्थापित होऊनही केवळ मुस्लिम व्होट बँकेपायी आणि अरब देशांच्या नाराजीच्या भीतीने कॉंग्रेस सरकार इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्यात मागेपुढे पाहत होते. तर याउलट इस्रायल कुठलाही संकोच न बाळगता भारताला मदत करीत होता. केवळ नरेंद्र मोदींचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतरच इस्रायलशी प्रगाढ संबंध प्रस्थापित झाले. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २०१५ मध्ये इस्रायलच्या दौर्‍यावर गेले. एखाद्या भारतीय राष्ट्रपतीने इस्रायलला दिलेली ती प्रथमच भेट होती. तर इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिवलिन यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता.
मोदी सरकारने इस्रायलसमवेत सर्वाधिक सामरिक करार केले आणि तंत्रज्ञान-स्थानांतरणच्या धोरणांतर्गत भारताच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला इस्रायलचे सहकार्य मिळाले. यात विध्वंसक मारक क्षमतेच्या बॅराक-१ क्षेपणास्त्ररोधक यंत्रणेचा समावेश आहे, तर ८३५६ रणगाडाभेदी गायडेड क्षेपणास्त्र स्पाईक आणि ३२१ क्षेपणास्त्र लॉंचर खरेदी करण्यात आले. दोन्हीची किंमत ६६९० लाख अमेरिकन डॉलर आहे. याशिवाय तीन अब्ज डॉलर किमतीचे अवॅक्स रडार सिस्टीम, जमिनीवरून हवेत मारा करणारे भयानक स्पायडर क्षेपणास्त्र खरेदी करण्याविषयी आणि डीआरडीओसमवेत अनेक स्तरांवर संरक्षण उत्पादनाविषयी महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण इस्रायल सजविण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू प्रत्येक प्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. तेथील टॅक्सी आणि परिवहन चालक संघटनेने मोदींच्या स्वागतासाठी येणार्‍या इस्रायलींसाठी मोफत टॅक्सी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
एक अतिशय निकटचा आणि सदैव विश्‍वासपात्र इस्रायलशी उपयुक्त स्तरावर संबंध प्रस्थापित करण्यासाठी सात दशके लागली. भारताला सर्व अरब राष्ट्रांबरोबर चांगले संबंध हवे आहेत. पॅलेस्टाईनविषयी भारताच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही. अगदी इतक्यातच पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी भारताचा यशस्वी दौरा केला होता. पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबियाचा दौराही पूर्णपणे यशस्वी झाला आणि इराणसह खाडीतील मुस्लिम देशांसमवेत भारताचे संबंध अधिक चांगले झाले आहेत. इस्रायलसमवेत प्रगाढ संबंध प्रस्थापित होणे याचा अर्थ अन्य देशाशी संबंध दुरावले असा मुळीच नाही. भारत आपली राष्ट्रीय सुरक्षा आणि कृषी व्यवस्थेसाठी सार्वभौम राष्ट्र या नात्याने प्रथमच आपले धोरण स्वतंत्रपणे राबविण्यास सज्ज झाला आहे. यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा.   – तरुण विजय