वाटचाल मूल्ययुक्त निर्मितीकडे…

0
82

गेल्या ३०-४० वर्षांत स्त्रियांच्या चळवळीने जगात बरेच बदल घडवून आणले आहेत. स्त्रियांची चळवळ जसजशी फोफावत गेली, तसतशी स्त्रीची ‘चूल-मूल’पुरती मर्यादित प्रतिमा पुसली जाऊन तिच्या स्वतंत्र विचाराला नवे धुमारे फुटायला लागलेत. सुरुवातीला अत्यंत संथ गतीने सुरू झालेला हा बदल हळूहळू का होईना, पण स्वत:चं रूप प्राप्त करू लागला. गेल्या १०-१५ वर्षांत तर नजरेस भरेल, इथवर तो बदल घडून आला. मुळात स्त्रीवर्ग आपल्या डोक्यावर आपापल्या प्रश्‍नांचे ओझे घेऊन उभा आहे. तरीही बदलत्या सामाजिक पर्यावरणात स्वजीवनाकडे तटस्थपणे निरखून बघण्याची संधी स्त्रीला उपलब्ध होत गेली. स्त्रीला स्वअवकाशापर्यंत झेप घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती लाभण्याची शक्यता निर्माण होत गेली. पतिनिरपेक्ष असा स्वत:चा विचार करण्यास तिचे मन धजावत नव्हते. मात्र, हळूहळू ती एक व्यक्ती म्हणून आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त होत गेली.
स्त्रियांच्या लेखनाला सुरुवात कुठून झाली? पहिली कथा, कादंबरी कुणी लिहिली, या इतिहासात आपण आता जाणार नाही. तो सारा इतिहास सर्वश्रुत आहे. १९७५ पूर्वीच्या स्त्रीलेखनाचा आपण विचार केला, तर ती आपल्यावर कुणाच्यातरी नजरेचा पहारा आहे, असे गृहीत धरूनच लिहीत होती. नवर्‍याशी सतत जुळवून घेणारी, त्याच्यासमोर पड खाणारी, आपला संसार कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्यासाठी वाट्‌टेल तो अन्याय सहन करणारी अशाच पद्धतीची नायिका ‘तिच्या’ वाङ्‌मयातून प्रतीत होत होती. त्या काळात विभावरी शिरूरकर, गौरी देशपांडे यांच्यासारख्या अत्यंत तुरळक लेखिकांनी पुरुषीवृत्तीविरुद्ध उभी ठाकणारी नायिका उभी केली होती. मात्र, अलीकडे तिच्या वाङ्‌मयनिर्मितीतून स्वतंत्र आणि खुल्या अवकाशाचा प्रत्यय येतो. १९७५ नंतर स्त्रीवादी विचारसरणी मांडणारा स्वतंत्र प्रवाह नियतकालिकांच्या माध्यमातून, चर्चासत्रांमधून स्पष्टपणे उमटायला सुरुवात झाली. या काळात लिहित्या स्त्रियांनी आपल्या भोवती असणार्‍या, जगणार्‍या बायकांच्या दु:खाचे, सोसण्याचे चित्र आपल्या वाङ्‌मयातून उमटवण्याचा प्रयत्न केला. पुण्या-मुंबईच्या लेखिकांनी त्यांच्या महानगरीय जीवनाचा ताण, लोकलचा प्रवास, ऑफीस आणि घर अशी दुहेरी भूमिका सांभाळताना उडणारी भंबेरी, यंत्रयुगाचा वाढता रेटा, कुटुंबव्यवस्थेतले वाढते ताण, सतत होणारी घुसमट, लैंगिक शोषण, वाढती महागाई, स्त्री-पुरुष संबंधातले विविध कंगोरे अशा विविध विषयांना हात घातला.
अलीकडच्या काळात मात्र ‘तिच्या’ लेखनाला व्यापक दृष्टी लाभलेली आहे. आजच्या लेखिकांसमोर लेखनाची वेगवेगळी आव्हानं आहेत. आज कुटुंबजीवनाचे बदलते वास्तव भयानक आहे. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणार्‍या बातम्या आपल्या अनुभवांच्या आणि आकलनाच्या पलीकडच्या आहेत. या बातम्याच अनेकींना कथा-कादंबरीचे, कवितांचे विषय देऊन जातात. आज स्त्री स्वयंसिद्धा झालेली आहे. हा बदल अनेकींच्या लेखनात उतरलेला दिसतो. जागतिकीकरणाने उभी केलेली भोगवादी संस्कृतीची आव्हाने, वाढता हिंसाचार, रोज होणारे बलात्कार, सतत युद्धजन्य परिस्थिती, दहशतवाद्यांच्या रोजच्या कारवाया यावर किती लेखन होतं, यावर मात्र विचार व्हायला हवा.
