ब्लॉग ‘ती’चा

0
329

डायरी म्हणजेच रोजनिशी लिहीणं, हा पूर्वी अनेकांसाठी सवयीचा भाग होता. टांग्याचे भाडे तीन आणे झाले किंवा सुमतीला आज पहाटे कन्यारत्न प्राप्त झाले, अशा काही गद्य नोंदी आजोबा-पणजोबांच्या रोजनिशींमध्ये सापडतात, तेव्हा गंमत वाटते. डायरीलेखनाचे स्वरूप पुढे बदलत जाऊन ते अगदी खाजगी होत गेले असले तरी हे लेखन बरेचसे मध्यम, उच्चमध्यमवर्गातील पुरूषांपुरते मर्यादित होते. स्त्रीसाक्षरता वाढत गेली तसतशी आधी ओव्या, लोकगीतांमधून व्यक्त होणारी स्त्री कथा, कवितातून व्यक्त होऊ लागली. काही बंडखोर अपवाद वगळता तिचे विषय साधारण घर, मातॄत्व, निसर्ग याभोवती फिरायचे. तिची डायरीदेखील याहून वेगळी नसावी. ९० च्या दशकात इंटरनेट अर्थात आंतरजालाचा पसारा वाढत गेला आणि सहस्त्रक संपता संपता डायरीला एक नवीन भावंडं आलं ते म्हणजे ब्लॉग. डायरी म्हणजे स्वत:शीच गुणगुणणं, आपल्याच मनाशी गुजगोष्टी करणं तर ब्लॉग किंवा ऑनलाईन डायरी म्हणजे उंच कड्यावरून जगाला घातलेली साद. प्रतिध्वनी-प्रतिसाद येवो न येवो, मुक्तपणे व्यक्त होण्याची असोशी हीच ब्लॉगलेखनामागची उर्मी असते. जगभरातल्या स्त्रियांच्या बरोबरीने अनेक भारतीय स्त्रियादेखील या तंत्राच्या मदतीने उत्स्फूर्तपणे लिहू लागल्या आहेत.
बहुतेक ब्लॉग हे अनुभवावर, निरीक्षणांवर आधारित असतात. तंत्रज्ञानाची जोड देऊन ते अधिक आकर्षक रूपात सादर केले जातात. उदा : इटलीजवळच्या ब्लू ग्रोटो (नीलकुहर) बद्दल एखादीने वर्णनात्मक ब्लॉग लिहिला आणि तिच्या शब्दांना पानावरील रंगसंगतीसह फोटो, व्हिडीओची जोड दिली तर तोच ब्लॉग केवळ वाचनीय न राहता प्रेक्षणीय होतो. छापील पुस्तकांच्या तुलनेने हे या माध्यमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्याची सोय असल्याने काही विषयांवर उत्तम विचारमंथन होते. ‘मायबोली’ किंवा ‘मिसळपाव’ सारख्या वेबसाईट्सवरील लेखांवरच्या टोपणनावाने केलेल्या सखोल, अभ्यासपूर्ण चर्चा हा एक नवाच साहित्यप्रकार म्हणायला हवा. या चर्चांमध्ये तरूणींची संख्या भरपूर दिसते. गेल्या ३,४ वर्षात फेसबुक सारख्या समाज माध्यमांचे गारूड वाढत गेल्याने जगभरातील अनेक नव्या नवलाईच्या ब्लॉगलेखिका त्याकडे ओढल्या गेल्या आणि त्यांचे ब्लॉगलेखन मंदावले किंवा संपले. अर्थात सोशल माध्यमांवरची अभिव्यक्ती ही तात्पुरती, वरवरची असण्याचा आणि टाईमलाईनवरील माहितीच्या ढिगात कालांतराने गडप होण्याचा धोका असतो. त्यामुळे ब्लॉगचे महत्त्व अबाधित राहिले आहे. हे ओळखून असलेल्या परिपक्व ब्लॉगलेखिका आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी उलट समाजमाध्यमांचा अधिक प्रभावीपणे वापर करून घेत आहेत.
