सतीश व शुभदारूपी जलधारा रुंदावतेय्!

0
66

जगणे सगळ्यांच्या वाट्याला येत असते; पण जगावे कसे, हे फार थोड्यांना समजते. माणूस प्रथम जगला पाहिजे, तगला पाहिजे. जीवनकलहात टिकला पाहिजे. त्याच्या अंगात त्राण पाहिजे, माणूस म्हणून जगात स्थान पाहिजे. कुटुंबात, समाजात त्याचा मान पाहिजे. असा माणूस घडवायचा आणि जनप्रतिष्ठा वाढवायची आणि त्यासाठी त्याला शिक्षणाचा संस्कार द्यायचा. आर्थिक आधार द्यायचा, निरामय आरोग्य द्यायचं. मनुष्याचे शरीर परमेश्‍वराचे पवित्र मंदिर आहे. त्याचं पावित्र्य निर्व्यसनी राहून टिकविण्याचं भान त्याला द्यायचं. कर्तव्यनिष्ठा, ध्येयनिष्ठा, भवितव्याविषयीची जागरुकता माणसाच्या ठिकाणी निर्माण करायची. अशा कामाचं ध्येय समोर ठेवून संपूर्ण जीवन समर्पित करणारी माणसं स्वप्नवेडी, ध्येयवेडी असतात. अशा स्वप्नवेड्या कुरखेड्याच्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचे निर्माते डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या सहधर्मचारिणी सौ. शुभदा देशमुख यांची अग्रक्रमाने गणना करावी लागेल.
गडचिरोलीच्या अंधारलेल्या भागात एखाद्या उजेडाच्या बेटासारखे हे दाम्पत्य विकासाची प्रकाशमय वाट दाखवीत आहे.
कोमलतेत ताकद असते तीही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहते. फुलंही पाण्यासाारखी कोमलच असतात. एक दगड भिरकावला, तर दहा-बारा फुलं खाली पडतात. ज्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कुणी घरात आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोमेजतात, पण एवढ्याशा आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात.
छात्र युवा संघर्ष वाहिनी संघटनेच्या स्त्रीमुक्तीवादी विचाराने प्रेरित झालेल्या शुभदाताईंनी डॉ. सतीश गोगुलवार यांच्यासह ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हा प्रकल्प उभारून आपल्या समाजसेवेची मुहूर्तमेढ रोवली. गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात १७ वर्षांपूर्वी कुरखेड्यात त्यांनी सुरू केलेलं समाजसेवेचं पात्र आता रुंदावत आहे. समाजकार्याची परंपरा किंवा वारसा घेऊन शुभदाताई आल्या नाहीत. परंतु, छात्र युवा संघर्ष वाहिनीकडे तरुणपणी त्या ओढल्या गेल्या. या दरम्यान त्यांना बरेच समविचारी भेटत गेले. त्यांच्या मार्गदर्शनातून कामाला सुरुवात झाली. काम करताना काही वेळा समाधान, तर काही वेळा अनपेक्षित असे परिणामही दिसले.
सरकारी कामात मदत करत, अनेक गावांतील लोकांबरोबर गावात कामं झाली. गावातल्या महिला पुढे येऊन बोलत्या व्हाव्यात, असं त्यांना वाटू लागलं आणि आज थोडे चित्र बदलले आहे. त्यांनी केलेली सर्व कामं मोठीच आहेत. डॉ. सतीश आणि कार्यकर्त्यांसह मिळून त्यांनी केलेल्या कार्याचाच हा आढावा आहे.
