नितीशकुमार यांचा विरोधी पक्षांना घरचा अहेर

0
78

दिल्लीचे वार्तापत्र
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे कधीकाळी विरोधी पक्षांच्या ऐक्याचे प्रमुख सूत्रधार असलेले बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार विरोधी पक्षांच्या विशेषत: बिहारमधील महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राजदच्या रडारवर आले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपल्या मनासारखा निर्णय न घेतल्यामुळे या दोन्ही पक्षांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. काही काळ मौन बाळगून नितीशकुमार यांनी या दोन्ही पक्षांना तेवढेच दमदार प्रत्युत्तर दिले आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर या दोन्ही पक्षांना त्यांची औकात दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे यातून नितीशकुमार यांनी आपली भविष्यातील राजकीय वाटचाल काय राहील, याचे संकेतही दिले आहे.  सत्ताधारी पक्षाला विरोध करणेही विरोधी पक्षांची जबाबदारी असली तरी त्यासाठी विरोधी पक्षांनी आपला पर्यायी अजेंडा बनवला पाहिजे, त्याचप्रमाणे फक्त भाजपाला विरोध एवढाच आपला मर्यादित अजेंडा न ठेवता देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले पाहिजे, असा घरचा अहेर केला आहे. जोपर्यंत विरोधी पक्ष जनतेसमोर आपला पर्यायी कार्यक्रम ठेवत नाही, तोपर्यंत जनतेचाही विरोधी पक्षांवर विश्‍वास बसणार नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. असा पर्यायी राजकीय कार्यक्रम तयार करणे ही सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेसची जबाबदारी आहे, असे नितीशकुमार यांनी ठणकावले आहे. पर्यायी राजकीय कार्यक्रमानंतरच विरोधी पक्षाच्या ऐक्याचा तसेच चेहर्‍याचा प्रश्‍न उपस्थित होतो, याकडे नितीशकुमार यांनी लक्ष वेधले आहे. आतापर्यंत तुम्ही काय काम केले याबरोबरच निवडून आल्यावर तुम्ही काय करणार हेसुद्धा जनतेला सांगितले पाहिजे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या विजयाचे हे एक प्रमुख कारण होते, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
देशातील सद्य राजकीय स्थितीवर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. फक्त विरोधासाठी सरकारला विरोध करू नये, असा सल्लाही नितीशकुमार यांनी दिला आहे. नितीशकुमार यांची जनमानसातील प्रतिमा स्वच्छ प्रतिमेचा आणि विकासाभिमुख राजकारणी अशी आहे. काहीसे हेकेखोर असले तरी नितीशकुमार यांच्यावर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. नितीशकुमार हे मूल्यांचे आणि सिद्धांताचे राजकारण करण्यासाठी ओळखले जातात. नितीशकुमार यांचा विरोध हा भाजपाला नव्हता, तर नरेंद्र मोदी यांच्या नावाला होता. मोदी यांना असलेल्या विरोधामुळेच नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली दीर्घकाळाची मैत्री तोडत आपल्या राजकीय विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. बिहारमधील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी  नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली दीर्घकाळाची युती तोडत भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादव आणि दिशाहीन असलेल्या कॉंग्रेसशी आघाडी  केली तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटले होते. पण आपली राजकीय चूक नितीशकुमार यांच्या लवकर लक्षात आली, हे बिहारच्या जनतेचे नशीब म्हटले पाहिजे.
नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांची तुलनाच होऊ शकत नाही. कोणत्याच बाबतीत या दोघांमध्ये साम्य नाही. त्यामुळे या दोघांची झालेली युती किती काळ चालेल याबाबत शंका घेतली जात होती. एखाद्या  सभ्य माणसाला गावगुंडांसोबत पाहिल्यावर गल्लीतल्या लोकांना जसे आश्‍चर्य वाटते, तसे नितीशकुमार यांना लालूप्रसादांसोबत पाहून सगळ्यांना वाटत होते. नितीशकुमार यांनी लालुप्रसादांसोबत राजकारण करू नये, असे त्यांची मते न पटणार्‍यांना पण वाटत होते.   राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे निमित्त करत नितीशकुमार यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ अशी जी भूमिका घेतली ती स्वागतार्ह म्हणावी लागेल. नितीशकुमार यांनी राजद तसेच कॉंग्रेसशी असलेली महाआघाडी अद्याप सोडली नाही, मात्र नजीकच्या काळात महाआघाडीतून बाहेर पडत आणि कॉंग्रेसचा हात सोडत त्यांनी भाजपाचा हात पकडला तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.  ‘सुबह का भुला शाम को लौटे तो उसे भुला नही कहते’, असे नितीशकुमार यांच्याबाबतीत म्हटले पाहिजे.   लालूप्रसादांचे सर्व राजकारण हे आपल्या कुटुंबाभोवती फिरत असते. राजद हा घराणेशाहीने वेढलेला पक्ष आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर राजद म्हणजे लालूप्रसाद यादव यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. सत्तेची सर्व पदे लालूप्रसादांच्या घरातच असतात वा अशी पदे ते घराबाहेर जाऊच देत नाही. स्वत:वर चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात जायची वेळ आली तेव्हा लालूप्रसाद यादव यांनी आपल्या पत्नीला राबडीदेवी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. आज नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात लालूप्रसादांचा एक मुलगा उपमुख्यमंत्री तर दुसरा आरोग्यमंत्री आहे. मुलगी मिसादेवी राज्यसभा सदस्य आहे. याउलट स्थिती नितीशकुमार यांची आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही नितीशकुमार यांच्या पत्नीचे वा मुलाचे नाव कुणाला माहीत नाही.
कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना नितीशकुमार यांनी आताचा कॉंग्रेस पक्ष हा गांधी-नेहरूंच्या सिद्धांतावर चालणारा पक्ष राहिला नसल्याची मार्मिक प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्ष हा प्रतिक्रियावादी राजकारण करतो, जे योग्य नाही, कॉंग्रेसने पर्यायी राजकारण उभे केले पाहिजे, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. २०१९ मध्ये विरोधी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार  यांच्याकडे पाहिले जात होते. पण, आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही, तशी क्षमता आणि पात्रताही आपल्यात नाही, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. विरोधी आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे, अशी सूचनाही नितीशकुमार यांनी केली आहे. पर्यायाने विरोधी पक्षांनी विशेषत: कॉंग्रेसने पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचा चेहरा समोर करावा, अशी अप्रत्यक्ष सूचनाही नितीशकुमार यांनी केली आहे.
नितीशकुमार यांची सूचना मनापासून आहे की उपरोधिक याची कल्पना करता येत नाही. कारण राहुल गांधी यांची देशात कधीच गंभीर स्वरूपाचे राजकारणी अशी प्रतिमा निर्माण होऊ शकली नाही. याला दुसरे कोणी नाही तर राहुल गांधीच जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी सुटी घेऊ नये, परदेशात जाऊ नये, असे कोणी म्हणणार नाही, पण राहुल गांधीच यांची वेळ ही नेहमीच चुकत असते. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पाहणारे राहुल गांधी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार मीराकुमार अर्ज भरत असताना उपस्थित राहायला हवे होते. त्यामुळे पप्पू आणि पार्टटाईम राजकारण करणारे, अशी राहुल गांधी यांची प्रतिमा निर्माण झाली.लालूप्रसाद यादव तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे जे आरोप होत आहे. सीबीआय आणि आयकर विभाग जे छापे घालत आहे, त्यामुळे जास्त काळ लालूप्रसादांसोबत राहणे नितीशकुमार यांना राजकीयदृष्ट्या सोयीचे नाही. त्यामुळे नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.   नितीशकुमार यांच्या या सडेतोड भूमिकेमुळे भविष्यात बिहारमधील राजकारणाची स्थिती काय राहणार तसेच देशातील राजकारण कसे राहणार यांचा अंदाज करता येतो. त्यामुळेच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर देशातील राजकारणाला कलाटणी मिळणार असा जो अंदाज केला जातो, तो खरा होण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांची घरवापसी  होणार हे निश्‍चित आहे, फक्त ती कधी एवढाच प्रश्‍न आता उरला आहे.
– श्यामकांत जहागीरदार 
९८८१७१७८१७