कुणी ुेीविीशीी.लेा किंवा लश्रेससशी.लेा सारख्या संकेतस्थळांच्या (वेबसाईट) माध्यमातून ब्लॉग लेखन करतं तर कुणी ब्लॉगलेखकांचे समूह तयार करून स्वत:च्या वेबसाईट्सद्वारे लेखन करतं. याला स्थळ, काळ, लिंग, भाषा, देश याचं बंधन नाही, कारण आंतरजाल हे वैश्‍विक माध्यम आहे. तरीही मुळात लेखनाची सुरूवात पुरूषाच्या तुलनेने बर्‍याच उशीरा करणारी स्त्री हे मधलं अंतर भरून काढताना धापा टाकत लिहीते आहे की ठामपणे व्यक्त होते आहे, विचारांचा परिघ विस्तारते आहे की त्याच मुद्द्यांकडे नव्या नजरेने पाहते आहे, पुरूषाशी स्पर्धा करते आहे की परस्परपूरकतेबद्दल बोलते आहे हे या सदरातून जाणून घेणं रंजक ठरेल.
असं म्हणतात की स्त्रिया दिवसभरात २०,००० शब्द बोलतात तर पुरूष केवळ ७०००. म्हणजेच स्त्रिया अधिक संवादी असतात. साहजिकच ब्लॉगलेखन हे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण असतं तसच निचरा करण्याचं एक माध्यमदेखील. देशोदेशीच्याच नव्हे तर आपल्या देशातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या ब्लॉगलेखनातली साम्यस्थळं कुठली, वैशिष्ट्य कोणती, त्यांच्या ब्लॉगचे शीर्षक अमुकच का, हेसुद्धा या सदरातून जाणून घेऊया. पाककृती-पेहरावापासून पर्यटनापर्यंत, पालकत्वापासून सामाजिक प्रश्‍नांपर्यंत, राईट टू पी पासून जागतिक स्तरावरील वर्ण-लिंगभेदापर्यंत, कवितेच्या अभिव्यक्तीपासून पुस्तकसमीक्षेपर्यंत, बालपणीच्या आठवणींपासून भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लींच्या चित्रणापर्यंत तिच्या ब्लॉगलेखनातलं विषयांचं वैविध्य समजून घेऊ या. भावुक मांडणी करता करता खड्या आवाजात पुरूषांची कानउघाडणी करताना, हलक्या फुलक्या स्फुटलेखनापासून वेदनेचे पीळ उलगडत अन्यायाचा जाब विचारताना, मखमली भावनिक हिंदोळ्यांवरून उतरून प्रखर वास्तवाला सामोरे जाताना बदलत जाणारा विविध ब्लॉगलेखिकांच्या मांडणीचा स्वर टिपून घेऊ या. सकाळी वर्तमानपत्र घरी आलं की ते सर्वात आधी ताब्यात घेणार्‍या आणि त्यात महिला विषयक पुरवणी असेल तर तिची घडी न उलगडता तशीच चिमटीत उचलून बाजूला ठेवून देणार्‍या गटात मोडणारे पुरूष स्त्रियांच्या ब्लॉगलेखनाकडे नेमकं कशा प्रकारे पाहतात, ते त्याचे वाचक होतात का, त्यावर ते व्यक्त होतात का असं बरच काही या सदराच्या निमित्त्याने जाणून घेऊया.
हिंदी भाषेतील आद्य ब्लॉगलेखिका पद्मजाचा पहिला ब्लॉग ‘कही अनकही’ २००३ मध्ये सुरू झाला. आता तो ‘चोखेर बाली’ या नावाने ओळखला जातो. पद्मजाचा उल्लेख करताना ठकुराईनच्या धर्तीवर ‘ब्लॉगराईन’ ही अजब उपाधी संबंधित साईटवर वाचताना मजा वाटली. आपण मात्र सरळ ब्लॉगलेखिका असंच म्हणूयात. स्त्रियांच्या ब्लॉगविश्‍वाची ही सफर जगाकडे पाहणारी नवनवी कवाडं उघडेल याची मला खात्री आहे.
– मोहिनी महेश मोडक
अकोला