ज्यूंच्या देशात…

0
223

अग्रलेख
दुसर्‍या महायुद्धात, मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांच्या प्रभावातून ज्यूंचा मोठ्या प्रमाणात जो अमानवीय नरसंहार झाला, त्याच्या प्रायश्‍चित्तातून, लोकशाहीवादी देशांच्या पुढाकारातून, जमीनदोस्त झालेल्या इस्रायलची नव्याने उभारणी झाली. महायुद्धातील त्या नृशंस हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात सर्वदूर त्या नवनिर्मितीचे स्वागत झाले. नाही म्हणायला, भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनीही या प्रसंगाचे स्वागतच केले. पण, त्यातला नाइलाज, तोंडदेखलेपणा, प्रयत्न केला तरी लपवता येत नव्हता. ‘मुस्लिमांना काय वाटेल…?’ याच एका प्रश्‍नाभोवती राजकारण फिरत राहिल्याने, कॉंग्रेसच्या नंतरच्या पिढीतील नेत्यांनाही या नव्या दमाच्या देशाशी संबंध प्रस्थापित करण्याची गरज कधी जाणवली नाही, की त्या दिशेने कुणी फारसा विचारही कधी केला नाही. अगदी १९९२ पर्यंत, पी. व्ही. नरसिंहरावांनी पुढाकार घेऊन त्या देशाशी शासकीय पातळीवर अधिकृत रीत्या संबंध प्रस्थापित करेपर्यंत आम्ही या गुणी देशाला सर्वांदेखत वाळीतच टाकले होते. बरं इतक्या वर्षांनी सरकारी पातळीवर संबंध अधिकृत रीत्या तयार झाले तरी त्या देशाला भेट देण्याची हिंमत मात्र कॉंग्रेसच्या कुठल्याच पंतप्रधानाची झाली नाही. जगाच्या पाठीवरचा भारत नावाचा देश हा आपला चांगला मित्र असावा असे इस्रायलला मात्र सातत्याने वाटायचे. पण, जागतिक परिणामांपेक्षाही स्थानिक राजकारणातच अधिक स्वारस्य असलेल्या आपल्या देशाला तसे मुळीच वाटत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सादेला आपल्याकडून मिळणारा प्रतिसाद शून्य राहिला. नागरिकांच्या अपेक्षेला केराची टोपली मिळाली अन् इस्रायल कालपर्यंत वेशीवरच राहिला. अन्यथा, नरेंद्र मोदींनी इस्रायलच्या भूमीवर पाय ठेवताच, ‘‘गेली सत्तर वर्षे आम्ही या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो…’’ असे उद्गार तेथील पंतप्रधान बेंझामीन नेतान्याहू यांच्या तोंडून निघतो, याचा दुसरा काय अर्थ असू शकतो? एकदा नेस्तनाबूत झाल्यानंतर प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर नव्याने उभा राहिलेला देश म्हणजे इस्रायल. वाळूतून शेती फुलविण्याची किमया सिद्ध करणारा देश म्हणजे इस्रायल. आईन्स्टाईनपासून तर वेगवेगळ्या वैज्ञानिकांची परंपरा लाभलेला देश म्हणजे इस्रायल. संपूर्ण जगाने आश्‍चर्याने नुसते बघत राहावे इतकी वेगवान प्रगती करणारा देश म्हणचे इस्रायल. विश्‍वावर अनभिषिक्त सत्ता गाजवण्याच्या ईर्षेत जगणार्‍या अमेरिकेशी दोन हात करण्याची तयारी आणि हिंमत दाखवणारा देश म्हणजे इस्रायल… भारतात गेली सहा दशकं सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेसला या देशाची ही ताकद कळली नसली, तरी भारतातील सर्वसामान्य नागरिकांनी मात्र त्या देशाला केव्हाच आपला मित्र मानले आहे. आज पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची ही पहिली इस्रायलभेट असली, तरी यापूर्वीही ते या देशात जाऊन आले आहेत. भारतातील इतर मान्यवर नेत्यांनीही कित्येकदा भेटी देऊन, जगण्याची त्याची अनोखी रीत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना पालकर यांच्या लेखणीतून १९७०च्या दशकात साकारलेले ‘छळाकडून बळाकडे’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक, ही भारताने इस्रायलच्या लक्षणीय, संघर्षमय अस्तित्वाची घेतलेली दखल होती. लक्षावधी लोकांचा संहार, त्यातून वाहिलेले रक्ताचे पाट आणि देशाचे तुकडे झालेले मान्य करून स्वत:ची सत्ता अबाधित राखण्यासाठी धडपडणार्‍या कॉंग्रेसच्या भारतीय नेत्यांना इस्रायलच्या स्वाभिमानाचे अप्रुप असण्याचे कारण तसेही नव्हतेच