‘स्मृती’ वर्तमान गाजविणारी, भविष्य घडविणारी

0
51

आठवड्यातली स्त्री
आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सांगलीच्या स्मृती मानधनाने केवळ तिच्याच नव्हे, तर तमाम क्रिकेटरसिकांच्या स्मृतीत कायम राहणारी गोड कामगिरी केली. या विश्‍वचषकात खेळणार्‍या भारतीय संघात स्मृतीसह विदर्भाची मोना मेश्रामसुद्धा आहे, परंतु देदीप्यमान कामगिरीची छाप सोडली ती डावखुरी फलंदाज स्मृतीने.
१८ जुलैला स्मृती २१ वर्षांची होईल. स्मृतीचा जन्म मुंबईचा, परंतु ती केवळ २ वर्षांची असताना आईवडिलांसोबत ती सांगलीला स्थायिक झाली. तिचे वडील व्यापारी आणि भाऊ प्रणव क्रिकेटपटू. वयाच्या पाचव्या वर्षी प्रशिक्षक एस.एल. पाटील यांच्याकडे ती क्रिकेटचे धडे गिरवू लागली. बघता बघता स्मृतीने क्रिकेटमध्ये नैपुण्य प्राप्त केले. नऊ वर्षांची असताना तिने महाराष्ट्राच्या अंडर-१५ संघात, तर वयाच्या ११ व्या वर्षी महाराष्ट्राच्या अंडर-१९ संघात स्थान मिळविले. २०१३ मध्ये पश्‍चिम विभाग अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेत स्मृतीने १५० चेंडूत नाबाद २२४ धावांची आकर्षक द्विशतकी खेळी केली आणि येथूनच खर्‍या अर्थाने तिच्या क्रिकेट कारकीर्दीला चालना मिळाली. २०१३ मध्येच अहमदाबाद येथे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून तिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
स्मृतीची क्रिकेट कारकीर्द घडत असताना तिला आई स्मिता, वडील श्रीनिवास व भाऊ प्रणव यांचे प्रोत्साहन मिळू लागले. वडील तिच्या क्रिकेट कार्यक्रमाकडे, तर आई तिच्या आहारावर कटाक्षाने लक्ष ठेवायचे. २०१४ मध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले व २२ व ५१ धावांची खेळी केली. तिच्या क्रिकेट कौशल्याची कीर्ती सातासमुद्रापलीकडे गेली व त्यामुळे तिला महिलांची व्यवसायिक क्रिकेट स्पर्धा ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१६ मध्ये ब्रिस्बेन हिट संघाने तिला एक वर्षासाठी करारबद्ध केले. याच वर्षी भारताकडून खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तिने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. आतापर्यंत स्मृती २ कसोटी, २५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने तसेच २७ टी-२० क्रिकेट सामने खेळली.
वास्तविक ती गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होती, विश्‍वचषकाच्या पात्रता फेरीतही ती खेळू शकली नव्हती. खरे तर विश्‍वचषकासाठी स्मृतीची भारतीय संघात निवड करायची काय असा प्रश्‍न निवड समितीपुढे होता, परंतु निवड समितीने तिच्यावर विश्‍वास टाकला. दुखापतीतून सावरलेल्या स्मृतीला विश्‍वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. स्मृतीही या विश्‍वासाला जागली. दिमाखदार प्रदर्शन केले. दोन्ही सामन्यात अविस्मरणीय खेळी खेळून भारताच्या दोन विजयात भरीव योगदान दिले.
विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर ३५ धावांनी विजय नोंदविला, त्यात स्मृतीने ९० धावांची शानदार खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात स्मृतीच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने ७ गड्यांनी दणदणीत विजय नोंदविला. वेस्ट इंडिजला ८ बाद १८३ धावांत रोखल्यानंतर स्मृतीने नाबाद शतकी खेळी करीत भारताला विजय मिळवून दिला. स्मृतीने १०८ चेंडूत १३ चौकार व २ षटकारांसह महत्त्वपूर्ण शतकी योगदान दिले. स्मृती विश्‍वचषकात शतक झळकाविणारी चौथी भारतीय फलंदाज ठरली. स्मृतीपूर्वी विद्यमान भारतीय संघाच्या दोन खेळाडू मिताली राज व हरमनप्रीत कौरनेसुद्धा विश्‍वचषकात शतक नोंदविले आहे. स्मृती विश्‍वचषकात भारतासाठी शतक झळकाविणारी सर्वात युवा खेळाडू ठरली. सर्वात कमी वयात शतक झळकाविण्याच्या बाबतीत स्मृती मानधना तिसर्‍या क्रमांकावर येते. या जुलै महिन्यात ती २१ वर्षाची होणार. तिला जगातील सदासर्वकाळ सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याची आणि भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू होण्याची उत्तम संधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृतीने शतक ठोकले, तेव्हा तिचे वय केवळ २० वर्षे ३४६ दिवस इतके होते. स्मृतीच्या या दिमाखदार खेळीने क्रीडा जगतात खळबळ माजली. तिच्या या कामगिरीची अनेक दिग्गजांनी प्रशंसा केली. यात सचिन तेंडुलकरपासून महानायक अमिताभ बच्चनपर्यंतचा समावेश होता. या शतकी खेळीनंतर सोशल मीडियात स्मृतीवर अभिनंदनाचा, स्तुतिसुमनांचा जोरदार वर्षाव झाला. स्मृती भारतीय महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर आहे, असा तिचा गवगवा होऊ लागला.
स्मृती भविष्यातही अशीच बहारदार अविस्मरणीय खेळी खेळत राहा आणि भारतीय महिला क्रिकेटला क्रीडाजगतात मानाचे स्थान मिळवून दे.
– मिलिंद महाजन
७२७६३७७३१८