२५ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. सतीश गोगुलवार यांचा जन्म चंद्रपूर येथे झाला. प्राथमिक शाळेपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण चंद्रपुरातच झाले. बी. एस्सी. झाल्यानंतर सतीश यांनी मेडिकल शाखेला जावे, अशी वडिलांची इच्छा होती. मोठे भाऊ इंजिनीअर म्हणून लहान्याने डॉक्टर व्हावे, हाच त्यांचा दृष्टिकोन होता. १९७६ साली सतीश यांनी नागपूरच्या शासकीय इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला व १९८१ साली गोगुलवारांचा सतीश, पालकांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर झाला. त्यामुळे त्यांना खूपच समाधान वाटले. सतीशची वाट मात्र वेगळीच होती. त्यांनी घरी आधीच सांगून टाकले होते की, मी डॉक्टर होईन, पण दुर्गम ग्रामीण भागात जाऊन गोरगरिबांची सेवा करीन. डॉ. सतीश गोगुलवार यांच्या पुरोगामी विचारसरणीची बीजे त्यांच्या बालवयापासूनच रुजलेली दिसून येतात.
सन १९७३-७४ ला बाबा आमटे यांच्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिरात पहिल्यांदा ते गेले. तेथे मोहन हिराबाई हिरालाल यांच्याशी मैत्री झाली. महाराष्ट्रात दुष्काळ पडला. त्या काळात ‘युनायटेड युथ फॉर सोशल सर्व्हिस’ या तरुणांच्या गटाशी ते जुळले आणि त्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. ही यांच्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ होय. वर्धेच्या चेतना विकास संस्थेत काम करीत असताना डॉ. सतीश यांची शुभदा देशमुख यांच्याशी ओळख झाली. शुभदाताईंना समाजासाठी विशेषत: खेड्यातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. दोघांचे विचार जुळले आणि ‘शुभदा-सतीश’ यांनी सहजीवनाचा संकल्प केला.
चेतना विकास संस्था, गोपुरी (वर्धा) येथे डॉ. सतीश ३ वर्षे राहिलेत. शुभदा-सतीश यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्धार केला, परंतु या आंतरजातीय विवाहास सतीशच्या वडिलांचा विरोध होता. शुभदांचे आईवडील नवविचारांचे असल्याने त्यांची संमती मिळाली. लग्न पारंपरिक पद्धतीने करायचे नाही, असे आधीच ठरले होते. त्यांचे लग्न अत्यंत साधेपणाने झाले; पण सतीशच्या आईची इच्छा असूनही त्या लग्नाला येऊ शकल्या नाही.
शुभदाताईंनी केलेल्या कार्याबरोबर त्यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यांचे विचार समाजातील महिलांना अंतर्मुख करायला लावणारे आहेत. शुभदाताई लग्नानंतरही शुभदा देशमुख या नावानंच ओळखल्या जातात. लग्न हे सहजीवनाचं बंधन आहे, या एका गोष्टीसाठी स्त्रीनं तिचं संपूर्ण अस्तित्व बदलवून टाकावं ही बाब त्यांना चुकीची वाटते. सतीश व शुभदा असे हे दोघेही वेगळ्या वाटेने जाणारे, नव्या वाटा शोधणारे दाम्पत्य. १९८२ साली विवाहबद्ध झाल्यानंतर डॉ. सतीश गोगुलवारांनी मोहन हिराबाई हिरालाल, सुखदेवबाबू उईके यांच्या संपर्कात गडचिरोली जिल्ह्यात आपल्या कामाची सुरुवात केली. लग्नानंतर सौ. शुभदा देसाईगंज येथे, आदिवासींचे झुंजार नेते आर. नारायणसिंह उईके यांच्या घरात राहावयास आल्या. माहेरी नोकरचाकर असल्याने घरगुती कामाची त्यांना सवय नव्हती. परंतु, तरीही त्यांनी तडजोड करून त्याही वातावरणाशी जुळवून घेतले.
आपण वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असलो, तरी मूल्यांच्या दृष्टीनं मागास आहोत. विकासाचं एक प्रचंड टोक गाठत असताना धर्माचं रहाटगाडगं आपल्याला चिकटलेलंच आहे. अशा धर्माच्या रहाटगाडग्यांना दूर सारण्यासाठी शुभदाताईंनी पाऊल उचललं आहे. जातिप्रथा मोडण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला शाळेत टाकताना मुलाचं नाव ‘सुशांत शुभदा सतीश’ असे टाकले आहे. शुभदाताईंनी समाजाच्या जागृतीचं कार्य आधी आपल्या घरापासून सुरू केलं आहे. गावानं एकत्र येऊन आपले प्रश्‍न सोडवावेत, लोकांचं आरोग्य टिकवावं यासाठी त्यांनी कुरखेडा परिसरात आपल्या कार्याला सुरुवात केली.
