‘ती’ तेव्हा तशी…

0
345

स्त्री हा वेगळेपणाने समजून घेण्याचा विषय आहे का? सुरुवातीलाच हा प्रश्‍न पडतो. स्त्री आणि पुरुष हे मानव आहेत; पण तरीही त्यांच्यात नैसर्गिक वेगळेपण आहेच. तिचे हे वेगळेपण मग असण्यात, दिसण्यात अन् त्याचमुळे वागण्यातही दिसत राहते. अनादी काळापासून ते दिसत आले आहे. मानवी समूहाची जडणघडण आणि इतिहासच मुळात स्त्री या बिंदूभोवती फिरत राहिला आहे. अगदी पुराणांपासून हे सारे जग तिच्याभोवती फिरत आलेले आहे. त्याचमुळे स्त्री समजून घेण्याचा प्रयत्न गीतेच्या आधीपासून सुरू झालेला आहे. अनादी काळापासून तो सुरू आहे. मग काळाच्या टप्प्यावर अत्यंत सर्जनशीलतेने अनेकांनी तो केलेला आहे. पुरुषांनी तो केला, यात त्यांच्या निसर्गसुलभ आकर्षणापासून तिला जाणून घेण्याची उत्सुकता होती. सुरुवातीच्या काळात जंगली अवस्थेत तिचा निसर्गधर्म अगदी मासिक पाळीपासून तिच्या प्रजननक्षमतेपर्यंत अनेक गोष्टी मानवी क्षमतेच्या पलीकडच्या वाटायच्या. मानवाचा जन्म कसा होतो, अर्भक तिच्या पोटात कसं येतं, हे न कळण्याच्या युगात तो तिचा मोठाच चमत्कार वाटायचा. त्यातून काही आदिम जमातीत ती प्रसवा आहे, ती पुढचा मानव निर्माण करते म्हणून तिला देवी मानायला सुरुवात झाली. नेमक्या त्याच अवस्थेत नैसर्गिक भूक शमविण्याचे साधन म्हणून तिला भोगदासीही मानले गेले. निसर्गत:च तिच्यावर असलेल्या काही मर्यादांमुळे तिला दुबळी मानले गेले. मात्र, सुरुवात मातृसत्ताक पद्धतीनेच झाली. माणूस शेती करायला लागला त्या वेळी ती सृजन आहे, तिच्याकडे सृजनाची शक्ती आहे आणि शेती ही सृजनाचे प्रतीक आहे म्हणून शेती तिच्याकडेच दिली गेली. तिने बीज लावले की ते फळते कारण ती स्वत:च फलिता आहे म्हणून तिच्याकडे शेती दिली गेली. त्याच वेळी असे करण्यामागचे एक कारण हेही होते की, तिला जास्त ताकदीची कामे करणे शक्य नाही. शिकार वगैरे हे बळाचे काम असल्याने शेती हे कमी बळाचा वापर होऊन होणारे काम आहे व तिला मुलांचे संगोपनही करायचे असते म्हणून मग तिला शेतीचे काम दिले गेले.
माणूस स्थिरावायला लागला. मग त्याच्या टोळ्यांच्या वसत्या झाल्या. शेती हा प्रमुख उदरभरणाचा व्यवसाय झाला. दुभती आणि शेतीला उपयोगी पडणारी जनावरे ही संपत्ती झाली. टोळ्यांमध्ये युद्ध व्हायची ती जनावरे पळविण्यासाठीच. टोळ्यांमध्ये वंशश्रेष्ठत्वाची भावना विकसित झाली नि मग प्रजनन करते स्त्री, म्हणजे मग वंशश्रेष्ठत्व राखायचे असेल तर माद्याही तशाच हव्यात म्हणून मग तिच्याकडे त्या अर्थाने बघितले जाऊ लागले. स्त्रीदेखील एक संपत्तीच आहे, असे मानले जाऊ लागले आणि नंतर टोळ्यांच्या युद्धात जनावरांसारखीच स्त्रियांचीही लूट सुरू झाली. ती मग अगदी इतिहासकाळापर्यंत सुरू राहिली. मोगल शासकांनीही स्त्रियांची लूट केली. त्यातून ‘जोहार’सारख्या प्रथा सुरू झाल्यात.