लिहिणे आणि सकस लिहिणे यातला फरक ‘तिने’ समजून घेतला पाहिजे. पहिल्या उत्साहात तर ती फारच भारंभार लिहिते; पण नंतर तिला कळायला हवं की, आपल्या लेखनाला गाळणी कशी लावायची ते.
सध्या लेखनाचा प्रवाह काय आहे? तिच्या लेखनाचे विषय काय असतात? सोशल मीडियावर त्या काय लिहितात? कोणते विषय अजूनही तिला अस्पर्श आहेत? आहेत तर का आहेत? याचाही विचार व्हायला हवा. ‘तिच्या’ अनुभवांचा आवाकाच मुळात कमी असतो. घर, संसार, अपघात, नवरा-बायकोचे ताणतणाव, सण, उत्सव, व्रतवैकल्यं, सासुरवास, प्रेमाचे त्रिकोण, विवाहबाह्य संबंध, करीअर या रिंगणात ती सारखी फिरताना दिसते. या सर्वात मागच्या दशकात दलित साहित्य ठळकपणे उठून दिसले. कारण तो अनुभवाचा पोतच मुळी अस्सल होता. वेगळा होता. जीवनाचा थरकाप उडवणारा होता. अशा वातावरणात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लेखिका आजही वेगळं काहीतरी लिहिताना दिसतात. प्रज्ञा दया पवार, निरजा, मोनिका गजेंद्रगडकर, कविता महाजन, शिल्पा कांबळे, उल्का महाजन, संध्या नरे-पवार, भाग्यश्री पेठकर, ज्योती पुजारी, माधुरी अशिरगडे… अशा काही निवडक मागच्या पिढीतील लेखिकांनी वेगळे विषय निश्‍चितच हाताळले. त्यानंतरच्या पिढीतील मनस्विनीने तर तिच्या पहिल्याच कथासंग्रहाने सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. मनस्विनी, मुक्ता चैतन्य, प्राची पाठक, सुनीता झाडे, शशी डंभारे, माधवी भट, सुमती वानखेडे, डॉ. पद्मरेखा धनकर, क्रांती सडेकर, पल्लवी चौधरी, डॉ. स्मिता वानखेडे अशा काहींनी तर खूप वेगळे आणि नवे विषय हाताळून लगेच वाचकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेतलं आहे. या सगळ्या लेखिका जुन्या कढीला ऊत न आणता ‘आजचं’ लिहितात.
कालकालपर्यंत ‘तिच्या’ लेखनाला मर्यादा होत्या; पण का? घरात पुरुष लिहिणारा असला तर त्याचं काय कौतुक चालतं! त्याचा मूड सांभाळला जातो, त्याला लेखनात व्यत्यय येणार नाही, त्याला त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. मात्र, ‘तिच्या’ संदर्भात असे होत नाही. ती सकाळी किंवा सायंकाळी लिहीत बसली असेल, लेखनाचा मूड तिला हव्या त्या वेळी पकडण्याचा तिनं प्रयत्न केला की, ‘ही काय भलत्या वेळी तुझी नाटकं चालली’ म्हणून तिला ओरडा खावाच लागतो. तिच्या लेखनाच्या मूडशी तिच्या घरातल्यांचा काहीही संबंध नसतो. सोशल मीडियावर मी एकदा याच विषयावर चर्चा छेडली. ५० च्या आसपास लेखिका असलेल्या ग्रुपमध्ये ४-५ जणी सोडल्यास इतरांना याचे वैषम्य वाटल्याचे दिसले नाही. एकंदरीत बहुतांश लेखिका, घरातली सगळी कामं आटोपून, सगळी उस्तवारी सांभाळून वेळ मिळाल्यास आम्ही लिहितो, असं म्हणणार्‍या लेखिकाच जास्त आहे. भलत्या वेळी लिहायला बसायचं आणि संसाराकडे दुर्लक्ष करायचं, हे आम्हाला मान्य नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. पण, ‘मूड’ धरून ठेवून लेखनाचा ‘तो क्षण’ पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या लेखिका संसाराकडे- मुलाबाळांकडे दुर्लक्ष करतात की काय?
उत्तम- सकस लिहायचं असेल, तर लेखक म्हणून जगता आलं पाहिजे. लेखनाची प्रक्रिया मनात सतत सुरू असते. त्याचं भान लेखिकांना आलं आहेच. आपली सामर्थ्यस्थळे आणि आपल्या उणिवा, आपल्या पुढ्यातली स्थिती आणि गती या सर्वांचंच भान आता तिला येऊ लागलं आहे. त्यामुळे यापुढची तिची वाटचाल अधिक मूल्ययुक्त निर्मितीकडे होईल, यात शंकाच नाही!
– अरुणा सबाने
९९७००९५५६२