आपल्या गावातील महिला पाणी आणण्यासाठी रोज भरपूर कष्ट घेतात म्हणून शुभदाताईंनी १९९२ मध्ये दहा गावांत पिण्याच्या पाण्यासंबंधी जागृती शिबिरं घेतली. त्यात लक्षात आलं की, गावागावात हातपंप आहेत, मात्र लहानसहान कारणानं हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या प्रकल्पांतर्गत गावातील महिला व युवकांना हातपंप दुरुस्तीचं प्रशिक्षण दिलं गेलं.
गावागावांतील महिला एकत्र आल्या, की एक विषय कायम समोर येता होता, तो होता दारूचा. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी १९८६ मध्ये शुभदाताई कामाला लागल्या. दारूबंदीसाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना निवेदन दिलं. त्या निवेदनावर ६०० महिलांनी सह्या-अंगठे देऊन दारूबंदी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या प्रश्‍नाच्या निमित्तानं त्यांनी संपूर्ण गाव हादरवून सोडलं होतं.
सन १९९१ मध्ये महिला सशक्तीकरण करण्यासाठी त्यांनी ‘आपली बचत आपली शक्ती’चा नारा दिला. महिलांनी पुढे यावं, बोलावं, नेतृत्व करावं, अस त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी मेळावे, सभा, बैठका घेऊन महिलांना प्रक्रियेत आणलं. कुरखेडा तालुक्यातील येरंडी गावात पहिला बचतगट त्यांनी स्थापन केला. महाराष्ट्रात बचतगटाच्या कामाची पद्धतशीर सुरुवात करण्यामध्ये अग्रगण्य डॉ. सुधा कोठारी होत्या. त्यांना कुरखेड्याच्या जंगलात मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले. शासकीय अधिकार्‍यांच्या मदतीनं १९९६ मध्ये शुभदाताईंनी १४६५ बचतगट स्थापन केले होते. २००१ मध्ये १०९ बचतगटांना त्यांनी बँकेच्या मदतीनं १६ लाखाचं कर्ज मिळवून दिलं होतं. त्यानंतर पहिल्यांदा महिलांच्या नावानं बँकेत खातं उघडलं गेलं. १९९५ साली महाराष्ट्र पातळीवर बचतगटांच्या प्रतिनिधी महिलांचा त्यांनी ‘सखी मेळावा’ आयोजित केला होता.
स्त्रियांवरील अत्याचारांबाबत अभ्यास करणं या सगळ्या गरजेतून आसपासचे बचतगट एकत्र येऊन विचार करू लागले आणि १५ ते ३० बचतगट मिळून एक ‘परिसर संघ’ स्थापन होऊ लागला. त्यानंतरच्या काळात महिलांना ग्रामसभेत सहभागी होता यावं म्हणून दुर्गम भागातील महिलांना पंचायतराज या संकल्पनेची माहिती देण्याचं काम शुभदाताईंनी केलं. स्त्रियांमध्ये जागृती घडवून आणण्यासोबतच त्यांनी त्यांना रोजगाराचं महत्त्वही पटवून दिलं. वनौषधी, मध गोळा करणं आदी कामांतून स्त्रियांच्या हाती पैसा खेळू लागला. उमलत्या कळ्यांसाठीदेखील शुभदाताई आशावादी धोरण ठेवून आहेत. बचतगटातल्या स्त्रियांच्या मुली त्यांच्या आयांसोबत बैठकींना येऊन बसणं आता नवीन राहिलं नाही. त्यांनाही गोडी लागली आणि त्यांनी गट उभारले. हे गट केवळ बचतीसाठीच नाही, तर स्वयंविकासासाठीही असावेत म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. व्यक्ती म्हणून विकसित होणारी व्यक्ती यातून घडावी, ही पुढची दिशा असेल, असं त्या म्हणतात.