स्त्री-पुरुष सहजीवन सुरू झाल्यानंतर तिला समजून घेण्याच्या कक्षा रुंदावल्या. म्हणजे केवळ जीवशास्त्रीयदृष्ट्याच (अर्थात हा शब्द तेव्हा फार वरच्या पातळीवरचा) त्याहीपेक्षा निसर्ग म्हणूनच दृश्यमान होणार्‍या तिच्या लक्षणांवरूनच तिला समजून घ्यायचे, असा प्रयत्न सुरू झाला. जैविकतेचा तिच्याच नव्हे, तर मानवाच्या मानसिकतेवरही परिणाम होत असतो, ही समज अगदी अलीकडच्या काळापर्यंत नव्हती. तिला त्या तरल पातळीवर समजून घेण्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकात युरोपात झाली. त्यातही पुरुषांच्या प्रयत्नात पूर्वग्रह होताच अन् हेत्वारोपही होते. त्याचे असंख्य दाखले मिळतात.
जगात पहिल्यांदाच आदिम काळापासून तिच्या वाटचालीचा सखोल अभ्यास करून त्याचे प्रकटीकरण सीमॉन दी बहुवॉव यांनी केले. एक स्त्रीच स्त्रीला समजून घेत असताना, आजवर झालेल्या अशा सार्‍याच प्रयत्नांची समीक्षा या बाईंनी त्यांच्या ‘सेकंड सेक्स’ या बृहद्ग्रंथात केली आहे. स्त्री समजून घेण्याच्या मार्गावरचा हा ग्रंथ म्हणजे गीताच आहे! शांताबाई किर्लोस्करांनी ‘बाई’ या ग्रंथाच्या रूपात तो प्रयत्न केला.
ती देवी आहे, भोगदासी आहे, ती निसर्गाचे लावण्य आहे, ती कविता आहे, ती शक्ती आहे… भारतीय वेद, उपनिषद, शास्त्रे, पुराणे यांच्या माध्यमातून तिचा वेध घेतला, तर एका वेगळ्या वाटेवर आपण जाऊन पोहोचतो. अर्थात, हे सारेच कथात्म आहे. त्यातून बोध आपला आपण घ्यायचा असतो. लोककथा, काव्य यांच्या माध्यमातूनही स्त्रीविषयीची समज प्रकट होत राहिलेली आहे, पण तेही खूपच तरल पातळीवर आणि गूढाच्या भाषेतच बोलले गेले आहे. अव्यक्ताच्या अवकाशात शिरण्याची प्राज्ञा असेल, तरच तिच्यापर्यंत पोहोचता येते. अगदी हिरण्यगर्भावस्थेच्या आधीपासून वेद आणि श्रुतींमध्ये मानवी जगण्याचा विचार करण्यात आला आहे. ते नीट प्रवाहित व्हावे आणि पुढच्या जगण्याचा प्रवाह सुकर, सुखकर व्हावा यासाठी त्या त्या काळाच्या असलेल्या ज्ञानाच्या आवर्तनात हा साराच विचार करण्यात आला आहे. त्याची नीट मांडणीही करण्यात आली आहे. सूक्तांमध्ये हिरण्यगर्भावस्थेच्या आधीही ‘ती’ स्थित होती, असे म्हटले गेले आहे. ती म्हणजे प्रकृती आहे, शक्ती आहे आणि शक्तीही ही सृजनाचीच असते. तिच्यातूनच पुढचा संसार निर्माण झाला नि मग तो प्रवाहितही झाला. ती आदिमाया आहे अन् मग ती जगदंबा आहे. जगदंबा या शब्दात ‘जगद’ हा ध्वनी प्रस्फुटित झाला आहे. जगाची निर्मितीच तिच्यापासून झाली. मग तिला आठ हात आहेत, ती सिंहावर स्वार झालेली आहे, हे सारेच श्‍लेष आहेत. त्यातला लक्षार्थ घ्यायचा आहे. भौतिकदृष्ट्या जे काय प्रकट होत असते तेच सत्य मानले, तर मग तो साराच चमत्कार वाटू लागतो आणि त्यातून अंधश्रद्धा जन्माला येतात. कर्मकांड येते आणि मग पुन्हा ती समजून घेण्याच्या बुद्धिवादी मार्गापासून आपण भरकटतो.