कधी. पण, हजारो ज्यूंची बेदरकारपणे कत्तल झाल्यानंतरही, हिटलरी नाझीझमच्या पेकाटात लाथ मारत, स्वबळावर उभे राहण्याची इस्रायली तर्‍हा भारतीयांना नेहमीच भावली आहे. त्या अर्थाने तर हा देश तमाम भारतीयांसाठी नेहमीच आदर्श राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर, आजवरच्या सत्ताधार्‍यांनी जाणीवपूर्वक टाळली, ती इस्रायलची भेट विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून ठरवणे, याला आगळेवेगळे महत्त्व आहे. बराच उशीर झाला असला तरीही, आपल्याशी मैत्री करायला आसुसलेल्या ज्यूंसमोर मैत्रीचा हात पुढे करण्याचे सकारात्मक परिणाम सारे जग येत्या काळात अनुभवणार आहे. बलाढ्य देशांच्या दबावाखाली, मुस्लिम मतांच्या राजकारणातून, की आणखी कशामुळे, पण का कोण जाणे, कालपर्यंत भारताला या देशासोबतचे आपले संबंध जगाला दिसू नये असेच वाटत राहिले होते. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनविरुद्धच्या युद्धात त्याची मदत घेऊनही भारताने ती कधी उघड होऊ दिली नाही. प्रबळ इच्छा असूनही त्या देशानेही भारताशी सौहार्दाचे संबंध राखण्याची आपली मनीषा मर्यादेपलीकडे कधी व्यक्त होऊ दिली नाही. तत्कालीन भारतीय नेत्यांची राजकीय अडचण लक्षात घेऊन चाललेले त्यांचे वागणे, राजकीय प्रगल्भतेचा परिचय देणारे ठरले. पण, आपल्या नेत्यांना त्याचे मोल, वेगळेपण आणि महत्त्व कधी कळलेच नाही. मागील काही वर्षांत ज्या तर्‍हेने या देशाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेतली आहे, दहशतवाद्यांशी लढण्याची जी जगावेगळी शैली त्याने विकसित केली आहे, ती बघता भारताची इस्रायलशी मैत्री तर कधीपासूनच असायला हवी होती. पण, दुर्दैवाने तसे घडले नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवाच्या दौर्‍यामुळे या दोन देशांतील संबंधांचे एक नवीन पर्व सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपल्याशी मैत्री करण्याची तयारी, नव्हे मनापासूनची तीव्र इच्छा असलेल्या या देशात ज्या राजेशाही थाटात भारतीय पंतप्रधानांचे स्वागत झाले, एरवी, फारतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वा पोप यांना मिळणारा जो सन्मान भारतीय पंतप्रधानांच्या वाट्याला तिथे आला… या सार्‍याच बाबी त्यांना भारताबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल असलेल्या प्रचंड आकर्षणाचा परिणाम आहेतच. पण त्याशिवाय, तेथील नागरिकांच्या मनात असलेल्या भारताबद्दलच्या आत्मीयतेचे, आदरभावाचे, प्रेमाचेही ते प्रतीक आहे. उगाच का मोदींच्या स्वागतासाठी परंपरा मोडीत काढून इस्रायलचे पंतप्रधान विमानतळावर उपस्थित राहतात? एकतर या दौर्‍यानंतर निर्माण होऊ घातलेल्या संबंधातून इस्रायलसारखा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गगनभरारी घेतलेला, विपरीत परिस्थितीशी लढत यश आणि विकासाचे उंचच उंच टप्पे गाठलेला, तंत्रज्ञानाच्या युगातील आधुनिक विश्‍व निर्माण करण्याच्या ईर्षेनेे झपाटलेला एक ‘जिनियस’ मित्र भारताला गवसणार आहे. अंतराळ क्षेत्रापासून, तर गंगा नदी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्वदूर त्यांची मदत आपल्याला होईल. विशेषत: कृषी क्षेत्रातील विकासात तर खूपच मोठी मदत भारताला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. कित्येक क्षेत्रात आपलेही सहकार्य त्यांना लाभेल. या भेटीचा तो औपचारिक परिणाम असेलही कदाचित, पण या भेटीनंतर दोन देशांमधील ज्या गाढ मैत्रीची अपेक्षा दोन्ही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे, ती बघता भारत आणि इस्रायलमधील संबंध केवळ सरकारी, राजकीय वा आर्थिक मदतीच्या पातळीवर नाही, तर सांस्कृतिक आणि भावनिक स्तरावरचा आविष्कार त्यातून साध्य करण्याची मनीषाच त्यातून ध्वनित झाली आहे…