शुभदाताईंच्या कार्याबद्दल त्यांना गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं १९९५ चा ‘अभय शेणवई दलित मित्र पुरस्कार’, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मुंबई फाऊंडेशन १९९७ चा ‘समाजकार्य गौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे. शुभदाताईरूपी जलधारेचं कार्य पुन:पुन्हा जोरात वाहत आहे. या जलधारेच्या कक्षा रुंदावत आहेत.
डॉ. सतीश यांनी दवाखान्याच्या माध्यमातून कार्याची सुरुवात करायचे ठरविले. आपली ऍलोपॅथीची औषध योजना गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात राबविताना त्यांच्या हे लक्षात आले की, ग्रामीण भागातील वैदू आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या पारंपरिक ज्ञानातून वनौषधींचा नि:स्वार्थ वृत्तीने लोकसेवेसाठी वापर करतात. त्यांच्या उपचाराने रोग्यालासुद्धा फायदा होतो. म्हणजे आरोग्य सेवेमध्ये दुर्लक्षित्र अशा पारंपरिक वैदूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांनी वनौषधींचे शिक्षण घेतले. डॉ. सतीश इंजेक्शनचा वापर करीत नाहीत. त्यांच्या ‘आनंदलोक’ स्वास्थ्य केंद्रात काही लोक तर त्यांना ‘जडीबुटीचा डॉक्टर’ म्हणूनही संबोधतात. परंतु, याचा त्यांना अभिमानच वाटतो.
१९९९ ते २००१ या काळात कोरची, धानोरा व कुरखेडा तालुक्यातील बचतगटातील १६९ महिलांना वनौषधीची ओळख, निर्मिती व उपचार यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना रोजगार मिळाला आहे. वनौषधीचा नियमित पुरवठा होण्यासाठी संस्थेने ३ एकर जमिनीवर नर्सरी सुरू केली आहे. राज्यातील अन्य संस्थांना वनौषधीबाबत सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था करीत आहे. एखाद्या कामात अपयश आले म्हणून गोगुलवार दाम्पत्य कधी खचले नाही किंवा पांढरपेशाप्रमाणे कधी ऐतखाऊपणा त्यांनी जोपासला नाही. लोकहितासाठी नव्या योजना, नव्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी त्या दोघांनीही अक्षरश: रक्ताचे पाणी केले आहे. हेच त्यांच्या धडपडीतून दिसून येते.
विदर्भाच्या या काळ्या कसदार मातीचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य असं आहे की, सामाजिक क्षेत्रात पतीच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच सामर्थ्याने, तेवढ्याच तळमळीने काम करणार्‍या सहधर्मचारिणी या क्षेत्रात पाहावयास मिळतात. कदाचित बाबांचा व साधनाताईंचा हा वारसाच असावा. महात्मा गांधी-कस्तुरबा, शिवाजीराव पटवर्धन-पार्वतीबाई, बाबा आमटे व साधनाताई, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई, डॉ. विकास आमटे व डॉ. भारतीताई, डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग, डॉ. आशीष सातव व डॉ. कविता सातव यांच्या देदीप्यमान नामावलीतच आणखी एक.
मौलिक समाजसेवेच्या क्षेत्रात काम करण्याची आवड असणार्‍यांनी, त्याविषयी आस्था बाळगणार्‍यांनी या दाम्पत्याचा आदर्श सदैव आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे व त्यांच्या जीवनकार्यातून पती-पत्नीने प्रेरणा घेतली पाहिजे. एवढं मोठं, अलौकिक, बहुआयामी कार्य करूनही डॉ. सतीश गोगुलवार यांना काहीतरी राहून गेल्यासारख वाटतं. गोगुलवार दाम्पत्याच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्यात समाजसेवेचा हा झरा निरंतर वाहत राहो आणि त्यांच्या कक्षा रुंदावत राहोत…
– नंदकिशोर काथवटे
९४२३१०१९३८