पार्थिव पातळीचा विचार न करता त्यापलीकडे जाऊन विचार केला तर ती शक्ती आहे. दुर्गेला शक्तीच म्हटले गेले आहे. ती मग सिंहावर आरूढ होते म्हणजे ती बलशाली कर्तृत्व………भृर…….. अशा पुरुषार्थावरच आरूढ झालेली आहे. तो तिचा वाहक आहे. म्हणजे तिला हा जगाचा प्रवाह समोर न्यायचा आहे. त्यात तिचे ते साधन आहे. ती शक्ती आहे, असे म्हटल्यावर मग पुढे तिला समजून घेण्याचा मार्ग सुकर होतो. म्हणून मग जगातील शक्तिरूप सार्‍याच संकल्पनांची नावे स्त्रीलिंगीच आहेत. विद्या, लक्ष्मी, नदी, वीज, वर्षा, माती, पृथ्वी… असे सगळेच स्त्रीलिंगी आहे. ती पृथ्वीच्या जन्माच्या आधीही होती. मग तिने उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तीन पुरुष निर्माण केले. त्यांच्याद्वारे तिने जगाचे संचलन करवून घेतले. ती मग मूळ आहे, माया आहे, आदी आणि अनादिही आहे…
असे इतके भव्य आणि उदात्त असे तिचे रूप आहे, तर मग जगात विसंगती का निर्माण होतात? पुरुष हा केवळ तिची सावली आहे. साधन आहे. पुरुषाला स्वत:चे असे अस्तित्व नाही. तो पूर्ण नाही कारण तो शक्ती नाही. शक्तीच्या प्रकटीकरणाचे तो साधन असू शकतो, बळ असू शकतो, मात्र त्याला शक्ती होता येत नाही. पुरुष हा अर्धनारीनटेश्‍वरच आहे. तो शीव आहे… या प्रतीकातून बरेच काही मांडण्याचा प्रयत्न करून ठेवण्यात आला आहे. शक्तिसाधक पुरुषांमध्ये ‘शक्ती’ होण्याचा किंवा तसला आभास निर्माण करण्याचा अट्‌टहास असल्याची उदारहणे जगातील प्राचीन संस्कृतीत आहेत. अगदी आपल्या पश्‍चिम बंगालमध्ये राधा साधना आहे. रामकृष्ण परमहंसांनीदेखील ही साधना केलेली होती. यात मी स्त्री आहे, भगवंताची (ठाकूरजी) राधा आहे, म्हणूनच साधना करण्याची परंपरा आहे. मग त्यात अगदी आपण स्त्रीच झालो आहोत, हा भाव जागृत करायचा असतो. या साधनेत अगदी शारीरदृष्ट्याही परिवर्तन होतात. म्हणजे नितंब आणि स्तनांचा आकार वाढतो, आवाजही स्त्रैण होतो, अगदी मासिक पाळीही येते किंवा आल्याचा भास निर्माण होतो… ज्ञानेश्‍वरकन्या म्हणून गुलाबराव महाराजांनीही हा अनुभव घेतल्याचे दाखले अनेक ठिकाणी दिले गेले आहेत… आपण स्त्री व्हायचे, ही स्त्री समजून घेण्याच्या भुकेची अत्युच्य पातळी आहे. अजूनही नाटकात, चित्रपटात, लोकनाट्य, नृत्यात पुरुष स्त्रीपात्र असतात, मात्र स्त्रीने पुरुषपात्र केले, असे फार कमी वेळ होते. अलीकडच्या काळात स्त्रिया या पुरुषांची स्पर्धा करताना पुरुषीच… अगदी वेशापासून होण्याचा प्रयत्न करतात. हा तसा स्त्रीत्वाचा पराभवच आहे. स्त्री आपण शक्ती आहोत, हे विसरते तेव्हाच विसंगती निर्माण होतात. तिला याची जाणीव कायम असली की मग ती प्रबळ असते, स्वत्व हरविलेली नसते आणि मग ती प्रभुत्व गाजविण्याच्या स्थितीत असते. नाहीतर मग तिचा वापर सुरू होतो. ती केवळ शरीर म्हणून उरते…
‘ती समजून घेताना’ हा स्तंभ सुरू करण्यात आला आहे तो पुरुषांच्या तिच्याबद्दलच्या नेमक्या धारणा आणि समज यांचे नीट आकलन व्हावे यासाठीच. येत्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या विचारवंतांचे लेखन या स्तंभात प्रकाशित केले जाईल. त्याची ही संपादकीय सुरुवात आहे…
जुलेै महिन्याच्या उर्वरित अंकांत स्त्री आकलन मांडण्याचा प्रयत्न करेनच!
– श्याम पेठकर